वैशिष्ट्यीकृत पोस्ट

महाराष्ट्रातील कुंभार समाज

  *महाराष्ट्रात कुंभार समाजाच्या पोट जाती* 

थोर संशोधक आर. के. गुलाटी यांनी महाराष्ट्रात कुंभाराच्या पोटजाती सांगितलेल्या आहेत (इरावती कर्वे हिंदू समाज अन्वयार्थ पृ 119)


*१) मराठा कुंभार*- या देशात सर्वत्र आढळतो. या जातीच्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. ते मराठी बोलतात. कोल्हापुरात यांची मोठी वस्ती आहे. त्यांचा पोषाख कुणब्या सारखा असतो. ते मडके, विटा, कौले, खेळणी व मुर्त्या तयार करतात, पुरुष चाक वापरतात तर स्त्रिया हाताने भांडी घडवतात.


*२) गुजराती कुंभार-* महाराष्ट्र व गुजरात यांच्या समुद्रकिनारी भागात राहतात व त्यांनाच लाड किंवा प्रजापती अशी नावे आहे तसेच घरघडे व ओझा अशी ही नावे आहेत. घरघडे म्हणजे मडकी घडविणारे ओझा (संस्कृत उपाध्याय) म्हणजे धर्मगुरू हे कुंभार यांचे पुरोहित म्हणून काम पाहतात.


*३) कोकणी कुंभार-* रत्नागिरी, कारवार अशा जिल्ह्यामध्ये सर्वत्र आढळतात


*४) राणा कुंभार-* नागपूर, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, अकोला, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात यांची वस्ती आहे


*५) अहीर कुंभार-* यांना लहान चाके असेही म्हणतात. ते खानदेशातील धुळे जिल्ह्यात यांचा वास्तव्य असून ते थोर चाक कुंभार पासून वेगळे झालेअशी त्यांची समजूत आहे


*६) लाड कुंभार-* यांना थोर चाके म्हणतात, त्यांच्या चाकाचा व्यास सुमारे चार फूट किंवा अधिक असतो. ते जळगाव जिल्ह्याचे रहिवासी आहेत.


*७) परदेशी कुंभार-* महाराष्ट्रात हिंदी बोलणाऱ्या व बाहेरून वस्ती करून राहणाऱ्यांना परदेशी कुंभार म्हणतात.


*८) तेलंगी कुंभार-* हे मराठवाडा व चांदा जिल्ह्यात राहतात.


*९) लिंगायत कुंभार*- कर्नाटक राज्य आणि सोलापूर, कोल्हापूर व मराठवाडा येथे त्यांची वस्ती आहे. लिंगायत असल्यामुळे ते गळ्यामध्ये लिंग अडकवतात.


*१०) कुरेरे कुंभार-* विदर्भ रत्नागिरीचा काही भाग या भागात राहणारे कुंभार माती कुटण्यासाठी किंवा बारीक करण्यासाठी दगडी पाट्याचा वापर करतात त्यांची संख्या महाराष्ट्रात अत्यल्प आहे.


*११). हातघडे कुंभार-* सांगली, कोल्हापूर जिल्ह्याचा काही भाग, सोलापूर जिल्ह्याचा उत्तरेकडील भागात आढळतात. घागरी, कुंड्या, रांजण इत्यादी वस्तू ते हाताने तयार करतात म्हणून त्यांना हातघडे कुंभार असे म्हणतात


*१२). गधेरिया कुंभार-* कुंभार कामासाठी स्वतःची गाढवे पाळणारा कुंभार हा चंद्रपूर, नागपूर, बीड इत्यादी जिल्ह्यात थोड्याफार प्रमाणात आढळतो यांची संख्या अत्यल्प आढळते.


अशा बारा प्रकारात कुंभार समाजाची पोटजाती आढळून येतात, महाराष्ट्रात कुंभार समाजाच्या ज्या विविध संघटना आहेत. त्यांनी केलेल्या सर्वेक्षणातून २०१२ पर्यंत ८० लाख लोकसंख्या ही पाहणीतून समोर आली आहे.

टिप्पण्या