वैशिष्ट्यीकृत पोस्ट
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
वाचनअध्ययनासाठी संगीतोपचार
शिक्षणाने मनुष्य सुसंस्कारित होतो. शिक्षणाने मन व बुद्धी प्रगल्भ होते. शिक्षणाचे ध्येय विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास करणे हे आहे. विद्यार्थ्याचा शारीरिक,मानसिक,भावनिक व बौद्धिक विकास शिक्षणातुन होत असतो. किन्बहुना शिक्षणाचे ते ध्येय आहे. परन्तु शिक्षणाचे अंतिम ध्येय माणुस घडविणे हे आहे. जगण्याची कला शिकविते ते शिक्षण,सुप्त गुणांना प्रकटीकरण करण्यास प्रवृत्त करते ते शिक्षण. अशा शिक्षणाच्या अनेक व्याख्या आपल्याला करता येतात. मनुष्य आजन्म काहीनाकाही तरी शिकतच असतो. परंतु रुढार्थाने औपचारिक शिक्षणाची सुरवात प्राथमिक शाळेत होते. प्राथमिक शाळेतील शिक्षणात भाषा व गणित हे दोन विषय अत्यंत महत्वाचे. हे दोन विषय जेवढे पक्के तेवढी विद्यार्थ्याची पुढील शिक्षणाची इमारत पक्की. त्यातुनच हे दोन्ही विषय विद्यार्थी मातृभाषेतून शिकल्यास पाया अधिक दृढ होतो. पण माझ्या लेखाचा तो विषय नसून शिक्षण प्रक्रियेतील एक महत्वाचे अंग ‘वाचन’ व या‘वाचन अध्ययन व संवर्धनासाठीसंगीतोपचार’ या विषयावर मी हा लेख लिहीत आहे.
कोणत्याही विषयाच्या अध्ययनाची सुरवात श्रवण,भाषण,वाचन व लेखन या टप्प्यानेच होते. यातील प्रत्येक पायरी महत्वाची. भाषा शिक्षणाची ही एक शृंखलाच आहे. यातील एक कडी जरी विस्कळीत झाली अथवा तुटली तर विद्यार्थी पुढील पायरीवर जाऊ शकत नाही. त्यामूळे वाचन येण्यासाठी श्रवण व भाषण या कौशल्यांचा विकास होणे व ही कौशल्ये दृढ होणे अत्यंत महत्वाचे आहे. म्हणुन माझ्या लेखाचे तीन भाग करीत आहे –
१) वाचनपूर्व तयारी करिता संगीतोपचार
२) प्रत्यक्ष वाचन अध्ययना करितासंगीतोपचार
३) आशय आकलन व ज्ञानधारणेकरीता संगीतोपचार
वाचन संवर्धनासाठी संगीताचा वापर जगभरात अनेक ठिकाणी केला जात आहे. संगीतोपचार पद्धती अतिशय प्राचीन असून आधुनिक युगात ती पुनर्शोधित व पुनरस्थापित होत आहे. आपल्या पूर्वजांना संगीताची ताकद माहीत होती व राग संगीताने अनेक व्याधी दूर करण्याचा प्रयत्न केला जात असे. परंतु भारतीय शास्त्रीय संगीतावर आधारित संगीतोपचार याविषयी फारसे लेखन आढळत नाही. २०१२ साली American Association Of Music Therapistया संस्थेच्या २७० music therapist नी शिशुगट व शाळेत जाणार्या विद्यार्थ्यांवर प्रयोग करून वाचनात संगीत माध्यम (Music Intervention) म्हणून काम करते हे सिद्ध केले.
वाचन अध्ययना करिता संगीतोपचार या विषयाचा ऊहापोह करण्यापूर्वी या मधील दोन अत्यंत महत्वाच्या गोष्टी सुरवातीला समजावून घेऊ.
१) वाचन म्हणजे काय?
२) संगीतोपचार म्हणजे काय?
वाचन म्हणजे काय?
वाचनात दोन प्रमुख गोष्टींचा समावेश होतो –
१) छापील शब्दांची ओळख
२) भाषेचे आकलन
परंतु केवळ शब्द ओळख व भाषेचे आकलन म्हणजे वाचन नाही. त्यामध्ये अनेक घटकांचा समावेश होतो. पुढील आकृती वरुन उत्तम वाचन येण्यासाठी आवश्यक घटक कोणते आहेत हे स्पष्ट होईल –
वरील आकृतीवरून वाचन येण्यासाठी कोणती पूर्व तयारी करावी लागेल हे लक्षात येते. वाचन येण्यासाठी पुढील गोष्टींचा विचार वाचनपूर्व तयारीत करावा लागेल –
१) विद्यार्थ्याची कौटुंबिक व सामाजिक पार्श्वभूमी लक्षात घ्यावी लागेल.
२) श्रवणाच्या माध्यमातून शब्द संपत्ती वाढवावी लागेल.
३) भाषणाच्या माध्यमातून शब्द उच्चारण कसे असावे हे शिकवावे लागेल.
४) जोडशब्दांचे उच्चारण, इंग्रजी सारख्या विषयात शब्दांचे उच्चारण व स्पेलिंग वाचन कसे असावे.
वाचनात पुढील प्रक्रियांचा समावेश होतो –
१) आकलन प्रक्रिया
२) मानसिक प्रक्रिया
३) सामाजिक प्रक्रिया
४) शरीर विज्ञानप्रक्रिया
५) व्यक्त होण्याचीप्रक्रिया
६) भाषिकप्रक्रिया
७) भाषिक चातुर्य प्रकटीकरणाचीप्रक्रिया
या प्रक्रियांचा विचार करता वाचन ही एक गुंतागुंतीची व अनेक प्रक्रियांचा समावेश असलेली कृती आहे.
वाचनात समाविष्ट असणार्या वरील सर्व प्रक्रियांचा विचार संगीतोपचार पद्धतीत करावा लागतो. या सर्व प्रक्रिया शारीरिक व मानसिक असल्याने संगीतोपचार पद्धतीत विशिष्ट रागांची व त्यावर आधारित गीते, धून यांची निवड करावी लागेल. वाचन ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया असल्याने विद्यार्थ्याचे डोळे, कान, हात, तोंड व मेंदू यांच्यातील योग्य समन्वयाने व सरावाने वाचन येऊ शकेल. हाताने पुस्तक पकडणे, डोळ्यांनी शब्द पहाणे, तोंडाने शब्दोच्चार करणे, कानाने ऐकणे व मेंदू द्वारे अर्थ लावणे या गोष्टींचा वाचन प्रक्रियेत साधारणपणे समावेश होतो. त्याकरिता वाचनपूर्व तयारीआवश्यक ठरते.
वाचन म्हणजे साक्षरता. परंतु केवळ लिहिता वाचता येणे म्हणजे साक्षरता नसून भाषा व प्रतिमा यांचा वापर करून वाचणे, लिहणे,ऐकणे, बोलणे, विचार व्यक्त करणे व कल्पनांबद्दल तर्कशुद्ध विचार करण्याची पात्रता अंगी निर्माण होणे म्हणजे साक्षरता होय.
संगीतोपचार म्हणजे काय?
संगीताने चराचर व्यापले आहे. लहान मुलांपासून वृद्धानपर्यंत आणि प्राण्यांपासून वनस्पतीं पर्यन्त सर्वांनाच संगीत आवडते. संगीताची नुसती धून कानावर पडली तरी प्रसन्न वाटते. हीच संगीताची जादू आहे. संगीत न आवडणारी व्यक्ति साक्षात पशू आहे असे शास्त्रकारांनी म्हटलेच आहे. संगीतोपचारामध्ये संवाद,शिक्षण, बदल व उपचाराचे साधन संगीत असते. ढोबळ मानाने संगीतोपचार म्हणजे,“संगीताचा वापर करून विविध मानसिक व शारीरिक व्याधी दूर करणे” असे म्हणता येईल. परंतु संगीतोपचारामध्ये केवळ संगीत एकविणे व आजार बरे करणे अपेक्षित नाही. संगीताने मानवी मन प्रफुल्लित, उत्साहित,ताजेतवाने होते (Mood Elevation). मग ‘मन चंगा तो कटौती मे गंगा’ या उक्तीनुसार व्यक्ति सर्वच पातळीवर उत्तम कार्य करू लागते. रामदास स्वामींनी मनाचे श्लोकांची रचना केली ज्यात ते म्हणतात,“मना त्वाची रे पूर्वसंचित केले,तयासारखे भोगणे प्राप्त झाले” मनाचे प्रचंड सामर्थ्य रामदास स्वामी मनाचे श्लोकांतून सांगतात. तात्पर्य या मनाला चैतन्य देणारे आपले भारतीय संगीत आहे. भारतीय संगीतात प्रामुख्याने राग संकल्पना मांडली आहे. संगीतोपचारामध्ये रागांचा वापर करून उपचार केला जातो. प्राचीन ‘राग चिकित्सा’ या ग्रंथात राग आणि संगीतोपचार याचा उल्लेख आढळतो. संगीताचा साधक जर सामर्थ्यवान असेल तर त्याच्या सूरात कोणताही रोग बरा करण्याचं सामर्थ्य नक्कीच असते असे मला वाटते.
भारतीय संगीतोपचारतील प्रमुख घटक म्हणजे राग. राग म्हणजे विशिष्ट स्वरांची आरोही अवरोही रचना. कमीत कमी पाच स्वर एकत्र येऊन राग तयार होतो. परंतु त्या ही पलीकडे रागाला एक विशिष्ट भाव असतो. ‘रंजयते इति राग:’ ही शास्त्रकारांनी केलेली रागाची व्याख्या अतिशय योग्य आहे. राग गाण्याच्या ठराविक वेळा असतात. विशिष्ट वेळी विशिष्ट राग ऐकल्यास फायदा होतो. एका दिवसाचे चोवीस तास व तीन तासाचा एक प्रहर मानल्यास दिवसाचे चार व रात्रीचे चार प्रहर होतात. प्रत्येक प्रहराचे राग कोणते हे शास्त्रकारांनी सांगितले आहे. या प्रत्येक प्रहरात आपल्या शारीरिक व मानसिक पातळीवर ही बदल होत असतात. आपले शरीर त्रिदोषांवर आधारित आहे असे आयुर्वेद सांगते. हे त्रिदोष म्हणजे – कफ,पित्त, वात. आपल्या शरीरात सकाळी कफ प्रवृत्ती, दुपारी पित्त प्रवृत्ती, तर संध्याकाळी वात प्रवृत्ती आढळते. पुन्हा रात्री कफ,मध्यरात्री पित्त व पहाटे वात प्रवृत्ती आढळते. अर्थात व्यक्तिनुसार या त्रिदोषांचे प्राबल्य कमी जास्त असते. हे त्रिदोष संतुलित ठेवण्यासाठी राग संगीताचा वापर करता येतो. किंबहुना आपल्या रागांची रचना तशी आढळते. संगीतोपचारात संगीत व आयुर्वेद यांचा उत्तम ताळमेळ असावा लागतो.
भैरवी सारखा राग सायनस,अलर्जी, हे विकार दूर करतो. यमन (कल्याण) राग थकवा व नैराश्य दूर करतो, तणाव मुक्ती साठी त्याचा वापर करतात. पुढील तकत्यामध्ये राग व ते कोणत्या व्याधींवर उपयोगी आहेत तसेच राग ऐकण्याची योग्य वेळ दिली आहे. त्याचा अभ्यास करून आपण साधारण संगीतोपचार सुरू करू शकतो.
प्रत्येक व्यक्तिला राग संगीतच एकविले पाहिजे असे नाही. ज्या व्यक्तिला जे संगीत ऐकणे प्रिय वाटते ते संगीत त्याच्याकरिता संगीतोपचाराचेच काम करते. परंतु वाद्यांचा कल्लोळ म्हणजे संगीत नव्हे. भारतीय संगीताचा पाया स्वरमाधुर्य (Melody) आहे स्वरमेळ (Harmony)नव्हे.साधारणपणे द्रुत गतीतील संगीत जोश (चैतन्य) निर्माण करते तर संथगतीतील संगीत मनाला शांती देते.
भारतीय व पाश्चात्य संगीतोपचार पद्धती फरक
संगीतोपचाराच्या दोन पद्धती आहेत –
१) निष्क्रिय संगीतोपचार पद्धती (Passive Music Therapy) –यामध्ये व्यक्तीने फक्त संगीत ऐकणे अभिप्रेत असते. व्यक्ति या पद्धतीत निष्क्रिय राहून फक्त ऐकण्याचे काम करते. या पद्धतीचे संगीतोपचार सर्व प्रकारच्या व्याधींमध्ये व परिस्थिती मध्ये करता येतात. भारतीय संगीतोपचार पद्धती याच प्रकारात मोडते.
२) सक्रियसंगीतोपचार पद्धती (Active Music Therapy)–या पद्धतीतकेवळ संगीत ऐकणे अभिप्रेत नसून सहभागी व्यक्ति गाणी गाते, वाद्य वादन करते, नृत्य करते, कविता अथवा गीत लेखन करते.
या संगीतोपचारा द्वारे प्रामुख्याने आटीझम, पार्किंसन,अल्झायमर यासारख्या चेतासंस्थेशी निगडीत व्याधींवर उपचार करता येऊ शकतो. अर्थात संगीतोपचार ही एक परामेडीकल थेरपी असून रुग्णाने आपला नेहमीचा औषधोपचार चालूच ठेवायचा असतो. संगीतोपचाराने व्याधींची तीव्रता कमी होण्यास मदत होते.आटीझम सारख्या व्याधीमध्ये संगीतोपचाराचा खूपच फायदा होतो व सकारात्मक बदल दिसून येतो.
पाश्चात्य संगीतात आनंदी वातावरण तयार करण्यासाठी प्रामुख्याने मेजर कॉर्डसचा वापर करतात तर मायनर कॉर्डसभीती, अचंबा, करुणा हे भाव निर्माण करतात.
आपल्या मेंदुमधील संगीत ग्रहण करणार्या पेशी सदैव कार्यरत असतात व कोणत्याही प्रकारच्या शारीरिक अकार्यक्षमतेचा त्यांच्यावर परिणाम होत नाही असे दिसून आले आहे. संगीतोपचाराचे पुढील परिणाम दिसून येतात –
१) मेंदू लहरी – संगीताने मेंदुमध्ये लहरी निर्माण होतात. द्रुत लयीतील संगीत ऐकल्याने तीव्र एकाग्रता व तर्कशुद्ध विचार शक्ति साधता येते. मंद लयीतील संगीत शांतता व धारणाशकती निर्माण करते.
२) श्वासोच्छवास व हृदयाची गती नियमित होते.
३) मनाची अवस्था बदलते.
४) रक्तदाब कमी होतो. रोगप्रतिकार शक्ति वाढते. स्नायू शिथिल होतात व वेदनेपासून मुक्ति
मिळते.
५) शारीरिक व बौद्धिक क्षमता वाढतात.
६) सामाजिक कौशल्य वाढीस लागतात.
७) स्वत:ची ओळख होते.
८) आत्मविश्वास वाढीस लागतो.
९) चित्त एकाग्र होते. भाव बदलतात.
१०) Motor skill,Language skill वाढीस लागतात.
११) ताण हलका होतो. नैराश्य कमी होते.
१२) आध्यात्मिक शक्ती वाढते. आंतरिक शांतता मिळते.
पाश्चात्य संगीतोपचार पद्धतीमध्ये - १) संगीत ऐकणे.
२)वैयक्तिक व समूहगायन करणे, अंताक्षरी मध्ये सहभागी होणे.
३)वाद्य वादन करणे.
४) संगीतावर नृत्य करणे.
५) गीत लेखन करते.
यांचा समावेश होतो. याशिवाय तुमच्या आवडीचे गाणे तुम्ही सादर करू शकता. त्यातील भावावर विचार व्यक्त करू शकता. विशिष्ट प्रकारचे संगीत तुम्हाला ऐकवून त्याबद्दल तुम्हाला काय वाटते? यावर तुम्हाला व्यक्त होण्यास सांगितले जाते.
वरील विवेचनावरून वाचन संवर्धनासाठी भारतीय तसेचपाश्चात्य संगीतोपचार पद्धतींचा उपयोग होऊ शकतो हे आपल्या लक्षात येते.विशेषत: वाचनपूर्व तयारी व वाचन अध्ययनाकरिता पाश्चात्य संगीतोपचार पद्धती उपयुक्त आहे. ज्ञान संपादन व ज्ञानधारणा याकरिता भारतीयसंगीतोपचार पद्धती प्रभावी ठरू शकते. त्या दृष्टीने या पद्धतींचा वापर करून वाचन संस्कार कसे करता येतील हे पुढे पाहू.
१) वाचनपूर्व तयारी करिता संगीतोपचार
वाचनपूर्व तयारी मध्ये प्रामुख्याने –
* श्रवण कौशल्य विकसित करणे
* भाषण (संभाषण) कौशल्य विकसित करणे
* शब्द उच्चारण शास्त्र शिकविणे यांचा समावेश होतो.
* श्रवण कौशल्य व भाषण (संभाषण) कौशल्यविकसित करणे -
श्रवण कौशल्य व भाषण (संभाषण) कौशल्य वेगवेगळे विकसित करण्याऐवजी श्रवणानंतर लगेचच भाषण करण्यास विद्यार्थ्यांना प्रवृत्त करावे. श्रवण कौशल्य विकसित करण्याकरिता विद्यार्थ्यांना वयोगटानुसार तालावर आधारित विविध बडबडगीते, बालगीते, कविता, कृतियुक्त गीते ऐकवावीत. तालावर हाताने ठेका देऊन, टाळी वाजवून हीच गीते गाऊन घ्यावीत. या गीतात सातत्याने ठेक्यावर जोर द्यावा. कारण विद्यार्थी ठेक्याला छान प्रतिसाद देतात असे आढळून आले आहे. या गीतांमध्ये rhythmic pattern असलेली गीते निवडावीत. एकच अक्षर अथवा शब्द पुन्हा पुन्हा येणारी अनेक बडबड गीते आहेत (उदा.अ आ आई, म म मका ) त्यांना विशेष अर्थ नसला तरी चालेल. परंतु यातून विद्यार्थ्याँच्या कानावर वारंवार एकच अक्षर अथवा शब्द पडतो. जे अक्षरअथवा शब्द शिकवायचा आहे अशा अक्षरावर/शब्दावर टाळी द्यावी व ते जोर देऊन म्हणावे. अशी गाणी शिक्षकांनी स्वत: तयार केली तरी चालतील अथवा पारंपारिक गीते निवडावीत. विद्यार्थ्याँच्या वयोगटानुसार जाणीवपूर्वक गीतांची निवड करावी. अशीsongs books पाश्चात्य देशात वाचन शिकविण्याकरिता सर्रास वापरतात. यातील गीते बहुधा पारंपारिक असतात कारण ही गीते व त्यांच्या चाली पालकांच्या परिचयाच्या असतात व बाजारात त्यांच्या सीडी सहज उपलब्ध असतात.
या गीतांवरच विद्यार्थ्याँचे कृतियुक्त हावभाव करून घ्यावेत. विद्यार्थ्यांना ठेक्यावर नाच करण्यास सांगावे. संगणकावर प्रोजेक्टरच्या साहाय्याने गीतांची ध्वनीचित्रफीत दाखवून विद्यार्थ्यांना गायला व नृत्य करण्यास सांगावे. काही ध्वनीचित्रफीती मध्ये गीताच्या शब्दांची(बोल) पट्टी खाली येत असते व उच्चारला जाणारा शब्द विशिष्ट रंगात हाइलाईट होत असतो. विद्यार्थी ती अक्षरे पाहतात. वाचनपूर्व तयारीत अशा ध्वनीचित्रफीती अतिशय महत्वाची भूमिका बजावतात.
वाचनपूर्व तयारी मुळे विद्यार्थ्यांमध्ये पुढील कौशल्ये विकसित होतात –
१) विद्यार्थ्यांची मोटर स्किल विकसित होतात.
२) विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची हालचाल डावीकडून उजवीकडे होते.
३) शब्दसंपत्ती वाढते. विद्यार्थी शब्दांचा उच्चार कसा करावा हे शिकतात.
४) विद्यार्थ्यांचे चित्त एकाग्र होते.
वाचनपूर्व तयारी करिता म्हणून घ्यावयाची गीते – बडबड गीते, बालगीते, लयप्रधान गीते, अक्षर व शब्द गीते, तसेच कृतियुक्त गीते पुढे देत आहे. ही गीते उदाहरण म्हणून येथे देत आहे. शिक्षक स्वत: गीते तयार करू शकतात. या लेखात प्रामुख्याने बालवाडी मोठा गट ते इयत्ता सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या वयोगटाचा विचार केला आहे. वाचनात अडथळा येणारी, वाचन अजिबातच न येणारी व वाचनास सुरवात केलेली अशा सर्वच स्तरातील विद्यार्थ्यांकरिता ही संगीतोपचार पद्धती काम करते. वाचनात अप्रगत असणार्या विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना पुन्हा पुन्हा या पद्धतीने अध्यापन करावे लागेल. सर्वसाधारण तसेच हुशार विद्यार्थी या पद्धतीने जलद गतीने वाचन शिकतील. शिक्षकांनी आपण करीत असलेल्या प्रयोगाची माहिती (data) संकलित करावी. त्याचे विश्लेषण करून त्रुटि असल्यास दूर कराव्यात व पुन्हा नव्याने अध्यापन करावे. असे केल्यास परिणाम (results) चांगले मिळतील.
बडबड गीते
एवढा मोठा भोपळा
आकाराने वाटोळा
त्यात बसली म्हातारी
म्हातारी गेली लेकीकडे
लेकीने केले लाडू
लाडू झाले घट्ट
म्हातारी झाली लठ्ठं
|
चांदोबा लपला झाडीत
आमच्या मामाच्या वाडीत
मामाने दिली साखर माय
चांदोबाला फुटले पाय
चांदोबा गेले राईत
मामाला नव्हते माहीत
|
एक होत झुरळ
चालत नव्हतं सरळ
तिकडून आली बस
बस मध्ये बसल
तिकीट नाही काढलं
तिकीट चेकरने पाहिलं
चिमटीत धरून फेकल
|
बालगीते
गोरी गोरी पान,फुलासारखी छान
दादा मला एक वहिनी आण
गोर्या गोर्या वाहिनीला अंधाराची साडी
अंधाराच्या साडीला चांदण्याची खडी
चांदण्याच्या खडीला बिजलीचा वाण
वाहिनीला आणायला चांदोबाची गाडी
चांदोबाच्या गाडीला हरणाची जोडी
हरणाची जोडी तुडवी गुलाबाचे रान
वाहिनीशी गट्टी होता तुला दोन थापा
तुला दोन थापा तिला साखरेचा पापा
बाहुल्यांशी खेळताना दोघे आम्ही सान
|
फुलपाखरू फुलपाखरू
छान किती दिसते
या वेलीवर फुलांबरोबर
गोड किती हासते
पंख चिमुकले निळे जांभळे
हालवुनी झुलते
डोळे बारीक करीती लुकलुक
गोल मणी जणू ते
मी धरू जाता येई न हाता
दूरच ते उडते
|
लयप्रधान गीत
फुगडी खेळू ग फिरकीची
तिरक्या ग गिरकीची
फिरतील वेण्या गर गर गर
करतील पैंजण थर थर थर
भुईवर चित्र ग कमळाची
फुगडी खेळू ग फिरकीची
तिरक्या तिरक्या ग गिरकीची
गोरा गोरा एक मनोरा
फिरता तरीही उभा भोवरा
सीमा झाली ग हौसेची
फुगडी खेळू ग फिरकीची
तिरक्या तिरक्या ग गिरकीची
|
अक्षर व शब्द गीत
अ अ अननस आंबट गोड मस्त
आ आ आईची माया सर्वात जास्त
इ इ इमारत किती किती उंच
ई ई ईडलिंबू छान लागत लोणच
उ उ उखळ मुसळाची जोडी
ऊ ऊ उसाची चाखली का गोडी
ए ए एडक्याची शिंगे गोल गोल
ऐ ऐ ऐरणीवर जपून मारा टोल
ओ ओ ओढा ओढ्यात आहे पाणी
औ औ औषध चव सांगेल का कुणी
अं अं अंबारीत राजाची शान
अ: अ: अ च्या पुढे विसर्ग किती छान
क क कप रोज पितो चहा
ख ख खटारा आवाज याचा पहा
ग ग गवत हिरव हिरव दिसत
घ घ घर छान कौलारू असत
च च चमचा खाऊच्या बशीत
छ छ छत्रीत आम्ही आहोत खुशीत
ज ज जहाज पाण्यावर चालत
झ झ झबल बाळाला शोभत
ट ट टरबूज थंड थंडगार
ठ ठ ठसा कागद ठेवा तयार
ड ड डबा डब्यात खाऊ
ढ ढ ढग आले भिजायला जाऊ
ण ण बाण सण सण सण
त त तलवार खण खण खण
थ थ थवा उडतो आकाशात
द द दरवाजा चला या घरात
ध ध धनुष्य बाणाची जोडी
न न नाथीची नाकात कडी
प प पणती दारापुढे लावली
फ फ फणसाची गोडी आम्ही चाखली
ब ब बदक तुरुतरू चाले
भ भ भटजीची शेंडी हाले
म म मामा लाडका फार
य य यज्ञाला करा नमस्कार
र र रवी रवी ताक घुसळते
ल ल लसूण तिखट लागते
व व वजन दुकानात असत
श श शहामृग सांगा कुठ दिसत
ष ष षटकोणाचा आकार छान
स स ससा लांब लांब कान
ह ह हरणाचे छान छान डोळे
ळ ळ कमळ पाण्यात खेळे
क्ष क्ष क्षत्रीय हाती तलवार
ज्ञ ज्ञ ज्ञानेश्वर ज्ञानी फार
|
कृतियुक्त गीत
आई मला छोटीशी बंदूक दे ना आई मला छोटीसे विमान दे ना
बंदूक घेइन शिपाई होईन विमान घेईन पायलट होईन
ऐटीत चालीन एक दोन तीन आकाशी जाईन भर भर भर
आई मला छोटीशी तलवार दे ना आई मला छोटीशी बाहुली दे ना
तलवार घेईन सरदार होईन बाहुली घेईन तिला मी सजवीन
शत्रुला कापीन सप सप सप तिज संगे नाचेन छम छम छम
आई मला छोटीशी मोटार दे ना
मोटार घेईन ड्रायव्हर होईन
गावाला जाईन पो पो पो
|
* शब्द उच्चारण शास्त्र -
इंग्रजी भाषेत स्वतंत्र उच्चारण शास्त्र शिकवावे लागते. याचे कारण या भाषेतील एकाच अक्षरांचे भिन्न भिन्न उच्चार. उदा. A चा उच्चार अ आ अॅ असा तीन प्रकारे केला जातो तर C अक्षराचा क (कॅट) व स (सेलेब्रेशन) असा उच्चार होतो. त्यामुळे इंग्रजी भाषेत स्वतंत्र उच्चारण लिपी आढळते. मराठी भाषेत असे आढळत नाही. ‘क’ चा उच्चार ‘क’ तर ‘ख’ चा उच्चार ‘ख’ असाच होतो. परंतु ही अक्षरे उच्चारताना जीभ, ओठ, टाळू, दात यांची स्थिति कशी असते हे सांगितल्यास अक्षरांचे स्पष्ट उच्चारण करणे सोपे होईल. वाचनपूर्व तयारीत गीत गाऊन घेताना शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या उच्चाराकडे विशेष लक्ष द्यावे. श ष स, न ण, ब भ, र ल यांसारख्या अक्षरांच्या उच्चाराकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. अशी अक्षरे वारंवार आलेल्या गीतांची निवड करून ती गाऊन घ्यावीत.
२) प्रत्यक्ष वाचन अध्ययना करिता संगीतोपचार
वाचन शिकविण्याची सुरवात करताना प्रामुख्याने इयत्ता १ ली व २ री करिता अक्षर ओळख करुन देणारे लिखीत साहित्य, शैक्षणिक साहित्य, खेळणी व संगीतोपचाराकरिता विविध गीते यांची निवड करावी लागेल. इयत्ता ३ री पासून वरच्या वर्गात क्रमशः काठीण्य पातळी वाढवीत न्यावी लागेल.
वरच्या वर्गातील पण वाचनात मागे असणा-या विद्यार्थ्यांच्या वाचनात नक्की कोणते अड्थळे येतात याचा शोध घ्यावा लागेल व त्यानुसार अभ्यास घटक तयार करावे लागतील. उदा. एखादे विशिष्ट अक्षर वाचताना येणारे अड्थळे (ज्ञ,ण,न,झ),जोडशब्द वाचताना येणारे अड्थळे, काना, मात्रा, वेलांटी, उकार असलेले शब्द वाचताना येणारे अड्थळे यांचा शोध घेउन विद्यार्थ्याला अध्यापन करावे लागेल.
पुढे उदाहरणादाखल प्राथमिक स्तरावर वाचन शिकविण्याकरिता कोणते साहित्य व संगीत वापरावे हे दिले आहे. शिक्षक यावरुन अनेक उपक्रम तयार करु शकतील. वेगवेगळी अक्षरे, शब्द, वाक्य वाचनाकरीता अध्ययन कार्डे तयार करावीत. ही कार्डे व अध्ययन साहीत्य वाचनाकरिता उपयुक्त ठरतील.
* अक्षर ठोकळे किंवा शब्द ठोकळे
‘क’अक्षराचा ठोकळा तयार करावा. ठोकळ्याच्या एका बाजुला‘क’अक्षर लिहावे. ठोकळ्याच्या इतर पाच बाजुंवर क ने सुरु होणारे शब्द लिहावेत व छोटी चित्रे काडावीत. ठोकळा दाखवून क चे वाचन घ्यावे. क ने सुरु होणा-या शब्दांचे वाचन घ्यावे. तसेच अध्ययन कार्डावरील क या अक्षर गीताचे गायन करावे. याप्रमाणे क ते ज्ञ अक्षरांचे ठोकळे व गीतांची कार्डे तयार करुन बाराखडीचे वाचन घेता येईल.
क
क क कशाचा
क क काकाचा
क क किशाचा
क किशा काकाचा
क क कुसुमचा
क कुसुम काकूचा
क काका काकीचा
क का कि की
कु कू के कै
को कौ कं क:
|
ख
ख खटारा खड्खड करतो
खड्बडीत खरमरीत रस्त्यावर चालतो
खटा-यात जाउन खारुताई बसली
खाली वर खाली वर हलू लागली
खारुताई मग खुपच घाबरली
टुणकन उडी मारुन झाडावर चढली
|
ग
ग गणपतीचा
माझ्या लाडक्या बाप्पाचा
मोदक आणि गवत खातो
आम्हाला सदा बुद्धी देतो
गातो आम्ही गणपतीची गाणी
गाता होई शुद्ध वाणी
|
* अक्षर ठोकळा गीते व रिकाम्या जागा भरा
अक्षर ठोकळ्याचा वापर करुन अक्षरगीत गाण्यास सांगावे. गाता गाता विशिष्ट ठिकाणी थांबावे व रिकाम्या जागी येणारा शब्द विद्यार्थ्याला विचारावा. हा शब्द लिहून तो वाचण्यास सांगावा.
ब
ब ब बगळा ब ब बगळा
बगळा पांढरा पांढरा
बगळा पांढरा पांढरा
बगळा धरतो मासे
चोचीने खातो असे असे
|
ब
ब ब बगळा - - -गळा
--- पांढरा पांढरा
--- पांढरा पांढरा
बगळा धरतो मासे
चोचीने खातो असे असे
|
या गीतात ब ने सुरु होणा-या शब्दामधील ब अक्षर गाळून गाणे पुन्हा म्हंणावे. विद्यार्थ्याला ब अक्षर वाचण्यास सांगावे.
* अक्षर प्राणी किंवा शब्द प्राणी
अ
अ अस्वलाचा अ अस्वलाचा
अस्वल माझे नाव
मुंग्या खातो मी राव
राहतो मी जंगलात
कधी दिसतो शहरात
मी काळा केसाळू
रांगडा आणि मायाळू
|
हीच अक्षरे व शब्द निरनिराळे प्राणी (प्राण्यांचे आकार पुठ्यावर कापुन) वापरुन त्यांच्यावर लिहावीत आणि वाचून घ्यावीत. प्राण्याचे नाव ज्या अक्षराने सुरु होते ते अक्षर त्या प्राण्यावर लिहावे व प्राण्याचे गीत गाउन घ्यावे.
* अक्षर पाकीटे
या उपक्रमात वर्गातील एक विद्यार्थी पोस्टमन बनेल. वर्गातील इतर विद्यार्थ्यांना पाकीटे वाटेल. या पाकीटात अक्षर किंवा शब्द कार्ड असेल. विद्यार्थी आपल्याला आलेले अक्षर किंवा शब्द वाचण्याचा प्रयत्न करेल. वाचता येत नसल्यास शिक्षक त्या अक्षराचे गाणे गाउन दाखवतील. विद्यार्थी त्यावरून अक्षर ओळखेल व वाचन करेल.
* आठवडा वारांचे गाणे
आठवड्यातील वारांची नावे वाचता येण्याकरिता आठवडा वारांचे गाणे घ्यावे. वारांच्या शब्दांचे वाचन घ्यावे. काल, आज, उद्या या स्वरुपात वारांची नावे विचारावीत.
आठवडा वारांचे गाणे
आज कोण वार हो आज कोण वार
आज आहे सोमवार शंकराला नमस्कार
आज कोण वार हो आज कोण वार
आज आहे मंगळवार गणपतीला नमस्कार
आज कोण वार हो आज कोण वार
आज आहे बुधवार बृहस्पतीला नमस्कार
आज कोण वार हो आज कोण वार
आज आहे गुरुवार दत्ताला नमस्कार
आज कोण वार हो आज कोण वार
आज आहे शुक्रवार देवीला नमस्कार
आज कोण वार हो आज कोण वार
आज आहे शनिवार मारुतीला नमस्कार
आठवड्याचे सात वार, फिरूनी येती चक्राकार
सात वारांचे महत्व, आहे वेगवेगळे फार
|
* मॅग्नेटीक बोर्ड
मॅग्नेटीक बोर्ड व मॅग्नेटीक अक्षरे यांचा वापर करुन वाचन शिकविताना अक्षर व शब्द गीतांचा वापर करावा.
* अक्षर आठवडा
विशिष्ट अक्षर निवडून एका आठवड्यात त्या निवडलेल्या अक्षराच्या वाचनाचा सराव घ्यावा. त्या अक्षरावर आधारित विविध शैक्षणिक साहीत्य व अक्षर गीतांचा वापर करुन वाचन घ्यावे. वर्षभरातील एकूण तासिकांचे विभाजन अक्षर वाचनाकरिता कसे करता येईल याचा विचार करावा. एका आठवड्यात दोन किंवा तीन अक्षरांचा सराव घेता येईल.
* उतारा वाचन व गीते
इ ५ वी ते ७ वी च्या विद्यार्थ्यांची काठिण्य पातळी वाढलेली असेल. या विद्यार्थ्यांना पूर्ण वाक्य वाचनाचा सराव झालेला असेल. अशा विद्यार्थ्यांना उतारा वाचन करण्यास सांगावे. उता-यावर प्रश्न विचारून उत्तर उता-यात शोधण्यास सांगावे. त्यामुळे वाचनाचा सराव होतो. अवांतर वाचनही होते. शिक्षकांनी वयोगटानुसार उतारे निवडावेत.
उतारा वाचनाकरिता संगीतोपचारामध्ये उता-यामधील शब्दांचा समावेश असलेले गीत गायन करावे. गीत म्हणून झाल्यानंतर गीतातील शब्द विद्यार्थ्यांना उता-यामध्ये शोधून वाचण्यास सांगावेत. यामुळे वाचनात रंजकता येईल. पुढे नमूना उतारा व गीते दिली आहेत.
खालील उता-यामधील पुढील शब्दांवर आधारित गीते म्हणावीत –
बाळ, मनीमाऊ
छान छान छान
मनीमाऊचबाळ
कस गोर गोर पान
|
उंदीर
नवे पाहुणे नवे पाहुणे
आले आमुच्या आज घरी
उंदीर मामा त्यांचे नाव
गाव त्यांचे घरोघरी
|
चिउताई
उठा उठाचिऊताई
सारी कडे उजाडले
डोळे तरी मिटलेले
अजूनही
|
* समानार्थी व विरुद्धार्थी शब्द
समानार्थी व विरुद्धार्थी शब्द शिकविण्याकरिता अशा शब्दांचा समावेश असलेले गीत निवडावे. गीत विद्यार्थ्यांकडून गाऊन घ्यावे. गीत गायल्यानंतर गीताचे वाचन करण्यास सांगावे.
समानार्थी व विरुद्धार्थी शब्द गीत
दिवसा असतो उजेड फार
रात्री मात्र सगळा अंधार
दिवस रात्र मिळूनी जे साकारे
दिन-रजनी तया म्हणती सारे
|
वरील सर्व उदाहरणात तयार केलेली गीते छोटी छोटी आहेत. विद्यार्थ्यांना अशी छोटी छोटी गीते लक्षात ठेवण्यास सोपी जातात. शिवाय ठेका देऊन लयीत म्हणता येतात. या ठिकाणी प्रामुख्याने मराठी भाषेचाच विचार केला आहे.
वरील संगीतोपचारामध्ये ताल (rhythm), गीताचे शब्द (lyrics) व स्वरमाधुर्य (melody) यांचा विचार केला आहे. हे तिन्ही घटक एकत्रपणे विचारात घ्यावे लागतात. अर्थात काही गीते स्वरप्रधान तर काही लयप्रधान असतात.
वाचन सरावानंतर त्याला जोडून लगेचच लेखन सराव घ्यावा. यामुळे अक्षर अथवा शब्द दृढ होण्यास मदत होते.
३) आशय आकलन व ज्ञानधारणेकरीता संगीतोपचार
संगीत वाचन विकासाकरिता साहयभूत माध्यम म्हणून काम करते. आत्तापर्यंत आपण Active Music Therapy चा विचार केला. वाचन केल्यानंतर वाचनातील आशयाचे आकलन होण्याकरिता भारतीय संगीतोपचार पद्धतीचा वापर फायदेशीर ठरतो (Passive Music Therapy). वाचनाचे संस्कार करणे, ज्ञानाचे दृढीकरण करणे तसेच वाचनाला आवश्यक मनाची एकाग्रता व शारीरिक बैठक या गोष्टी संगीतोपचाराद्वारे साध्य करता येतात. या करिता पुढे दिलेल्या रागांच्या वाद्यावर वाजवलेल्या धून दिलेल्या वेळेत विद्यार्थ्यांना एकवाव्यात. शक्यतो या धून एकेका विद्यार्थ्याला कानाला हेडफोन लाऊन ऐकवाव्यात. दिवसातून सुरवातीला १५ ते २० मिनिटे व पुढे पुढे ३० ते ४० मिनिटे हे राग संगीत ऐकवावे. रागांवर आधारित गीतांची निवड करून अशी गीते ही ऐकविता येतील.
रागाचे नाव
|
राग ऐकण्याचे फायदे
|
राग ऐकण्याची योग्य वेळ
|
भीमपलासी
|
एकाग्रता साधता येते,मंदबुद्धी दूर होते
|
दुपारी १ ते ४
|
बागेश्री
|
तणाव मुक्ती साधता येते,गुरुचे अध्यापनात लक्ष देउन एकाग्रता साधता येते.
|
रात्री ९ ते १२
|
यमन (कल्याण)
|
तणाव मुक्तीसाठी ऐकावा. मनाला ताजेतवाने वाट्ते.
|
संध्याकाळी ६ ते ९
|
तोडी
|
डोकेदुखी दूर होते.
|
सकाळी ९ ते १२
|
अहीर भैरव
|
सांधेदुखी दूर करतो
|
सकाळी ८ ते १०
|
आनंद भैरवी
|
पोट्दुखी दूर करतो
|
सकाळी १० ते १२
|
चारुकेशी
|
मनाला ताजेतवाने करतो.
|
सकाळी ९ ते १२
|
हंसध्वनी
|
ऊर्जा देतो. सकारात्मक विचारशक्ति देतो.
|
संध्याकाळी ७ ते १०
|
काफी
|
स्वमग्नता कमी करतो.
|
दिवसात केंव्हाही
|
किरवानी
|
मानसिक व शारीरिक पातळीवर ध्यानधारणेस उदयुक्त करतो.
|
मध्यरात्री
|
शिवरंजनी
|
ध्यानधारणे करिता अतिशय उपयुक्त राग. नैराश्य कमी करतो. उष्णतेच्या विकारावर उपयुक्त. आरोग्य उत्तम राखण्याकरिता उपयुक्त.
|
मध्यरात्री
|
शंकराभरणम
|
असाध्य मानसिक विकार(mental disorders) बरे करु शकतो.
|
सर्व कालीन राग मुख्यत्वे संध्याकाळी ऐकतात.
|
सिंध भैरवी
|
मनातील पाप भावना व दु:ख दूर करतो. अनामिक भीति दूर करतो.
|
सकाळी ९ ते १२
|
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा