वैशिष्ट्यीकृत पोस्ट

जागतिक हात धुणे दिन

 ********************************
*@ १५ ऑक्टोबर @*
*जागतिक हात धुणे दिन*
********************************

आज जागतिक 'हस्त स्वच्छता दिन' किंवा 'हात धुणे दिन' म्हणून साजरा केला जातो.

आपल्याला एखादा आजार झाला की आपण त्यावरील विविध औषधे घेतो, उपाय करतो; परंतु मुळाशी जाऊन हा आजार कशामुळे झाला असेल हे जाणून घेत नाही. आपल्याला होणार्‍या अनेक आजारांचे मूळ हे आपल्या अस्वच्छ हातांमध्ये असते. अशुद्ध, अस्वच्छ हातांनी अन्नपदार्थ हाताळल्यामुळे, खाल्ल्यामुळे अनेक जीवाणू आपल्या पोटात जात असतात आणि त्यातून विविध प्रकारच्या आजारांना आमंत्रण मिळत असते. म्हणूनच हस्तशुद्धीबाबत जागृती करण्यासाठी जगभरात १५ ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक हस्तस्वच्छता दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने हा विशेष लेख.

आयुष्य चांगले आणि निरोगी जगायचे असेल तर स्वच्छता महत्त्वाची आहे. त्याची सुरुवात हातांच्या स्वच्छतेपासून व्हायला हवी. कारण बहुतांश वेळा रोगांचे आजारांचे जंतू हे हातातूनच पोटात जातात. त्यामुळे रोगजंतूंपासून स्वतःचा बचाव करायचा असेल तर हात स्वच्छ धुण्याची आवश्यकता आहे. हात स्वच्छ धुतल्याने शरीर निरोगी राहते. याच प्रेरणेतून जागतिक स्तरावर हस्तशुद्धीची मोहीम सुरू झाली. आपल्याकडे प्राचीन आयुर्वेदात मुखाचे आरोग्य चांगले असेल तर एकूण आरोग्य चांगले राहते, असे म्हटले आहे. कारण, पाणी किंवा आहार हा तोंडावाटेच पोटात जातो; पण आता बदलत्या हवामानात ज्या हाताने आपण तोंडात घास घालतो ते स्वच्छ असणे ही पहिली पायरी मानली आहे. 2008 मध्ये स्टॉकहोम शहरात जागतिक पाणी सप्ताहाची परिषद भरली होती. तिथून हस्तशुद्धी मोहिमेचा श्रीगणेशा झाला. यात सामान्य जनतेचा सहभाग असण्याची गरज आहे. त्यासाठी व्यापक प्रबोधन आवश्यक आहे. त्यासाठीच १५ ऑक्टोबर हा जागतिक हस्तशुद्धी दिन म्हणून साजरा केला जातो. २००८ मध्ये तो पहिल्यांदा पाळण्यात आला. शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये हाताच्या स्वच्छतेचे बीज रुजवणे हा यामागचा प्रमुख उद्देश आहे. कारण, लहान मुलांमध्ये मुळातच स्वच्छतेबाबत फारशी जागरुकता नसते. मातीतले खेळ, भटकणे, अस्वस्छतेची जाण नसणे यामुळे मुलांमध्ये स्वच्छतेच्या अभावामुळे होणारे आजार मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. याचे मूळ कारण म्हणजे मुले अन्न खाताना हात स्वच्छ धुवत नाहीत. त्यामुळेच बहुतांश शाळकरी मुलांमध्ये हगवणीसारखे पोटाचे विकार अधिक प्रमाणात होताना दिसतात. ते टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली गेली. जगभरात हात स्वच्छ न धुता अन्नग्रहण केल्यामुळे पोटामध्ये विविध जंतू जाऊन होणार्‍या आजारांमुळे दरवर्षी ३५ लाख मुले दगावतात, असे काही अभ्यासकांनी निदर्शनास आणून दिले आहे. त्यामुळे अतिशय सोप्या स्वच्छतेचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले गेले. हात स्वच्छ असतील तर श्‍वसनाचे विकार आणि पचनाचे विकार यांचे प्रमाण कमी होते. त्यामुळे गरीब आणि विकसनशील देशांत याचा प्रसार करण्यासाठी ‘युनिसेफ’ने खूप उपक्रम राबवले. त्यातून २००८ हे आंतरराष्ट्रीय स्वच्छता वर्ष म्हणून घोषित केले गेले. त्याचाच एक भाग म्हणून १५ ऑक्टोबर हा जागतिक हस्तस्वच्छता दिन सुरू झाला. मुळातच हात व्यवस्थित धुण्याची प्रक्रिया साधीशी आहे. ती समजून घेऊन तशी सवय लहान वयातच अंगी बाणवली तर मोेठेपणी त्याचा निश्‍चितच फायदा होतो. अर्थात, लहानांबरोबर मोठ्यांनी स्वच्छ हात धुण्याची सवय अंगीकारली पाहिजे.

आपण दिवसाच्या सुरुवातीपासून या प्रकारची स्वच्छता पाळली पाहिजे. त्यामुळे जीवाणू आणि विषाणू पोटात जाण्यापासून बचाव होतो. त्यामुळे अनेक संसर्गजन्य रोग दूर ठेवण्यास मदत होते. त्यामुळे अर्थातच आजारपणांवर होणारा खर्च निश्‍चितच कमी होईल आणि आपल्या घरखर्चातील आरोग्यावरील खर्चात कपात होईल.

दिवसाच्या सुरुवातीपासूनच आपल्याला अनेक प्रकारची कामे करण्यासाठी हातांचा वापर करावा लागतो. लहान मुलांना असंख्य वेळा आपण हात धुण्यास सांगतो; पण आपण मात्र ते विसरतो. आपण सकाळी जागे झाल्यापासून गजराचे घड्याळ, मोबाईल फोन, चादरी, संडास-बाथरूमचे नळ, दरवाजे आदी असंख्य गोष्टींना हात लावत असतो. या सर्व ठिकाणी जंतू असतात. त्यामुळे आपल्या स्वतःच्या घरातही जंतूंशी सातत्याने संपर्कात येत असतो. त्याशिवाय आपल्याला नखे वाढवण्याची हौस असेल तर त्यातही जंतू असण्याचे प्रमाण अधिक असतेच. त्यामुळे स्वतःला आणि कुटुंबाला आरोग्य रक्षणाचे कवच द्यायचे असेल तर प्राणायाम, योगासने, फिरायला जाणे, व्यायाम करणे या सर्वांबरोबरच किंबहुना त्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट आवश्यक आहे, ती म्हणजे अन्नपदार्थांशी संबंधित कोणतेही काम करताना हात स्वच्छ धुणे. अगदी स्वयंपाकाची तयारी करण्यापूर्वी आणि कोणताही पदार्थ बनवण्यापूर्वी हात धुणे आवश्यक आहे. त्याशिवाय काहीही खाण्यापूर्वी हात धुवायलाच हवेत. घरातील लहानग्यांकडे थोडे लक्ष ठेवून ते खराब हातांनी खाणार नाहीत आणि जमिनीवर सांडलेले खाणार नाहीत, याकडे लक्ष द्या. आपल्याला केसात हात फिरवणे, चेहर्‍यावर हात फिरवणे, नखे कुरतडणे यांसारख्या अनेक सवयी असतात. केसांत हात फिरवून त्याच हातांनी अन्न खाल्ल्यास पोटात जंतूसंसर्ग होणे स्वाभाविक असते.

*हात कधी धुवावे ?*

* स्वयंपाकाची तयारी करण्याआधी
* जेवायला बसण्यापूर्वी आणि जेवण झाल्यावर
* जेवायला वाढण्यापूर्वी
* शौचालयात जाऊन आल्यावर
* मुलांचे लंगोट, कपडे बदलल्यावर
* कोणत्याही रुग्ण किंवा आजारी व्यक्तीला भेटल्यानंतर
* खोकला, सर्दी झाल्यावर नाक स्वच्छ केल्यावर
* प्राण्याला हात लावल्यावर
* केरकचरा काढल्यावर
* बाहेरून आल्यावर
* वाहनातून प्रवास केल्यावर
* पैसे मोजल्यावर

आपण सकाळी उठल्यावर प्रातर्विधी करून झाले की स्वयंपाकाला सुरुवात करण्यापूर्वी हात धुतोच; पण जाणीवपूर्वक वरील सर्व वेळी हात धुतलेच पाहिजेत. त्यामुळे अर्थातच पोटात जंतू जाण्यापासून अटकाव होईल.

*हात किती वेळ आणि कसे धुवावेत ?*

शास्त्रीयदृष्ट्या किमान २० सेकंद हात चोळून मग पाण्याने धुवावेत. यासाठी हात ओले करून घ्यावेत. मग हातावर पुरेसा द्रव साबण किंवा साबणवडी लावून घ्या. दोन्ही हात एकमेकांमध्ये गुंतवून दोन्ही हाताला साबण चोळून घ्यावा. सगळीकडे नीट साबण लागल्यावर दोन्ही हातांचे तळवे, बोटं, नखं हे सर्व चांगले चोळावे. बोटांच्या मधल्या भागांतही चांगले चोळावे. त्यानंतर पाण्याने हात स्वच्छ धुवावेत आणि स्वच्छ कोरड्या टॉवेलने पुसून घ्यावेत. आपली नखे जर वाढवलेली असतील तर नखांमधील घाणही काढावी.

*पाण्याची कमतरता असल्यास* :

आपल्याकडे पाणीटंचाईची समस्या अनेकदा असते. अशा काळात सातत्याने हात धुणे शक्य नसते. प्रवासातही हा प्रश्‍न उद्भवतो. यावर सॅनिटायझर हा एक चांगला पर्याय आहे. सॅनिटायझर हातात घेऊन दोन्ही हात चांगले चोळा. बोटे, बोटांमधील भाग, नखे तसेच उलट सुलट भागांवर सॅनिटायझर लावून चांगले चोळा. या सर्व प्रक्रियेला मिनिटभराचा वेळ लागतो; पण हात सुकल्यानंतर ते स्वच्छ होतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशांनुसार वीस ते पंचवीस सेकंद हात चोळले तर किटाणू नष्ट होतात. त्यामुळे वेळोवेळी हात धुतले पाहिजेत.

हात सतत धुतल्याने काहींना त्वचा कोरडी झाल्यासारखी वाटू शकते. अशा वेळेला हात धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करू शकतो. साबण लावून हात चोळून कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. टॉवेलने कोरडे केल्यानंतर हाताला मॉईश्‍चरायझर लावता येईल. त्यामुळे त्वचा शुष्क होण्याची भीती राहणार नाही.

हातांची स्वच्छता ही आपल्या शारीरिक स्वच्छतेची पहिली पायरी आहे. हातांपासूनच तर रोजच्या कामांना आपण सुरुवात करतो. त्यामुळे लहानपणी आपल्याला शिकवलेल्या स्वच्छतेच्या गोष्टी आपण मुलांना शिकवताना पुन्हा आपल्या अंगी बाणवा त्यामुळे मुलांचे आणि आपलेही आरोग्य आपल्याच हातात राहील. बाकी प्रदूषणकारी वातावरणात जंतुसंसर्ग होत राहणार; पण किमान आपल्या स्वतःच्याच हातातून त्यांना पोटात जायला वाव आपण राहू द्यायचा नाही. संतांनी म्हणून ठेवले आहे की ‘नाही निर्मल जीवन, काय करील साबण?’ तशाच प्रकारे आता ‘करा हाताची स्वच्छता, तरच आहे जीवन निर्मल राहण्याची शक्यता’ हेही सांगितले गेले पाहिजे. त्यासाठीच हस्तशुद्धी दिनाचे औचित्य आहे. १५ ऑक्टोबर हस्तशुद्धी दिनापासून हात धुण्याचा कंटाळा सोडून चांगल्या सवयी लावून घेऊ या.

*अप्पासाहेब पाटील*

*संकलन : मिलिंद पंडित, कल्याण*

********************************

टिप्पण्या