वैशिष्ट्यीकृत पोस्ट

बुद्ध पौर्णिमा

 🌹🙏🏼
*सिद्धार्थ गौतमाचा जन्म ..*.
*बोधिसत्वाची सम्यक संबोधि...*
*तथागत बुद्धांचे महापरिनिर्वाण ..*.
*या महत्वपूर्ण तिन्ही घटनांची साक्षीदार ..*.
*आज वैशाखी पौर्णिमा ...*
*बुद्ध पौर्णिमा .*..
 सर्व समाज बांधवाना हार्दिक शुभेच्छा ..💐💐💐🌹🌹
🙏🙏🙏 जयभीम 🙏 नमोबुद्धाय
*..05/05/2023*
*आज बुद्ध पौर्णिमा*....
                            ( बौद्ध तत्त्वज्ञानाची थोडक्यात माहिती.......)
                                     ▪ *दुःखाचे कारण आणि उपाय बुद्धांनीच प्रथम सांगितले...!*
      सम्यक सम्बोधी प्राप्त झाल्यानंतर तथागतांनी अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी शोधून काढलेला जीवन जगण्याचा मार्ग म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग होय! तो मार्ग सर्वप्रथम पंचवर्गीय भिक्खूंना सारनाथ येथे सांगितला.
      चार आर्यसत्यांपैकी पहिले आर्यसत्य म्हणजे दुःख होय. दुःख हा विश्वातील सामान्य माणसाचा अनुभव काय आहे ते स्पष्ट होण्यासाठी या शब्दाचा उपयोग केला जातो. दुःखाचे समानअर्थी शब्द म्हणजे अस्वस्थता, चिंता, वेदना, शोक, खेद,असुरक्षितता, अप्रियता, यातना, गैरसमज, भांडण, असमाधान परंतु या सर्व शब्दांपैकी सर्वमान्य पावलेला शब्द म्हणजे दुःख हाच प्रचलित आहे. तथागत आपल्या प्रथम प्रवचनात स्पष्ट करतांना म्हणतात, 'भिक्खूंनो! जन्म दुःख आहे, म्हातारपण हे दुःख आहे, आजारी पडणे हे दुःख आहे, अप्रियांचा सहवास हे दुःख आहे, प्रियांचा वियोग हे दुःख आहे, मृत्यू येणे हे दुःख आहे म्हणजे आपणास जे हवे असते ते न मिळणे म्हणजे दुःख आहे. अर्थात मनाच्या विरुद्ध घडणे म्हणजे दुःख आहे. त्याचप्रमाणे रुप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान या पाच बाबींना पाच उपादान स्क॔ध म्हणतात.'
      १) *रुप स्कंध :* पृथ्वी, आप, तेज आणि वायू या चार भौतिक घटकांपासून रुप स्कंध तयार होते.
      २) *वेदना स्कंध :* सुखकारक वेदना, दुःखकारक वेदना आणि असुखद-अदुःखद वेदना यांना वेदना स्कंध म्हणतात.
      ३) *संज्ञा स्कंध :* घर, झाड, गाव, स्त्री, पुरुष इत्यादींची ओळख यास संज्ञा स्कंध म्हणतात. अर्थात पदार्थांना निरनिराळी नावे देण्याची मनाची शक्ती तिला संज्ञा स्कंध म्हणतात.
      ४) *संस्कार स्कंध :* संस्कार म्हणजे मनावर पडलेला प्रभाव. याचे कुशल कर्म, अकुशल कर्म आणि अव्याकृत कर्म असे तीन प्रकार आहेत.
      ५) *विज्ञान :* विज्ञान सहा आहेत. चक्षुविज्ञान, श्रोत विज्ञान,  घ्राण विज्ञान, जिव्हाविज्ञान, कायाविज्ञान व मनोविज्ञान या विज्ञानांच्या समुदायाला विज्ञान स्कंध म्हणतात. बुद्ध म्हणतात हे पाचही उपादान स्कंध.दुःखच आहे. पंचस्कंधांच्या या आसक्तीमुळे मनुष्यात अहंकाराची भावना निर्माण होते. माणसातील अहंकाराचा अतिरेक हे जगातील दुःखाचे मूळ कारण आहे.
      तथागत बुद्ध हे वास्तववादी होते. त्यांनी दुःखाची कारणे शोधली.
      तर दुःखाचे तीन प्रकार आहेत. अध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक. अध्यात्मिक म्हणजे वैयक्तिक, व्यक्तीने स्वतःच्या वागणूकीने ओढवून घेतलेले दुःख म्हणजे आपल्याच कमीमुळे उत्पन्न झालेले दुःख. जसे माणसाने लोभापायी किंवा मोहापायी हत्या केली तर त्याला त्यावेळी भलेही काही वाटणार नाही पण नंतर मात्र त्याला दुःख होते, पश्चात्ताप होतो. जर माणसाने चोरी केली तर तत्क्षणीच त्याला बरे वाटेल पण नंतर मात्र त्याला दुःख होते. आसक्तीमुळे माणसाचे हातून जर व्यभिचार घडला तर काही वेळाने किंवा काही दिवसांनी त्याला दुःख होतेच  तसेच माणूस जर जाणीवपूर्वक जाणूनबुजून खोटं बोलला तर ती वेळ तर तरून जाते परंतु नंतर मात्र त्याला दुःख होते, वाईट वाटते.
      किंवा एखाद्या माणसाने दारू पिऊन स्वतःच्या संसाराची धुळधाण आणि शरीराची राखरांगोळी स्वतःच्या हाताने करणे यालाच अध्यात्मिक दुःख म्हणतात. दुसरे आहे अधिभौतिक दुःख म्हणजे सामुदायिक दुःख. विषम वागणुकीमुळे आणि अन्यायामुळे ओढवणारी संकटे आणि त्यातून निर्माण होणारे दुःख मग ते प्रकरण मनुष्याला बहिष्काराचे असो की,  हाणामारीचे असो की अन्य कोणतेही असो त्यामुळे दुःखाचीच निर्मिती होते. तिसरे म्हणजे अधिदैविक दुःख. याचा अर्थ आहे नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे दुःख. उदाहरणार्थ: रेल्वे, विमान, आगबोट, मोटार अपघात. वादळाने होणारी हानी, महापूराने ओढवणारी आपत्ती, आगीमुळे होणारी हानी या सर्व दुःखांना अधिदैविक दुःख म्हणतात.
      तथागतांनी जगातील जशी तीन प्रकारची दुःखे शोधून काढली, ती नष्ट करण्याचा प्रभावी मार्ग सुद्धा शोधून काढला. वैयक्तिक आचरणामुळे ओढवणारी दुःखे नाहीसे करण्यासाठी पंचशील हे साधन आहे. पंचशीलाचे काया, वाचा, मनाने जर आम्ही पालन केले तर निश्चितच ती नष्ट होऊ शकतात. ते येणेप्रमाणे.
      १) मी कोणत्याही प्राणीमात्रांची हत्या करणार नाही. उलट सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करीन, त्यांचेशी मैत्री करीन, त्यांचेशी सौजन्याने वागेन म्हणजेच माझा कोणीही शत्रू म्हणून उरणार नाही.
      २) मी चोरी करणार नाही त्याऐवजी दान करीन
      ३) मी व्यभिचार करणार नाही, उलट सदाचाराने वागेल,  या शरीराला कुठला कलंक अथवा डाग लागू देणार नाही.
      ४) मी कुणाची चुगली करणार नाही, निंदा करणार नाही, कठोर बोलून कुणाचे मन दुःखी करणार नाही, व्यर्थ बडबड करणार नाही आणि खोटे बोलणार नाही, त्याऐवजी नेहमी सत्यच बोलेन.
      ५) मी दारू पिणार नाही, नशिल्या पदार्थांचे सेवन करणार नाही. अशा प्रकारे आम्ही जर वागण्याचा प्रयत्न केला तर दुःख आपल्यापर्यंत येणार नाही, अधिभौतिक दुःखे नष्ट करण्यासाठी तथागतांनी आम्हाला अष्टांगिक मार्ग हे प्रभावी साधन दिले आहे.
      १) *सम्यक दृष्टी :* सम्यक दृष्टी म्हणजे अविद्येचा विनाश करणे. दुस-या शब्दात सांगायचे झाले म्हणजे त्याला सम्यक अवलोकन असे सुद्धा म्हणतात. दुःख म्हणजे काय? त्याचे कारण काय? त्याचा निरोध कसा करता येतो आणि निरोधाचे साधन कोणते? याचे ज्ञान असणे म्हणजे सम्यक दृष्टी.
      २) *सम्यक संकल्प :* यामध्ये तीन बाबी समाविष्ट आहेत.
 १. ज्ञानेंद्रिय सुख कमी करणे, त्यांचा त्याग करणे.
 २. मैत्री, करुणेचा विकास करणे.
 ३. अहिंसा, चांगले विचार आणि स्नेहभाव यांचा सराव करून वृद्धी करणे. म्हणजेच आमचा संकल्प हा लालसा आणि तृष्णेपासून मुक्त असावा.
      ३) *सम्यक वाचा :* नेहमी सत्य बोलावे, खोटे बोलणे टाळावे. चुगली चहाडीमुळे कलह होतात, समाजात गट-तट पडतात,  समाज एकसंघ राहत नाही. म्हणजे अशा प्रकारची वाचा ही समाजासाठी घातक आहे, म्हणून समाजसौख्य वृद्धीसाठी प्रत्येक अभद्र शब्दप्रयोग टाळावा म्हणजे दुःख उत्पन्न होणार नाही.
      ४) *सम्यक कर्मांत :* हत्या, चोरी आणि व्यभिचार हे तीन प्रकारचे गैरकृत्ये माणसाच्या हातून घडतात. कारण प्राणीहत्या केल्याने व्यक्तीमधील क्रूरतेची वृद्धी होते. चोरी केल्याने व्यक्तीची गुन्हेगारी वृत्ती वाढते. तर लैंगिक मिथ्याचार केल्याने कामवासनेला चालना मिळते. व्यक्ती कामांध होतो. म्हणून माणसाने दुस-याच्या भावना आणि त्यांचे हक्क यांचा मान राखून प्रत्येक कृती करावी.
      ५) *सम्यक आजिवीका :* म्हणजे सन्मानाने प्राप्त केलेल्या जिविकेवर उदरनिर्वाह चालविणे, म्हणजे शस्त्र व्यापार, मांस व्यापार, मानवांचा व्यापार, मद्यांचा व्यापार आणि विषाचा व्यापार करू नये, तर सम्यक आजिवीका करून आपला प्रपंच चालवावा.
      ६) *सम्यक व्यायाम :* जे हानीकारक विचार अद्याप मनात निर्माण झालेले नाहीत त्यांना निर्माण होण्यास प्रतिबंध करावा.जे हानीकारक विचार निर्माण झाले आहेत त्यांच्या वाढीवर प्रतिबंध घालावा. जे विधायक विचार अद्याप निर्माण झालेले नाहीत त्यांना निर्माण होण्यास प्रयत्नशील असावे. आणि जे विधायक विचार निर्माण झालेले आहेत त्यांचे संवर्धन व्हावे.
   
   ७) *सम्यक स्मृती  :* सम्यक स्मृती या चार प्रकारच्या आहेत.
 १. कायानुपस्सना, २. वेदनानुपस्सना, ३. चित्तानुपस्सना, ४. धम्मानुपस्सना. सती म्हणजे स्मृती. म्हणजे साधक येथे चिंतन करतांना शरीर, वेदना,  मन आणि मन यावर आपली एकाग्रता केंदीत करतो. उत्साहपूर्वक जागृत असतो. सावध असतो. भौतिक लालसा व निराशा त्याने बाजूला सारलेल्या असतात. पूर्णपणे वरील चार बाबींवर त्याचे चित्त केंद्रीत असते. अशा प्रकारच्या ध्यानाच्या सरावातून व्यक्ती परिशुद्ध होत असतो. दुःखावर मात करतो, वेदनामुक्त होतो, शोकविरहित होतो, सन्मार्गावरून चालतो, त्याला निब्बाणाची जाणीव होते.
      ८) *सम्यक समाधी :* सम्यक समाधी म्हणजे मनाची तल्लीनता होय. यामध्ये जे पाच अडथळे येतात ते दूर केले की, आपला मार्ग सुखकर होतो. १) ज्ञानेंद्रिय उपभोग आनंद, २) दुष्ट इच्छा, ३) आळस व सुस्ती, ४) चिंता व अस्वस्थता, ५) संशय वृत्ती हे पाच अडथळे ध्यानाची एकाग्रता होऊ देत नाहीत तेव्हा साधकास यापासून सावध असणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणजेच कोणत्याही दुष्ट प्रवृत्तीपासून मन अलग ठेवून चित्त प्रसन्न आणि शांत ठेवणे, असे आचरण केले की, अधिभौतिक दुःखे नष्ट होतात. यातील तिसरे म्हणजे अधिदैविक दुःख नष्ट करण्यासाठी बुद्धांनी शीलमार्ग अनुसरणे हा उपाय सांगितला आहे. शीलमार्ग अर्थात दहा पारमिता.
 १) *शील :* शील म्हणजे नितिमत्ता. वाईट गोष्टी न करण्याकडे मनाचा असलेला कल, म्हणजेच अपराध करण्याची लाज वाटणे, शिक्षेच्या भितीने वाईट गोष्टी टाळणे म्हणजेच शील.
 २) *दान :* स्वार्थाची किंवा परतफेडीची अपेक्षा न करता दुस-याच्या भल्यासाठी, सुखासाठी, आनंदासाठी स्वतःची मालमत्ता, रक्त, जीवनावश्यक वस्तू, देह अर्पण करणे, इतकेच नव्हे तर प्राणत्याग करणे म्हणजेच दान होय.
 ३) *उपेक्षा :* फलप्राप्तीने विचलित न होणे, परंतु निरपेक्षतेने सतत प्रयत्न करीत राहणे म्हणजेच उपेक्षा होय. अनासक्ती आवड किंवा नावड  नसलेली मनाची स्थिती.
 ४) *नैष्क्रय :* ऐहिक सुखाचा त्याग म्हणजे नैष्क्रये.
 ५) *वीर्य :* वीर्य म्हणजे उत्साह, जोम, हाती घेतलेले काम सर्व सामर्थ्यानिशी पूर्ण करणे म्हणजे वीर्य, तसेच जनकल्याणाची कामे जोमाने आणि तत्परतेने करणे.
 ६) *शांती :* क्षमाशीलता म्हणजे शांती, द्वेषाला द्वेषाने उत्तर न देणे हाच शांतीचा उद्देश आहे.
 ७) *सत्य :* व्यर्थ बडबड न करणे, कुणाची निंदा-चुगली न करणे, कठोर बोलून कुणाचे मन दुःखी न करणे, आणि खोटे न बोलणे म्हणजे सत्य पारमिता होय.
 ८) *अधिष्ठान  :* ध्येय गाठण्याचा दृढनिश्चय म्हणजे अधिष्ठान.
 ९) *करुणा :* सर्व प्राण्यांशी मैत्री करणे, सर्व प्राणीमात्रांवर दया करणे,  त्यांचेवर प्रेम करणे, म्हणजे एकंदरीत सर्व प्राणीमात्रांविषयीची अनुकंपा म्हणजे करुणा होय.
 १०) *मैत्री  :* सर्व प्राणीमात्रांविषयी नव्हे तर मित्रांशी आणि शत्रूंशी देखील मैत्री करणे म्हणजेच सर्व जीवांविषयी बंधुभाव बाळगणे म्हणजे मैत्री होय.
      *अशाप्रकारे पंचशील आर्यअष्टांगिक मार्ग आणि दहा शीलमार्ग याद्वारे दुःखाचा निरोध करून माणसाला दुःखाचा विनाश करता येतो मग ते दुःख अध्यात्मिक असो की अधिभौतिक असो अथवा अधिदैविक असो.*🙏🙏🙏🌹🌹

*संकलन:-*✍️ डॉ एन एन कुऺटे वसमत जि हिंगोली....
05/05/2023......

टिप्पण्या