वैशिष्ट्यीकृत पोस्ट

Jivya Soma Mashe/वारली चित्रकलेचा जनक – जिव्या सोमा मशे

Jivya Soma Mashe
A Warli painting by Jivya Soma Mashe

Jivya Soma Mashe (born 1934) is an artist of the Maharashtra state in India, who popularised the Warli tribal art form.

Mashe was born in Dhamangaon village in Talasari taluka of Thane district of Maharashtra. At the age of 11, he came to Kalambipada village in Dahanu taluka of Thane district, where he presently lives. In the 1970s the Warli Painting, which was a predominantly ritual art till that time, took a radical turn, when Jivya Mashe started to paint not for any special ritual, but on an everyday basis.

His talent was soon noticed, first nationally (it was rewarded straight from the hand of India's senior political figures, such as Jawaharlal Nehru and Indira Gandhi) then internationally (Magiciens de la terre, Centre Pompidou), bringing unprecedented recognition, which prompted many other young men to follow suit. They started to paint regularly for commercial purposes.

Life:

Jivya Soma Mashe has an unusual background. He lost his mother at an early age of 7 and out of shock he stopped speaking for several years, communicated only by drawing pictures in the dust. This strange attitude soon won him a special status within his community.

The first government agents sent to preserve and protect Warli Painting were amazed by his artistic abilities. Jivya Soma Mashe showed a heightened sensitivity and unusually powerful imagination, which seem to be the legacy of his early introspective period. Paper and canvas freed him from the constraints of working on rough, sheer walls and he transformed the brusque look of the ephemeral paintings into a free, deeply sensitive style. His sensitivity emerges in every detail of his paintings. Strokes, lines and a mass of dots swarm and vibrate on the canvas, coming together to form clever compositions which reinforce the general impression of vibration. Details and the overall composition both contribute to a sense of life and movement. Recurring themes, from tribal life and Warli legends, are also a pretext for celebrating life and movement.

Jivya Soma Mashe sums up the deep feeling which animates the Warli people, saying "There are human beings, birds, animals, insects, and so on. Everything moves, day and night. Life is movement".

The Warli, adivasi, or the indigenous peoples, speak to us of ancient times and evoke an ancestral culture. An in-depth study of this culture may give further insight into the cultural and religious foundations of modern India.

Jivya has two sons Sadashiv and Balu and a daughter. His elder son, Sadashiv was born in 1958. Both of his sons are well known exponents of this art form.
The exhibitions:

The first exhibition of Jivya was held at the Gallery Chemould, Jehangir Art Gallery in Mumbai in 1975 by the initiative of Bhaskar Kulkarni, who first introduced this master to the outside world.[1] His first exhibition outside India was at the Palais de Menton, France in 1976.[1] In 2003, he had a joint exhibition with Richard Long at Museum Kunst Palast in Düsseldorf, Germany, and in 2004 at Padiglione d'Arte Contemporanea, Milano, Italy. These were followed by the exhibitions at Shippensburg University, United States in 2006 and at Halle Saint Pierre, Paris (jointly with Nek Chand) in 2007. In July, 2007 another exhibition of his paintings was held at the Gallery Chemould, Mumbai.
Awards and honours:

In 1976, he received the National Award for the Tribal Art.[citation needed] In 2002, he received the Shilp Guru award.[2] In 2009, he was the recipient of the Prince Claus Award for his Warli painting.[3] In 2011, he received the Padma Shri for his contribution towards Warli painting.
_____________________________________________
वारली चित्रकलेचा जनक – जिव्या सोमा मशे

IMG_6369

पंचतारांकित हॉटेलांपासून ते एलिट उच्चमध्यमवर्गीयांच्या ड्रॉइंग रूमच्या भिंतींपर्यंत वारली चित्रांच्या मोठमोठ्या फ्रेम्स त्या वास्तूच्या सौंदर्यात भर घालतात. या चित्रांमुळे त्यांच्या एलिट वातावरणात एक ‘ट्रायबल’ लूक येतो आणि एकदमच घरधन्याला ट्राईबल आर्ट आणि ट्राईब्सबद्दल किती आत्मियता आहे याचे प्रदर्शन आपसूकच होते. भिंती सजवणारी वारली चित्रकला यथावकाश डिश, फ्लावर पॉट, टिशर्ट, साड्या, कुर्ते ते अगदी पेनावरसुद्धा नांदू लागली. त्या हाडकुळ्या आकृत्यांमध्ये सामावलेले ग्लॅमर आणि शहरी बाजारातले त्याचे मोल जाणून लवकरच ‘सिद्धहस्त’ कलाकारांनी वारली चित्रकला शिकवण्याचे क्लासेस उघडले आणि ‘दोन आठवड्यांत वारली चित्रकला शिका’, ‘एका महिन्यांत वारली चित्रकार व्हा.’ यांसारखे बोर्ड शहरांतल्या इमारतींच्या बाहेर डोकावू लागले. मुलांच्या ‘सर्वांगीण’ प्रगतीसाठी स्विमिंगपासून, कथ्थक, चित्रकला, स्केटिंग, इंग्लिश स्पिकींग, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट वगैरे समर कॅम्पना घालून मुलांची सुट्टी बूक करून टाकणार्या पालकांचे लक्ष वारली चित्रकलांच्या क्लासेसने वेधून घेतले नसते तर नवल! श्रीमंतांप्रमाणे एखादी वारली चित्राची फ्रेम हजारों रुपयांना विकत घेण्यापेक्षा स्वतःच ती कला शिकून घेण्याची मध्यमवर्गीय काटकसर वृत्ती या क्लासेसच्या पथ्यावर पडली आणि पावसाळ्यात कुत्र्याच्या छत्र्या उगवाव्यात तसे हे क्लासेस भराभर वाढत गेले.

वारली चित्रकला आदिवासी पाड्याबाहेर काढून तुमच्या आमच्या आयुष्याचा भाग बनवणार्या आदिवासींतील एकमेव पद्मश्री जिव्या सोमा मशे यांच्याबाबत मात्र आपल्याला काहीच माहिती नसते हे दुर्दैव आहे. ज्यांची कॉपी करत शहरांतले बिगर आदिवासी कलाकारांनी वारली चित्रकलेतून आपले खिसे भरले त्या जिव्या मशे यांची ओरिजनल चित्रे पाहण्यासाठी मी त्यांच्या शोधार्थ निघाले. पालघर जिल्ह्यातल्या डहाणूपासून दीड दोन तासांच्या अंतरावर असलेल्या खेडेगावात पद्मश्री राहतात हे कोणाला सांगितले तर खरे वाटणार नाही. मातीच्या कच्च्या घराशेजारी उभ्या ठाकलेल्या पक्क्या सिमेंटच्या घरात जिव्या सोमा मशे यांच्या मुलाने म्हणजेच सदाशिव जिव्या मशे यांनी माझे स्वागत केले. मातीच्या घरावर लावलेल्या जिव्या सोमा मशे यांच्या पाटीमुळे त्या घरात पूर्वी मशे यांचे संपूर्ण कुटूंब रहायचे याचे संकेत मिळाले होतेच.

भारतातील आदिवासी कला जगासमोर याव्यात आणि त्यांच्या कलाकृतींना बाजारपेठेत मोल मिळावे यादृष्टीने १९७५ साली तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशभरात मोहिम सुरू केली होती. याच शोधमोहिमेतून भास्कर कुलकर्णी यांना आदिवासी पाड्यावरचा वारली चित्रकार जिव्या सोमा मशे हा हिरा गवसला. वारली चित्रकलेने त्यांना प्रसिद्धी आणि पैसा दोन्ही मिळवून दिले. चित्रकलेच्या माध्यमातून आपण इतके मोठे होऊ शकतो हे त्या क्षणापर्यंत जिव्या मशे यांना वाटले नव्हते. जिव्या सोमा मशे यांना वारली चित्रकारीबद्दल तत्कालिन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पद्मश्री बहाल करण्यात आली. महाराष्ट्र शासनाने तसेच केंद्र सरकारनेही जिव्या सोमा मशे यांची काही वारली चित्रे विकत घेतली आणि राष्ट्रीय संग्रहालयांमध्ये जतन करून ठेवली.

१९७६ साली तत्कालीन राष्ट्रपती फक्रूद्दिन अली यांनी मशे यांना साडे तीन एकरची जमीन पुरस्कार स्वरुपात देण्याची घोषणा केली होती. ती जमिन त्यांना ३४ वर्षे सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवल्यानंतर २०११ मध्ये मिळाली. याच जमिनीवर बांधलेल्या चित्रशाळेत जिव्या सोमा मशे यांच्या वारली चित्रकलेचा खजिना साठवलेला आहे.

जमिनीवर बैठक ठोकून दोन मीटर कॅनव्हासवर एकचित्ताने वारली चित्रे रेखाटत असलेल्या ८२ वर्षीय काळ्यासावळ्या, बारीक अंगकाठीच्या जिव्या सोमा मशेंना पाहिल्यावर पद्मश्री प्राप्त आंतरराष्ट्रीय ख्य़ातीचा कलाकार म्हणजे हेच यावर विश्वास बसणे कठीण होते. एरवी शहरांतल्या चित्र प्रदर्शनांमध्ये दिसणारे केस वाढवलेले, खास आर्टीस्ट टाईप कॅप घातलेले, उंची सदरा ल्यायलेले, सह्या देणारे चित्रकार कुठे आणि समोर बनियन घालून चित्र काढण्यात व्यग्र असलेले जिव्या मशे कुठे…! रशिया, इटली, जर्मनी, जपान, चीन, इंग्लंड, बेल्जियम अशा अनेक देशांमध्ये मशे यांना आपली कलाकुसर दाखविण्यासाठी निमंत्रित केले गेले. देशविदेशांमध्ये डॉलर्समध्ये विकली जाणारी चित्रे याच चित्रकाराची आहेत हे त्यांच्याकडे पाहून कोणीच सांगू शकत नाही. समोर पसरलेल्या दोन मीटर कॅनव्हासवर जिव्या मशे एकाग्रतेने मासे पकडण्याच्या जाळीचे चित्र काढत होते. ती गुंतागुंतीची जाळी रेखाटताना त्यांचा हात लिलया फिरत होता.

“मांजरपाटाच्या कापडावर शेणाचा लेप देऊन कॅनव्हास तयार करतो. सुरूवातीला तांदळाच्या पीठाने आकृत्या काढायचो. पण जसे शहरांत जायला लागलो तसे फेव्हिकॉल आणि पांढर्या रंगाचे मिश्रण आकृत्या काढण्यासाठी वापरू लागलो.” ८२ वर्षीय जिव्या मशे यांना वयोमानाने ऐकू येत नसल्याने त्यांच्या ऐवजी सदाशिव जिव्या मशे यांनी माझ्याशी संवाद साधला. मांजरपाट कापडावर लेप देताना शेणाचा थर कुठेही जास्त होऊ न देता एक नैसर्गिक टेक्श्चर तयार करण्याचे त्यांचे कसब वाखाणण्याजोगे होते. आमच्या गप्पा सुरू असतानाच जिव्या मशे मधे मध्ये हातातल्या ब्रशसदृश काडीला ब्लेडने तासत होते. “वारली चित्र काढताना आम्ही ब्रश वापरत नाही, त्याऐवजी बाभळीचा टोकदार काटा किंवा बांबूची तासलेली काडी यांचा वापर करतो.” सदाशिव दादांनी माहिती पुरवली. शहरांमध्ये गेरूच्या गुळगूळीत कॅनव्हासवर ब्रशच्या परफेक्ट स्ट्रोक्सनी रेखाटलेल्या प्रोफेशनल वारली चित्रापेक्षा शेणाच्या लेपावर, मांजरपाट कापडाच्या ओबडधोबड कॅनव्हासवर, काडीने काढलेले हे वारली चित्र कैक पटींनी अस्सल वाटले.

जिव्या मशे यांच्या चित्रांची खासियत म्हणजे आदिवासींचे पारंपरिक जगणं रेखाटत असतानाच त्यात ते नाविन्याची भरही घालत असतात. उदाहरणार्थ आदिवसींच्या लग्नात काढतात तसा चौक आणि त्यांची देवता वाघाचे चित्र काढल्यानंतर सर्वात वर रेल्वेच्या डब्यांचे चित्रही त्यांनी रेखाटले आहे. आदिवसी जगण्यात रेल्वे कुठून आली? या माझ्या चेहर्यावर उमटलेल्या प्रश्नाला तातडीने उत्तर देत सदाशिव मशे म्हणाले, “बाबांनी पहिल्यांदा दिल्लीपर्यंतचा रेल्वे प्रवास केला होता त्यामुळे रेल्वेचा त्यांचा अनुभव त्यांनी या चित्रात रेखाटण्याचा प्रयत्न केला.”  पारंपरिकतेला नाविन्याची जोड देणारी चित्रकला हीच जिव्या सोमा मशे यांची ओळख आहे.

जिव्या मशे यांच्या वारली चित्रांना प्रसिद्धी मिळाल्यानंतर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ खुली झाली. जपान देशाने अनेकदा जिव्या मशे यांना बोलावून त्यांच्याकडून वारली चित्रे काढून घेतली. जपानमध्ये गेल्यानंतर ते संग्रहालय एक हिंदी आणि जपानी भाषा ठाऊक असणारी दुभाषी सोबतीला देत असत जेणेकरून जिव्या सोमा मशे आणि जपानी कलाकार यांच्यात संवाद घडत असे. “जपानमध्ये एका भारतीय माणसाने बाबांची चित्रे विकण्याची जबाबदारी घेतली होती. अनेक वर्षे आम्ही त्याच्याकडेच चित्रे सुपूर्द करत होतो. मात्र एकदा कोणाच्यातरी बोलण्यातून कळाले की तो जी किंमत देऊन आमच्याकडून चित्रे विकत घ्यायचा त्याच्या तिप्पट किंमतीने विकायचा तेव्हापासून त्याला चित्रे देणं आम्ही बंद केलं.” आदिवासी आहेत, दुसर्या देशात आहेत, भाषेचा अडसर आहे, अशिक्षित आहेत याचा पुरेपूर फायदा करून घेत एका भारतीयानेच आपल्याला फसवले याची सल सदाशिव दादांच्या बोलण्यातून जाणवत होती.

वारली चित्रकला सहसा आदिवसींमधील वारली जमातीत एखाद्या समारंभात वा देवाच्या कार्यात घरादारांवर काढायची चित्रे आहेत. आदिवासींचा इतिहास, त्यांची संस्कृती, सण, समारंभ, परंपरा काही प्रमाणात शब्दबद्ध झाली आहेत पण स्वतःच्या जीवन रेखाटणारी त्यांची वारली चित्रे हे त्यांच्याविषयीच्या माहितीचा दस्तावेज आहेत. इतर चित्रांच्या तुलनेत वारलीच्या हाडकुळ्या आकृत्या काढणं सोप्प म्हणून शहरांतल्या या उभरत्या चित्रकारांनी वारली चित्रकलांवर प्रभुत्व मिळवले आणि शहरांमध्ये प्रदर्शने भरवून चित्रे विकली. पण असे असले तरी त्या चित्रांमागची कथा त्यांना कधीही सांगता येत नाही आणि आदिवासींच्या कथा याच वारली चित्रकलेचा गाभा आहे.

“शहरांतल्या मुलांनी वारली चित्रे शिकावीत पण त्या चित्रांमागचे आदिवसींचे जगणे, त्यांची संस्कृती समजून घेत शिकावीत म्हणजे त्या चित्रांमध्ये खरी पारंपरिकता येईल.” सदाशिव मशे मोठ्या आत्मियतेने सांगत होते. आमच्या दोघांचे बोलणे सुरू असले तरी जिव्या मशे यांच्या एकाग्रतेत किंचितही फरक पडलेला नव्हता. इतक्यात ‘पद्मश्री जिव्या सोमा मशे’ अशी फर्मास सही त्यांनी चित्रावर केली. “म्हणजे? आदिवासी पाड्यावर लहानाचे मोठे झालेले जिव्या मशे शिकलेले आहेत का?”

“नाही हो, वारली चित्रे बाहेर घेऊन जाऊ लागलो तेव्हा त्या चित्रांवर जिव्या मशे यांचे नाव हवे असे अनेकांनी वारंवार सांगितले त्यामुळे पाड्यावर होणार्या प्रौढ साक्षरता वर्गात बाबा जाऊन सही येण्यापुरती अक्षरओळख ते शिकले.” आदिवासींमध्ये कोणत्याही गोष्टीचा मालकी हक्क असण्याची संकल्पना कधीच रूजली नाही म्हणूनच सुरूवातीच्या चित्रांवर जिव्या मशे यांनी आपले नाव दिले नव्हते. मात्र ही चित्रे आदिवासी पाड्याबाहेर पडली तेव्हा त्यांना बाजारमुल्य आले आणि बाजारमुल्य आले म्हणजे त्याची मालकीही आली. बाकी सही करता आल्यामुळे अमूक एक चित्र जिव्या मशे यांनी रेखाटले आहे याची शाश्वती झाली अन्यथा त्यांनी सुरूवातीची निनावी अनेक चित्रे सिद्धहस्त कलाकारांनी स्वतःची म्हणून खपवली होतीच.

पद्मश्री जिव्या सोमा मशे यांना चित्रकलेने प्रसिद्धी आणि पैसा दोन्हीही मिळून दिला. त्यांचा मुलगा सदाशिव जिव्या मशे जपान, ब्राझिल इत्यादी देशांमध्ये जाऊन तिथल्या आर्ट गॅलरीमध्ये वारली चित्र चितारून येतो. मुलांची शिक्षणं, लग्न, नातवंडांची शिक्षणं केवळ चित्रकलेच्या जोरावर झाली. “एका चित्रकलेमुळे आम्हाला एवढं मिळेल असं कधीच आम्हाला वाटलं नव्हतं.” सदाशिव मशे यांनी ज्या वारली चित्रकलेने ‘आदिवासी’ असून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर मान सन्मान मिळवून दिला त्या चित्रकलेला जपण्याचे आणि वाढवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. मुंबई, दिल्ली, जपान, ब्राझिल अशी सर्वत्र ते महाराष्ट्राची वारली कला पोहोचवत आहेत. महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय कला मिळवून दिलेल्या वारली चित्रकार पद्मश्री जिव्या सोमा मशे यांच्या पायाला स्पर्श करून पालघर जिल्ह्याबाहेर पडले खरी पण मन मात्र अजूनही त्या वारली आकृत्यांच्या फेर्यात अडकलं होतं.

-नम्रता भिंगार्डे

टिप्पण्या