वैशिष्ट्यीकृत पोस्ट

आदर्शांचा मानबिंदू छत्रपती शिवराय

आदर्शांचा मानबिंदू छत्रपती शिवराय


जगातील सर्वाच्च आदर्शांचा मानबिंदू म्हणजे छत्रपती शिवराय .....
असंख्यांनी केले सर्वस्व त्याग तुजसाठी...
अनेकांनी केले बलिदान..
वंदन तयांसी करुनिया आज
गाऊ शिवछत्रपतींचे गुणगान...!!
             आज साडेतीनशे वर्षानंतरही माझ्या राजाचं,मावळ्यांच,स्वराज्याचं गुणगान   या सह्याद्रीच्या खोऱ्यात घुमतय ..अन काल जन्माला आलेलं लेकरू सुद्धा जय जिजाऊ हे नाव ऐकताच जय शिवराय एक ठेक्यातच म्हणतंय काय जादू आहे जिजाऊ नावात शिवराय नावात.. जिजाऊ -शिवराय हे नाव ऐकले कि आम्हाला आमचा स्वाभिमान आमचा तो सोनेरी  इतिहास डोळ्यासमोर उभा ठाकतो ते किल्ले ते बुरुज ,ते मावळे ती रयत त्या आऊसाहेब, ते शहाजी राजे,ते शिवराय ते बाल शंभूराजे सार काही आठवायला लागतं ..कसा घडला इतिहास.. कस उभा राहील स्वराज्य कसे लढले असतील मावळे कसे पाहिले असतील विजयाचे सोहळे काय संस्कार केले असतील आऊसाहेबांनी शिवशंभू वरती..? कसा जीव ओवाळून टाकला असेल मावळ्यांनी स्वराज्यावर ..हे सार कसं घडलं असेल हे ऐकण्यासाठी हे डोळ्यामोर उभे करण्यासाठी आम्ही पुस्तकाकडे धावतो... कारण पुस्तकाने आमचे मस्तक सुधारते,आणि हे सुधारलेल मस्तक काय वाचावं हे सांगत..! अनेक पुस्तक अनेक लिखित भौतिक साधनातुन आम्हाला इतिहासाची अनुभूती येते, अनेक वेळा अंगावर शहारे उभे राहतात..!कसा असेल तो काळ....!कशी असेल प्रजा...छत्रपती शिवराय नसते तर काय झाले असते हा विचार सुद्धा किती भयंकर वाटू लागतो...!शिवजन्मपूर्वी काय अवस्था असेल महाराष्ट्राची...!
    मोगल ,आदिलशहा,सिद्दी,पोर्तुगीज यांच्या जुलूम जबरदस्तीने सामान्य प्रजा गांजली होती गनिमी वादळाने तुर्कस्थान,अफगानीस्तान प्रांतातून भारतभूमीत प्रवेश करून या भारत भूमीचा हा राष्ट्रवृक्ष उध्वस्त केला होता, अनेक शाह्यांनी या राष्ट्रवृक्षावर घरटी बांधली होती,अपमानात सुडात महाराष्ट्राची जनता चिरडली होती, भरडली जात होती,मोघलांच्या टापाखाली चिरडलेली रयत न्याय कुणाकडे मागणार होती...? महाराष्ट्रातले अनेक वतनदार,मोघलांसारखे रानबोक्यासारखे माजले होते,परंतू या रानबोक्याना फाडून खाणारा सिंह सह्याद्रीच्या मुशीत आणि जिजाऊंच्या कुशीत जन्माला आला. सुर्याहून तेज तळपणारा हे आमुचे शिवराय जन्माला आले,माझ्या रयतेचे राजे,स्वराज्याच स्वप्न आऊसाहेबांनी जन्मास घातले ..!
        आऊसाहेब...! होय शहाजीराजे आणि आऊसाहेबांनीच जन्मास घातले..आऊसाहेब म्हणजे मातृत्वाचा महान्मंगल आदर्श होय..!शहाजीराजे म्हणजे सिंधुसुधाकरासारखे प्रचंड बलशाली,उदार,पराक्रमी व अर्थकलांमध्ये विशारद स्वराज्याची संकल्पनेची ठिणगी पेटून आपल्या मुलास सर्वगुण संपन्न बनवणारा आदर्श पिता म्हणजे शहाजी राजे होय.
जन्म-
       इ.स.19 फेब्रुवारी 1630(फाल्गुन वद्य तृतीया,शके 1551) रोजी पुण्यापासून जवळच असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर सह्याद्रीच्या मुशीत  आणि जिजाऊच्या कुशीत ज्ञान,चारित्र्य चातुर्य,संघटन व पराक्रम या  सत्व व राजस गुणांचं अधिष्ठान असलेल्या माता पित्यांच्या पोटी हा  बालराजा जन्मास आला...
एका शिवसुर्याचा जन्म झाला.

                      शिवनेरीवर आनंदी आनंद झाला,या छोट्या बाळराजाचे नाव काय ठेवावे..? पहिल्या मुलाचे नाव संभा  म्हणून दुसऱ्या बाळाचे नाव शिवा ठेवले,संभा व शिवा ही दोन्ही नावे  शिवस्वरूप आहेत,पुढे आदराने 'जी'लागून शिवाचे  ते शिवाजी झाले,कारण  बाळाचे नाव काय ठेवावे हा पहिला संस्कार असतो,
सन 1639 ते 1642 या कालावधीत बालशिवाजी कर्नाटकात असताना शहाजीराजांनी त्यांना राज्यकारभार तसेच युद्धाभ्यासाचे शिक्षण देण्याची व्यवस्था केली होती(संदर्भ:परमानंदकृत शिवभारत).त्यामुळे लहानपणीच बालशिवाजी लाठीकाठी, तलवारबाजी, दांडपट्टा, घोडेस्वारी यात तरबेज झाले.आपल्या पूर्वजाची पराक्रम जिजाऊनी सांगितले,त्यामुळे  लढण्याचे बाळकडू त्यांना लहानपणापासून मिळाले.गोवर्धना सारखा हा सह्याद्री तुझी पाठरखं करेल,हा विश्वास जिजाऊंनी शिवबाच्या  मनावर बिंबवला,वयाच्या दुसऱ्या वर्षांपासून हा सह्याद्रीचा बालशिवबा सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात झेप घेऊ लागला,जहागीर दारचा पोर म्हणून जिजाऊंनी  त्यांना वेगळं राहण्याची शिकवण कधीच दिली नाही,जात-पात सर्व दूर सारून शिवराय गावकऱ्यांच्या पोरासोबत खेळू बागडू लागले,  औरो के माँ लोरीयॉ गाती है बच्चो को सुलाने के लिए जिजाऊ ने लोरीयॉ गायी शिवबा को जगाने के लिए.. ! 
                         
                      शिवनेरी,सह्याद्री, पुणे परिसर खेड-शिवापुर ह्या भागात  शहाजीराजे व जिजाऊसोबत शिवबाचे सुमारे अडीच वर्षे गेले ,शिवबाचा जन्म झाल्यावर जिजाऊ वर्षभर शिवनेरीवरच होत्या,त्यामुळे बाळाचे सर्व संस्कार समारंभाचे आयोजन शिवनेरीवरच झाले.बालशिवबाने बारा मावळाचे पर्यटन केले,बाल सवंगडी मावळे,रामोशी,कोळी,मांग, महार,माळी, कुंभार,न्हावी,मराठे-कुणबी,लोहार,धनगर,मुसलमान अशा सर्वजमातीतील होते.जिजाऊ व गावचे पाटील -देशमुख बालशिवबाच्या सहवासाने हरखुण गेले होते.याच काळात निजामशाही खिळखिळी झाली होती,दक्षिणेस शहाजीराजे ज्यांच्यासोबत  त्यांचेच राज्य एवढा दरारा शहाजीराजेंचा निर्माण झाला होता,निजामाने लखुजीराजेंची व कुटूंबियांची दग्या फटक्याने  25 जुलै  1629 रोजी हत्या  केली होती.त्यामुळे निजामशाही बुडाल्याचे दुःख शहाजीराजेंना अजिबात नव्हते,पण मोगलावरही भरोसा नव्हता,जिजाऊंचा सल्ला मरणारी निजामशाही तारून धरावी असा होता ,त्यावेळी शहाजीराजेंना आश्चर्य वाटले ज्या निजामाने जिजाऊंचे  माहेरचे  41 लोक मारले,त्यांचा विश्वासघात केला,त्याच निजामशाहीला  शहाजींनी वाचवावे,हा सल्ला त्यामुळेच वेगळा वाटला, ही धीर गंभीर चर्चा बालशिवबाही ऐकत होते, जिजाऊ म्हणाल्या राजे, निजामशाही पूर्ण हतबल झाली आहे,बालनिजाम लहान आहे,त्याची बडी आई व तो नजर कैदेत आहेत ,त्यांना सोडवावे,आपल्याला निजामशाहचे  सारे सैन्य ,संपत्ती,राज्यवापरता येईल,बाल निजमास निजामशहाचा  वारसदार म्हणून घोषित करा,स्वतः सिंहासनावर बसून बाल निजामाच्या नावाने राज्यकारभार करावा,मोघलशाही व आदिलशाही दूर राहतील,त्यातून स्वराज्याची स्थापना  करता येईल ,राजकारणात वेळेनुसार वैर,सुख,दुःख,नाते,गोते,धर्म सारं-सारं विसरावं लागतं, सत्ता अत्यंत महत्वाची असते.याच राजसत्तेतून आपण स्वराज्याची सत्ता स्थापन करू शकू.आपल्याला यशस्वी व्हायचे असल्यास तडजोडी केल्याचं  पाहिजेत..! हा सल्ला शहाजीराजेस पटला ,तशी देवाण घेवाण सुरु झाली,बालशिवबास घेऊन जिजाऊ माहेरी सिंदखेड राजास आई म्हाळसाराणी ,माहेरची मंडळींना पुढची व्युवरचना करण्यासाठी गेल्या.जिजाऊ सोबत शहाजींनी सर्व लवाजमा देऊन बालशिवबास आवश्यक शिक्षण देण्याबाबत सूचना दिल्या,संभाजी शहाजी सोबत मोहिमेत थांबले,तुकाई तसेच दोन वर्षांचे व्यंकोजीराजेही जिजाऊ सोबत होते,शिवबानी मावळातील  सुमारे शंभर सवंगडी घेतले,अश्या माहेरवाशिणीचे शिवेवर स्वागत  करण्यासाठी जिजाऊंचे काका जागदेवराव,भाचे संताजी  व ग्रामस्थ हत्ती घोडे नगारे फटाके यासह हजर होते,सारे गाव जिजाऊंच्या स्वागतासाठी तयार होते,रस्त्यावर पाणी टाकून सडा शिंपला होता,रांगोळ्या काढल्या होत्या,ओवळणीची तयारी होती.बालशिवबाच कौतुक पाहून आजी म्हाळसाराणी लखुजीराजेंच्या  हत्तेचं दुःख हलकं करत होत्या...! या पार्श्वभूमीवर शिवबाचे शिक्षण सुरु झाले.


लाल महाल जिजापूर

             एक वर्ष 1635 ते 1636 पर्यंत शिवनेरीवर राहिले नंतर शिवनेरी 1636 मध्ये शहाजीराजांनी मोघलांना खाली करून दिला पुढे पुणे खेड शिवापुरी अशी पाहणी करत शहाजी राजे जिजाऊ बालशिवबा बंगलोरला आली,त्यावेळीही शहाजी राजे पुणे सुपे बारामती चाकणचाही कारभार दोन तीन महिन्याला महाराष्ट्रात येऊन पाहत असत,16 मे 1640 शिवबा व सई राणीचा विवाह लाल महालात मोठ्या उत्साहात एकही रुपया हुंडा न घेता झाला यावेळी सई राणी आठ वर्षाच्या होत्या,यावेळी तुकाई व्यंकोजीराजे,उपस्थित होते,  शिवबा व जिजाऊ व सई राणी शहाजी राजेकडे कर्नाटकात गेल्या तेथे ही शहाजी राजेनी शिवबा-सईच प्रशिक्षण घेतले,सरदार मोहिते ची मुलगी सोयराबाई यांचे व शिवबाचे लग्न बंगरुळात लावले,त्यावेळी सोयराबाईंचे वय आठ वर्षांचे होते,
            जिजाऊनी शिवरायांचे आठ विवाह केले ते  विखुरलेले देशबांधव एकत्र येण्यासाठी .त्याच्या ऐक्यासाठी...!पहिला विवाह फलटणच्या बजाजी निंबाळकर यांच्या भगिनी सईबाई,कोकणातील शिर्के घरातील सगुणाबाई,तळबीड ता.कराड येथील मोहिते घराण्यातील सोयराबाई,पालकर घराण्यातील पुतळाबाई,मुंढवा (पुणे) येथील गायकवाड घराण्यातील सकवारबाई,जाधव घराण्यातील काशीबाई,इंगळे घराण्यातील गुणवंताबाई ,विचारे घराण्यातील लक्ष्मीबाई ..शिवरायांना दोन मुले होती एक शंभूराजे व दुसरे राजाराम महाराज तर मुली सखुबाई,राणूबाई,अंबिकाबाई,राजकुमारीबाई ,कमळाबाई,दीपाबाई या होत्या.शहाजी राजे व जिजाऊच्या दूर दृष्टी मुळे मराठे आपापसातील वैर विसरले.
         1642 साल संपत आले होते,शहाजी-जिजाऊ-तुकाई यांची एकत्रित बैठक झाली,जिजाऊंनी तुकाईस अनेक सूचना केल्या,संसारसोबत राजांच्या  राजकारणा वरही  लक्ष्य ठेवा,संभाजू व व्यंकोजी यांची काळजी घ्या,शाहजी राजे महाराष्ट्र तर कधी कर्नाटक असे फिरत राहतील,आपण जबाबदारी उचलावी,मराठ्यांच्या बायकांनी रणांगण गाजवायची असतात नुसतं घरातच गुंतून राहायचे नसते,आता असमची इकडे येणे नाही, जिजाऊंचा शब्द नि शब्द तुकाई साठून ठेवत होत्या तर शहाजी राजे गंभीर होत होते,आता यापुढे सहजा सहजी भेटणे नाही,हे ऐकून त्या राजांच्या डोळ्यात साठवलेल्या पाण्याला राजेंनी वाट मोकळी करून दिली..!
शिवराय महाराष्ट्राचा कारभार पाहण्यास समर्थ आहेत ही खात्री पटल्या बरोबर शहाजी राजांचा confidence   काय असतो तो  दिसतो ,  राजेंचा अभ्यास करताना एक गोष्ट लक्षात आली कि आत्ता  पर्यंत  पहिल्यादा राज्य स्थापन होत होते आणि नंतर राज्याची राजमुद्रा तयार केली जात  असे ..पण जगातील शिवरायचा स्वराज  हे एकमेव  राज्य आहे जिथे पहिल्यांदा राजमुद्रा तयार केली गेली  आणि नंतर राज्य तयार करण्यात आले....आणि त्याचे जनक म्हणजे शहाजी राजे आणि अंमलात आणणारे राजे शिवराय ही राजमुद्रा,भगवा झेंडा,राजदंड,राज संहिता आणि निवडक विश्वासू सैनिक शिवाजीराजे जिजाऊ यांना घेऊन शहाजी राजे पुण्यास  आले .


                                         शहाजी राजेंनी शिवरायांना दिलेली राजमुद्रा

       शहाजी राजेंनी  बारा मावळातील पराक्रमी मावळे संघटीत केले पुणे हे पुणे राहिले नव्हते मुरार जगदेवाने पुण्यावरून गाढवाचा नांगर फिरून तुटकू चप्पल,पहार, केरसुणी,फुटकी कवडी अशी अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी कृती केली होती त्यामुळे साहजिक एक भीतीचे वातावरण पसरले होते,अशा ठिकाणी जिजाऊ शिवबाना घेऊन आल्या,सर्वप्रथम जिजाऊंनी ही अंधश्रद्धा अनिष्ठ रुढीला त्या पाहरेस उपटून फेकून दिले.झांबरे पाटील यांच्याकडून जमिन विकत घेऊन तेथे लाल महाल बांधला,जिजाऊंचे हे धाडस पाहून सर्वाना धैर्य आले,सभोवतालची प्रजा लाल महालाभोवती राहण्यास येऊ लागली,पुण्याचे रूप पालटले ते पुणे नाही तर जिजापूर झाले ते हि जिजाऊंनी वसवले.याच महालात जिजाऊंनी शहाजी राजांनी बालशिवबाकडून युद्धकलेचे सर्व सराव करून घेतला शहाजी राजांच्यासहकार्याने जिजाऊंनी स्वराज्य उभारणीस सुरुवात केली,जिजाऊंचे मार्गदर्शन हीच शिवरायांची शक्ती होती,जिजाऊ हेच राजांचे शक्तीपीठ होते,म्हणूनच राजे म्हणायचे हे स्वराज्य व्हावे ही च जिजाऊंची इच्छा होती,सोन्याचा नांगर घडवून त्यांनी शेतजमीन नांगरली, स्थानिक लोकांना अभय दिले. राजांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलली. त्यांच्यावर संस्कार घडवले. जिजाऊंनी शिवरायांना गोष्टी सांगीतल्या त्या पारतंत्र्यात सुरू झालेल्या आणि स्वातंञ्यात संपलेल्या.स्वातंञ्य,स्वराज्य हेच अंतिम ध्येय मानलं. प्रत्येक पराक्रमी पुरुषाच्या जीवनाचे ध्येय एकच असते, जे पारतंत्र्यात असतात, त्यांना स्वातंत्र्य मिळवून देणे, ही त्यांनी शिवरायांना दिलेली शिकवण होती. आणि त्यासोबत आपण- समाज, तू आणि मीही - पारतंत्र्यात आहोत, ही प्रत्येक कथेनंतर दिलेली जाणीव होती. कर्तृत्व गाजविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्वराज्य स्थापन करणे ही शिवरायांची धारणा झाली, ती जिजाऊंच्या या संस्कारांमुळेच. राजांना घडवताना त्यांनी फक्त रामायण, महाभारतातील गोष्टी नाही सांगितल्या तर शेजारी सदरेवर बसवून राजकारणाचे पहिले धडेही दिले.शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची  ठिणगी टाकतानाच जिजाऊंनी त्यांना राजनीतीही शिकविली. समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचं धाडस दिलं. शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणावर स्वत: बारकाईनं लक्ष ठेवलं.
       याच जिजाऊ ज्यांच्या प्रेरणे उजळे स्वराज्य ज्योती..याच जिजाऊ ज्यांनी घडविले राजे शिवछञपती..!अनेक शस्र साठे,खजिन्याचा पुरवठा शहाजीराजे शिवराय जिजाऊंना करत होते,शहाजीराजे व जिजाऊमुळे महाराष्ट्रात नवचैतन्य निर्माण  झाले,शहाजीराजेनी आदिलशहाच्या खजिन्यावर महाराष्ट्रात बहुजनांचे स्वराज्य निर्माण करण्यासाठी शिवरायांना पार्श्वभूमी तयार करून दिली,
             भारतभूमीच्या राष्ट्र वृक्षावर परकीय  वादळ येतेय  व राज्य करु पाहतेय परंतू आपण निष्क्रिय राहता कामा नये यांच्या नाशासाठी हातात तलवारी घ्या हा खणखणीत विचार मावळ्यांना प्रेरणा व स्फुलीग चढून गेला हजारो वर्षांची शस्र बंदी महाराजांनी उठवली महाराजांची हि कृती बहुजन मावळ्यांना एक ऊर्जा देऊन गेली सर्व समाज शिवरायांच्या मागे भावासारखा उभा राहिला,स्वराज्यासाठी प्राणाची बाजी लावण्यास आणि रक्ताची होळी खेळण्यास पुढे आला...!
       ज्याचे गडकोट त्यांचे राज्य- गडकोट म्हणजे राज्य,गडकोट म्हणजे राज्याचे मूळ,गडकोट म्हणजे खजिना,गडकोट म्हणजे सैन्याचे बळ,गडकोट म्हणजे राज्यलक्ष्मी,गडकोट म्हणजे आपली वस्तीस्थळे,गडकोट म्हणजे सुखनिद्रा गार किंवा गडकोट म्हणजे आपले प्राणसरंक्षण..! हे महाराजांनी जाणलं मग काय स्वराज्याची घोडदौड सुरु झाली जिजापूर पासून जवळच 64 किलोमीटर कानद खोऱ्यात तोरणा हा किल्ला आहे तो आदिलशहाच्या ताब्यात होता तो तानाजी मालुसरे,येसाजी कंक, बाजी पासलकर आणि निवडक मावळ्यांसह किल्ल्यावर हल्ला करून किल्ल्यावर शहाजीराजेंनी दिलेला भगवा फडकवला,यावेळी शिवबाचे वय होते अवघे 16 वर्ष..स्वराज्य निर्मितीस हि सुरवात होती,नंतर राजगड हि स्वराज्याची पहिली राजधानी  बांधून काढली..!
    जिजाऊंच्या कानावर देहूचे महान वारकरी संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे नाव आले होते,उसंत मिळताच त्या स्वतः शिवाजी,सई बाई,सोयराबाई व निवडक लोकांना घेऊन महाराजांच्या कीर्तनात घेऊन जात असत..! संत तुकाराम म्हणजे परिवर्तन,अनिष्ठ चाली,परंपरा सोबत वैदिक धर्मावर कडाडून प्रहार करणारे संत होते,जिजाऊंनी वारकरी धर्माची परंपरा सांगितली,संत नामदेवानी सुरु केलेली ही वारकरी चळवळ देशभर पोहचली,त्यातून संत सावता, संत ज्ञानेश्वर, संत चोखा, संत बंका, संत जनाई, संत कबीर, संत रविदास, संत सेना महाराज, संत नरहरी, संत मीरा बाई, संत तुकाराम वारकरी धर्माच्या बाजूने उभे ठाकले,नामदेवांनी तर जगभर भ्रमण करून भागवत धर्माची पताका फडकावली,म्हणून आपण म्हणतो नामदेवे रचिला पाया तुका झालाशी कळस..नामदेवांनी पंजाबमध्ये गुरु नानक देवांना त्प्रेरणा दिली,आणि त्यांच्या सारखेच कार्य पुढे तुकाराम महाराजानी चालू ठेवले,तुकाराम महाराज ही स्वराज्य चळवळ ऐकून होते,लोहगावच्या कीर्तनात त्यांनी शिवाजी महाराजास उद्देशून अनेक अभंगाची रचना केली,
शिव तुझे नाव ठेविले पवित्र
छत्रपती सूत्र विश्वाचे की
रयतेचा राजा , बळीराजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात  शिव -सिंधु संस्कृतीशी नात सांगणार " शिव " हे नाव इतक पवित्र आहे की ज्यात विश्वकल्याणाचा विचार आहे.आणि संपूर्ण विश्वाचे कल्याण साधण्यासाठी छत्रपती सुत्राशिवाय तरणोपाय नाही . छत्रपती सूत्रात,स्वराज्य या संकल्पनेत रयतेच राज्य,बळीच राज्य, स्वराज्य निर्माण करण्याची क्षमता आहे असा आशावाद  संतश्रेष्ठ तुकाराम महाराज व्यक्त करतात वयाच्या केवळ बाराव्या वर्षीच महाराजांनी छत्रपती ही पदवी दिली,त्यांनी मावळ्यांना वारकऱ्यांचे धारकरी बनवले व सैन्यात दाखल केले,
   तोरणा जिंकल्यानंतर शिवरायांनी कोंढाणा 1647,पुरंदर 1648,रायरी म्हणजे रायगड 1656 जिंकला, जावळीच्या खोऱ्यात महाराजांनी स्वतः राजधानीतला पहिला  प्रतापगड  रुपी किल्ला बांधला ,हा प्रतापगड म्हणजे मोठा बाका किल्ला..!
असे अनेक किल्ले महाराजांनी जिंकले,काही अर्धवट होते ते पुरे करून बांधले आणि याच किल्ल्यावरून आपला राज्यकारभार महाराज पाहू लागले,महाराजांनी सहयाद्रीच्या कड्याकपारित किल्ले तर बांधलेच शिवाय पाण्यात समुद्रातही किल्ले सिंधुदुर्ग,राजकोट, सजटेकोट,खांदेरी,कुलाबा,सुवर्णदुर्ग,विजयदुर्ग बांधले तेथे आरमार उभा केले कारण ज्याचे आरमार त्याचा समुद्र, महाराज म्हणजे नौसेनेचे जनक होय ,महाराजांनी घोडदळ उभा केलं घोड्यांच्या चपळतेचा विचार करून शिवरायांनी गतिमान घोडदळाची उभारणी केली. त्यांच्या कार्याबद्दल एका डच प्रवाशाने  असे लिहिले आहे की," शिवाजीराजा आणि सुलतान बोलत बसले असता थोड्याच वेळात ती जागा शिवरायांच्या 6000 घोडेस्वारांनी वेढुन टाकली. ते इतक्या हळूच आले की एखाद्या माशीच्या उडण्याच्याही आवाज ऐकू आला असता."
शिवरायांच्या घोडदळाचे प्रकार:
1) पागा(बारगीर): पागा म्हणजे सारकारी/शासकीय घोडेस्वार होय. यांच्याकडे सारकारी जनावरे असत. तसेच त्यांना शस्त्रे आणि वेतन सुद्धा सरकारकडून मिळत असे. यांची संख्या सर्वात जास्त असे.

२)शिलेदार: स्वाताचे घोडे आणि शस्त्रे घेऊन लढाईत सामील होणार्याह किवा सारकारी सेवेत सहभागी होणार्यास स्वारांना शिलेदार असे म्हणतात. शिलेदार हा निम-सारकारी असे. त्यांची संख्या कमी असे कारण स्वाताचा लवाजमा असल्यावर फितुरीची शक्यता जास्त असे.
|| सरनौबतस्तु सेनानी: ||
    अशी समर्पक व्याख्या देत राज्यव्यव्हारकोशात सरनौबताचे वर्णन आले आहे. सरनौबत ही शिवकालातील अत्यंत मोठी आसामी.घोडदळ आणि पायदळ या दोन्ही सैन्याप्रकारावर शिवकालात स्वतंत्र प्रमुखांची नियुक्ती होत असे.दोन्ही विभागांचा कारभार हा स्वतंत्रपणे अमलात येत आणि मग हे दोन्ही सरनौबत एकत्रितपणे येऊन मोहिमेची आखणी, खर्च, मांडणी आणि इतर मनसुबे रचत.हिशेब ताळेबंद आणि खर्च पत्रे यांच्या आधारे पागा व्यवस्था थोडक्यात अशी होत -
सरकारातून घोडा मिळणारा बारगीर -> 25 बारगिरास 1 पखालजी 1 नालबंद व 1 हवालदार -> 5 हवालदारांचा मिळून 1 जुमलेदार [पगार 500 होन सालीना व पालखीचा मान ] -> 10 जुमलेदारांच्या वर 1 हजारी [सालीना पगार 1000 होन] -> 5 हजारींच्या वर 1 पंचहजारी आणि या पंचहजारींच्या वर असणारा सरनौबत अंदाजे या सैन्य सरनौबतास सालीना 4000 ते 5000 होन इतका पगार होता.
      मराठ्यांच्या युद्धतंत्रात महत्वाचे स्थान होते ते घोडदळाला. त्या मागोमाग पायदळ. तोफखाना विभाग होता पण तो पायदळ अंतर्गत आणि तो गड़-किल्ल्यांवरस्थिर असे. फौजेसोबत फिरता नसे. मराठा घोडदळाने दिवंगत किर्ती प्राप्त केली होती. इतकेच नव्हे तर शत्रूने त्यांची प्रचंड भिती घेतली होती. विजापुरचा कवी नुस्नाती त्याच्या 'अलिनामा' मध्ये म्हणतो,"मराठ्यांच्या घोडयाना जणू पंख होते. एक-एक घोड़ा सैनिकांपेक्षा ही वरचढ़ होता. मराठ्यांची प्रत्येक घोडी म्हणजे जणू परीच. ती चंद्राची सखी असते. मराठा वीर जेंव्हा काव्याने लढू लागतो, तेंव्हा सारे विश्व नदीच्या भोवऱ्यात सापडल्यागत होते. मराठा शिपाई रणावर तळपू लागला म्हणजे जणू तो वाऱ्याशी गुजगोष्टी करीत असतो. अश्यावेळी त्याचे मुंडासे हात-हात वर उड़ते; धरती त्याच्या हालचालीने डळमळू लागते." पुढे तो म्हणतो,"वाऱ्याचाही शिरकाव होणार नाही अश्याही स्थळी मराठे सैनिक जाउन पोचतात. किंबहुना अश्या ठिकाणी प्रवेश करणे मराठ्यांच्या घोडयाना एक प्रकारचा खेळ वाटतो. या लष्कराने आणि शिवाजीने आकाशाशी स्पर्धा करणारे उंच-उंच गड़ चढून काबीज केले. जहाजत बसूनही मराठे लढले आणि त्यांनी फिरंग्यान्ना धाक बसवला. त्यांच्या वर्दळीमुळे समुद्रावर नेहमीच तूफ़ान येत राहिले."
शिवरायांचे आरमार-
  शिवराय ओळखून होते की ज्याचे आरमार त्याचा समुद्र म्हणून महाराजांनी  अवघ्या हिन्दुस्तानात कोण्या राज्यकरत्याला 16 व्या शतकात आरमार उभे करणे जमले नव्हते.त्याची मुहूर्त मेढ़ महाराजांनी रचली आणि आरमार उभे केले. मराठा आरमार हे महाराजांच्या दुरदृष्टीचे मोठे उदाहरण म्हणावे लागेल.हे आरमार उभे करताना बांधण्यात आलेल्या बोटी ह्या साध्या पद्धतीच्या होत्या. ह्या बोटी पाहून ब्रिटिश हसत असत आणि म्हणत असत की "ही काय आपल्याशी लढा देणार." पण महाराजांनी अवघ्या पंधरा वर्षात अश्या काही तांत्रिक पद्धती वापरल्या की त्या ब्रिटिश राज्य कर्त्यांना मराठा अरमाराची भीती वाटू लागली.महाराजांनी आरमारी मोहिमा करुण ब्रिटिश,फ्रेंचाना अगदी सळो की पळो करुण सोडल. ह्या आरमाराने खुप विजयी पताका भारतीय सागरी तटांना लावल्या.महाराजांना अनेक विजयीश्री मिळाल्या. पण ह्या मोहिमा सैन्य,पैसा,शस्त्रास्रे यांच्या बळावर चालत नसतात तर ती राजाच्या ध्येय धोरणावर असलेल्या सैन्याच्या निष्ठेच्या बळावर चालतात हे महाराजांनी दाखवून दिले.महाराजांच्या मुखातुन निघालेली आज्ञा मावळे प्राण गेला तरी त्या आज्ञेवर ठाम राहत.ह्याच मावळ्यांच्या निष्ठे पाई मराठ्यांचे अद्वितीय आरमार उभे राहिले अन अवघ्या रयतेचे स्वराज्य उभे राहिले. एक उत्तम, आदर्श शासक व प्रशासक आणि काऴाची पुढची पाऊले ओळखणाऱ्या शिवरायांनी उभारलेले आज हेच भारतीय आरमार INDIAN NAVY जगातील शक्तिशाली आरमार होय. याचे श्रेय युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनाच जाते. आणि म्हणूनच शिवरायांना " FATHER OF INDIAN NAVY " म्हणून फक्त हिंदुस्थानातच नाही तर संपूर्ण जगात ओऴखले जाते.
   प्रतागडावरील पराक्रम याला कोणी धार्मिक युद्ध म्हणेल तर कोणी याला सत्ता संघर्ष म्हणेल परंतु या प्रतापगडावर ज्या घटना घडल्या त्या पाहत असताना आपल्या लक्षात येते ती लढाई धार्मिक नव्हतीच कारण तसे असते तर राजेंनी अफजलखानाचा वकील कृष्णा भास्कर कुलकर्णी  हा हिंदू ब्राम्हण मारलाच नसता किंवा त्याने सुद्धा  अफजल खानचा वकील होण्या ऐवजी महाराजांचे वकील होणे अपेक्षित होते,परंतू तसे न होता तो  पैसा किंवा इतर गोष्टीच्या लोभाने अफजल खानाचे तळवे चाटण्यात तो धन्यता मानत होता, तर इकडे महाराजांचा सैन्यामध्ये अनेक जातीचे अनेक धर्माचे सैनिक तर होतेच शिवाय मोठ्या पदावर होते
महाराजांचे हे स्वराज्य दिवसेंदिवस वाढत चालले आहे,महाराज वाघासारखी झेप व चित्यासारखी दौड घेतायत,हे झेप थेट विजापूर पर्यंत धडकली मग काय बडी बेगम ची झोप हरवली तिने दरबार बोलवला ...शिवाजीला जिंदा या मुडदा पकडून कोण घेऊन येतो.?त्या वेळी पोलादी ताकतिचा पाताळ यंत्री, कपटी,दगाबाज अफजल खान समोर येऊन तबकातील विडा उचलतो..ही बातमी शहाजी राजेंनी रनदुल्ला खान रुस्तुम जामान  मार्फत शिवरायांना कळविला,विजापूरहून थेट अफजल खान वाईला आला या वेळी महाराज 1659 ला प्रताप गडावर आले,आदिलशहाचा जिंकलेला प्रदेश परत करण्यासाठी व भेटण्यासाठी खानाने राजांना निरोप दिला ,शिवरायानी वकील पंताजी बोकील यांस खानाकडे पाठवले,अफजलखानाच्या मनात काय आहे हे विचारून घेतले,तेव्हा वकिलांनी सांगितले खानाच्या मनात कपट आहे तो दुष्ट आहे,राजांना असेही ते आधीच समजले होते,हा अफजल खान याचा बिमोड केल्याशिवाय पर्याय नाही। या विचारात महाराज होते त्याचवेळी 5 सप्टेंबर 1659 रोजी सई राणीचे आजारपणामुळे निधन झाले,परंतू हि वेळ दुःख करत बसण्याची नव्हती,राजे कुटूंब वत्सल होते परंतू ते कधीही नात्याच्या बंधनात अडकून पडले नाहीत.शिवरायांनी अफजल खानाला प्रतापगडावर  भेटण्याचा निर्णय घेतला..!
      इतिहास घडवायचा असेल तर प्रथम भूगोलाचा अभ्यास हा करावाच लागतो,महाराजांनी माणसाबरोबर या सह्याद्रीचा या दऱ्या खोऱ्यांचा ,या समुद्राचाच काय तर संपूर्ण महाराष्ट्राचा  सखोल अभ्यास केला,या भूगोलाच्या जोरावर या निसर्गाने देऊ केलेला हा सह्याद्रीचा महाराजांनी आपल्या स्वराज्यात उपयोग करून घेतला हा सह्याद्री म्हणजे महाराजांचा श्वास ,त्याचा जिवलग मित्रच,याच्याच बळावर महाराजांनी अफजल खानाच्या वधासाठी प्रताप गडाची निवड केली जसा किल्ला निवडला तशीच माणसेही त्यांनी अचूक हेरली प्रताप गडा च्या भेटीसाठी कान्होजी जेधे,तानाजी मालुसरे ,नेताजी पालकर,कमळोजी साळुंखे, शिरीमकर, खोपडे,धोपटे, पिसाळ अशी मोजकी परंतू विश्वासू  मावळे प्रतापगडाच्या झाडीत पेरली,महाराजांनी खानाला प्रताप गडाकडे आणण्यासाठी मोठ्या मुत्सद्दीपणाने त्याला कळविले की, आपण प्रतापी आपला पराक्रम थोर आपण माझ्या वडिलांचे ऋणानुबंधी त्यामुळे आपणही माझे  हितचिंतक आहात, आपल्या तळावर येऊन आपल्याला भेटणे हे सद्याच्या वातावरणात मला सुरक्षितपणाचे वाटत नाही,उलट आपणच प्रताप गडास यावे,माझा पाहुणचार स्वीकारावा,मी आपले सर्व काही आपणास देऊन टाकतो,शिवाजीराजे घाबरले आहेत,या अविर्भावात खान होता,महाराजांची ही शिवनीती त्याला समजली नाही तो भेटण्यास तयार झाला,भेटीच्या वेळी दहा अंगरक्षक व एक वकील सोबत ठेवायचे,पैकी एक शामियाना बाहेर व बाकी दूर ठेवायचे,भेटीची वेळ ठरली 10 नोव्हेंबर 1659,महाराजांनी खानासाठी शामियाना तयार करून घेतला,त्या शामियान्यात खान आला ते ऐश्वर्य पाहून खान खुश झाला,मनातून कपटी होता म्हणून त्याने अंगरख्याखाली बिचवा लपवला होता,महाराजही मानास शास्र ज्ञ होते,त्यांनीही भेटीची तयारी सावध परंतू उत्तमातील उत्तम केली,अंगात चिलखत,जिरेटोप,हातात वाघनखे घातली,सोबत गोपीनाथ पंत वकील,जीवा महाले शिवभारतकार कवींद्र परमानंद यांनी शिवाजी महाराजांबरोबर असलेल्या 10 अंगरक्षकांची नावे दिली आहेत ती अशी –
1) संभाजी कावजी
2) काताजी इंगळे
3) कोंडाजी कंक
4) येसाजी कंक
5) कृष्णाजी गायकवाड (बंकी अथवा बंककर )
6) सुरजी काटके (सूर्याजी काकडे ?)
7) जीवा महाला (संकपाळ)
8) विसाजी मुरुंबक
9) संभाजी करवर
10) इब्राहीम सिद्दी बर्बर (शि.भा.अ-21\70-73).
आणि अफजलखानाकडिल वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी हा होता तर  अंगरक्षक-
1) बड़ा सय्यद
2) अब्दुल सय्यद
3) रहिमखान
4) पहिलवान खान
5) पिलाजी मोहिते
6) शंकाराजी मोहिते आणि इतर 4 जण (शि.भा.अ-21\57-61).
       शिवरायांनी स्वताची तयारी करताना मानसशास्राचा अभ्यास करूनच तयारी केली,त्यांनी  दाडी लांब होती ती लहान केली, अंगात चिलखत व जरीची कुडती घातली. डोक्यात बखतर टोप घातला. डाव्या हातात बिचवा लपविला तर अस्तनीत नवटाकी पट्टा घातल, पायात चोळणा घालून कास कसली. अशा मजबुतीने राजे गडाखाली येण्यास तयार झाले.राजे आई जीजाऊचा  आशीर्वाद घेण्यासाठी निघाले, सर्व सरदार आजूबाजूला जमले होते. त्यावेळी राजेंनी आपल्या मातोश्रींकडे संभाजी राजेंना हवाली केले. व म्हणाले "काही वावडे झाल्यास घाबरे न होता, गर्दी करून शत्रूस बुडवावे. राज्य रक्षावे." सभोवारच्या सरदारांना म्हणाले … " तुम्ही सर्व शूर पराक्रमी आहात आमची मदार तुमच्यावरच आहे….सर्वांनी आपली शर्त करावी, राज्य वृद्धीस न्यावे ते तुमचेच आहे. मातोश्रींचा आशीर्वाद घेवून राजे निघाले ते खानाच्या भेटीला.
        खान शिवरायांच्या आधीच शामियान्यात येऊन बसून मनोराज्य करत होता.त्यांच्या शेजारी बडा सय्यद नावाचा त्याचा हत्यारबंद शिपाई उभा होता.तो पट्टा चालवण्यात मोठा पटाईत होता.शिवराय शामियान्याच्या दाराजवळ आले.बडा सय्यदकडे पाहतच ते तेथेच उभे राहिले.खानाने महाराजांच्या वकिलाला विचारले,
“ शिवाजीराजे आत का येत नाहीत? “
वकील म्हणाला, “ ते बडा सय्यदला भितात.त्याला तेवढा दूर करा !
बडा सय्यद दूर झाला.शिवराय आत गेले.खान उठून म्हणाला , “ या
राजे , भेटा आम्हांला .” महाराज सावध होऊन पुढे झाले.खानाने शिवरायांना आलिंगन दिले.धिप्पाड खानापुडे शिवराय खुजे वाटत होते . शिवरायांचे मस्तक खानाच्या छातीवर आले.त्यासरशी खानाने शिवरायांना ठार करण्यासाठी त्यांची मान आपल्या डाव्या बगलेत दाबली आणि दुसऱ्या हाताने शिवरायांच्या कुशीत कट्यारीचा वार केला.शिवरायांचा अंगावरील अंगरखा टर्र्कन फाटली.अंगरख्याखाली चिलखत असल्यामुळे शिवराय बचावले.त्यांनी खानाचा डाव ओळखला .अत्यंत चपळाईने त्यांनी खानाच्या पोटात वाघनखांचा मारा
केला.डाव्या हाताच्या अस्तनीत लपलेला बिचवा उजव्या हाताने काढून त्यांनी तो खानाच्या पोटात खुपसला.खानाची आतडी बाहेर पडली .खान कोसळला .एवढ्यात त्यांचा वकील कृष्णा भास्कर कुलकर्णी पुढे आला.त्याने शिवरायांवर तलवारीचा वार केला,महाराजांना आयुष्यात ही पहिली जखम ..ही जखम होताच महाराजांनी  पट्ट्याच्या एका घावत कृष्णा भास्कर कुलकर्णीला ठार केले.येथेच त्यांनी एक वाक्य उद्गारले ब्राम्हण म्हणून कोण मुलाहिजा करतो,धार्मिक आणि सांस्कृतिक दहशदवाद हा एकाच दिवशी आणि एकाच वेळी संपवला,ही खणखणी ऐकून बडा सय्यद शामियान्यात घुसला. तो शिवरायांवर वार करणार एवढ्यातजिवाजी महाला धावून आला.बडा साय्यदचा वार आपल्या अंगावर घेऊन जिवा महालाने एका घावत त्याला जागच्याजागी ठार केले.होता जिवा म्हणून वाचला शिवा,अशी म्हण पुढे रूढ झाली. विजयी शिवराय गडावर गेले.इशाऱ्याची तोफ झाली.शिवरायांचे सैन्ये इशाऱ्यांची वाटच बघत होते.तोफ होताच झाडीत लपून राहिलेले शिवरायांचे सैन्ये खानाच्या फौजेवर तुटून पडले.खानाच्या फौजा बेसावध होत्या .त्यांना पळायलाही वाट सापडेना.मराठ्यांनी जोराचा पाठलाग केला.आणि खानाच्या फौजेचा धुव्वा उडवला.अफजाखानाचा मुलगा फाजलखान कसाबसा निसटला व विजापूरला पोहोचला. त्याने सांगितलेली बातमी ऐकून विजापुरास हाहाकार उडाला.विजापुरात सर्वांत बलाढ्य सरदार शिवरायांनी हां हां म्हणता धुळीस मिळवला.शिवरायांचे नाव सगळीकडे दुमदुमले.त्यांच्या पराक्रमाचे पोवाडे सह्याद्रीच्या कडेकपारीतून घुमू लागले.
     शिवरायांचे  असे  कितीतरी प्रसंग  जीवावर बेतनारे होते तरीही राजेंच्या शिवनीतीमुळे ,राजांनी शाईस्तेखानाची बोटे तोडली,कारतलब खानाचा पराभव केला, पुरंदरचा तह केला,आग्र्याहून बादशहा च्या हातावर तुरी देऊन निसटले,सुरतेची मोहीम केली , हे सर्व नियोजन बद्ध केले कमित कमी सैन्यानिशी अनेक लढाया शिवरायांनी जिंकल्या, महाराजांनी मावळ्यांवर स्वतः पेक्षाही जास्त प्रेम केलं कोंढाणा सारखा किल्ला आला पण माझा सिहं गेला म्हणून तानाजीसाठी माझा राजा धाय मोकलून रडला,असे कितीतरी नरवीर मावळ्यांनी या स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची बाजी लावली,शिवा काशीद तर मारताना शिवराय म्हणून मारतोय याच्यात जिवाचं सार समजतो,बाजी तर हिमालया सारखा खिंडीत उभा राहून मृत्यूशी झुंजतो,अरे काय नातं होत मावळ्यांचं  पेटत्या दिव्यावर पतंगांने झेप घ्यावी तशी मावळे झेप घेऊन लढले लढता लढता बलिदान दिले,शिवरायांनी  रयतेची स्वतः पेक्षाही जास्त  काळजी घेतली म्हणून शिवराय मावळ्यांच्या काळजात होते त्यासोबत त्यांच्या जीवाची गॅरंटी घेऊन त्यांच्या जीवाची वॉरंटी देणारा जगाच्या पाठीवर एकच कॉलिटीबाज राजा म्हणजे छत्रपती शिवराय होय ..!
    छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात धर्माला स्थान नव्हते. त्यांच्या राज्यात जीवाला जीव देणारे मुस्लिम सरदार होते आणि त्यांना कायमच मानाचे स्थान मिळाले. महराजांच्या निष्ठावंत मुस्लिम सरदारांची ही ऐतिहासिक कामगिरी...
1) सिद्दी हिलाल- घोडदळाचा सेनापती (सालेरीच्या लढाईत महत्वाची कामग़िरी या लढाईत त्याने स्वराज्यासाठी आपला पुत्र गमावला)
2) सिद्दी वाहबहु- घोडदळातील सरदार
3) सिद्दी इब्राहिम-महाराजांचा अंगरक्षक
4) नुरखान बेग- स्वराज्याचा पहीला सरनौबत
5) दौलतखान - आरमार प्रमुख
6) काजी हैदर - वकील
7) मदारी मेहतर - विश्वासु सेवक (आग्र्याहुन सुटकेच्या वेळी महत्वपुर्ण कामगिरी)
दर्या सारंग - आरमाराचा सुभेदार
9) सुलतान खान - आरमाराचा अधिकारी
10) खस्तगेज खान - महाराजांचा खास मित्र
11) शमादखान - आरमाराचा अधिकारी
12) दाऊदखान - आरमाराचा सुभेदार
13) हुसेनखान मिदान - लष्करातील अधिकारी
14) बाबा दाउत - महाराजांच्या मार्गदर्शकांपैकी एक
    या व अशा कितीतरी पठाण मुस्लीम मावळ्यांनी स्वराज्यासाठी आपला सिंहाचा वाटा उचलला..!
    शंभुराजेंना दिलेरखानाच्या गोटात पाठवले-
        महाराजांची युद्धनीती हि कुशाग्र होती त्यांनी अनेक युक्त्या वापरून शत्रूस पराभूत  केले, दिलेरखान सर्व शक्तीनिशी महाराष्ट्रावर चालून आलाय,त्याचे हे आक्रमण थांबवून त्यालाही संपवायचे आहे,त्यासाठी तसेच उत्तर भारतात स्वराज्याची   भगवी पताका फडकविण्याचे आमचे ध्येय आहे,दिलेरखानास उघड्या मैदानावर युद्ध करण्यापेक्षा चातुर्याने पराभूत करायचे आहे,त्यासाठी त्याच्या गोटात आपला जिवलग नातलग पाठवायचा आणि त्याची आक्रमकता संपवायची हि शिवनीती वापरायची,सई राणीशी चर्चा केली,शिवराय म्हणतायत, बाळ शंभूराजे,लक्षात ठेवा वेळ आणि अवेळ आपणच ठरवायची असते,वेळ सर्वानाच सोईस्कर असते परंतू अवेळ सोईस्कर करुन दाखवितो तोच योद्धा आम्हास ठाऊक आहे की आम्ही राजकारणाच्या पटावरचा मोहरा म्हणून तुमचा उपयोग करतोय परंतू याला पर्याय नाही...त्यानंतर काही निवडक सैन्य घेऊन 13 डिसेंबर 1678 शंभूराजे दिलेरखानाकडे आले.
    दिलेरखान खुश झाला कारण खुद्द शिवाजी राजांचा पुत्र आपल्या गोटात आला म्हटल्यावर शिवाजीला संपवायला काहीही वेळ लागणार नाही या अविर्भावात दिलेरखान वागू लागला.पुत्रांचा  गुप्त वृत्तांत एकमेकास समजत होता,संभाजीराजेंच्या वाकचातुर्याने व कुशाग्र बुद्धीने दिलेरखानची आक्रमणाची धार कमी  झाली त्याचे लक्ष शंभूराजेनी विजापूरकडे वळवले व भूपाळगडावर हल्ला केला.प्रजेवर अन्याय अत्याचार केले शंभूराजेना हे पटले नाही दिलेरखान व शंभूराजे या दोघात मतभेद झाले,दिलेरखान त्याच्या अवमानामुळे शंभूराजेना ठार करण्याचा प्रयत्न करू लागला हे शिवरायांना समजताच त्यांनी शंभूराजे च्या सुटकेसाठी निवडक सैन्य दिलेरखानाच्या छावणीत पाठविले,दहा स्वारांनिशी 22 नोव्हेंबर 1679 शंभूराजे निसटले. थेट विजापुरास मसुदखानाकडे गेले मसुदने संरक्षण देऊन 30 घोडे,1000 पायदळ बरोबर दिले,12 डिसेंबर 1679 रोजी शंभूराजे पन्हाळ गडावर आले,त्यावेळी शिवराय जालना मोहिमेवर होते,त्या मोहिमेतून सहकार्यावर नेतृत्व देऊन राजे 13 जानेवारी 1680 ला पन्हाळगडावर आले चार वर्षानंतर या पिता पुत्रांची भेट होत होती, अनेक जीवघेणे प्रसंग शंभूराजेंनी  शिवरायांना  सांगितले,शंभूराजेना शिवरायांनी पन्हाळा भागाचे सुभेदारपदी नेमले,
     शिवरायांनी सुरत मोहिमेत गोर गरिबांना जराही त्रास न देता डच,इंग्रज,मोगलांनी भारतीयां कडून अ मा नुष पण पैसे गोळा करून तो सुरते स साठून ठेवला होता म्हणून राजेंनी सुरत मोहीम केली, मोहीमेतून आणलेल्या पैशातून गावोगावी पाणवठे,नद्यांना घाट,रस्ते,शेतकऱ्यांना बी बियाणे,किल्यांची डागडुजी केली, सुरतेहून परतत असतानाच 23 जानेवारी 1664  रोजी शहाजी राजेंचे कर्नाटकात होद्देगिरी येथे जंगलात शिकारीस गेले असता वेलीत घोड्याचा पाय अडकला शहाजी राजे घोड्यावरून खाली पडले  मार जास्त होता ,त्यामुळे शहाजी राजेचे जागीच निधन झाले,शिवरायांच्या एका अडगारवडाचा अंत झाला,जिजाऊ सती जाऊ लागल्या परंतू शिवरायांनी त्यांना थांबवले व जगातील पहिली सती प्रथा बंद केली, शिवराय व जिजाऊ होद्देगिरीस गेले,शहाजी राजेंचे निधन जेथे झाले तेथे त्यांचे स्मारक उभा केले,
शिवरायांना शेतकऱ्यावर जीवापाड प्रेम-

      शेतकरी हा राज्याचा अन्नदाता आहे, असा विचार छत्रपती शिवरायांनी रयतेला दिला. छत्रपतींच्या सैन्यात सर्वाधिक शेतकर्‍यांची मुले होती, हे जाणूनच शेतकर्‍यांचे हित जपणे हे ते आद्यकर्तव्य मानत. शेतकर्‍यांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने शिवबा सर्वाधिक उत्पन्न काढणार्‍या शेतकर्‍यांना पुरस्कार देऊन गौरवित असत. अल्पभूधारक व कमी उत्पन्न असणार्‍या शेतकर्‍यांना शिवकाळात मोफत बी-बीयाणे पुरविली जायची. याशिवाय शेतीमालाला योग्य किंमत देऊन शेतसाराही किफायतशीर प्रमाणात आकारला जात असे.पडिक जमिनीची मशागत करणार्‍या शेतकर्‍यांना राज्याकडून अर्थपुरवठा केला जात असे. दलालांची प्रथा तर छ‍त्रपतींनी पुर्णत: नष्ट केली होती. बहुजन समाजातील लायक व्यक्तिंना महसूल अधिकारी म्हणून नेमण्याची पद्धत शिवरायांच्या कारकिर्दीतच सुरु झाली. दुष्काळाच्या काळात शिवकाळात शेतकर्‍यांना शेतसारा माफ करुन त्यांच्या गुरांसाठी मोफत चारा पुरविला जात असे. शेतकर्‍यांच्या भाजीच्या देठालाही हात लाऊ नये, मोबदला दिल्यशिवाय फळे घेऊ नका, झाडे तोडू नका, असे कडक फर्मान छत्रपतींनी महसूल अधिकार्‍यांना काढले होते. शेतकर्‍यांची आर्थिकस्थिती सुधारली तर देशाला संपन्नता येईल, असे मत राजेंचं होतं. म्हणूनच छत्रपती हे रयतेचा राजा म्हणून जनमानसात संबोधले गेले. 



           छत्रपती शिवाजी महाराजानीं राज्याभिषेकासाठी 6 जुन ही तारीखच का निवडली ?
    6 जुन हा मृग नक्षत्राचा आदला दिवस. कृषी संस्कृतीशी जवळचा दिवस. देशात मृग नक्षत्र 7 जुनलाच सुरु होते. त्यात काहीच बदल नाही.....महाराष्ट्रात,कोकणासह सगळीकडेशेतकऱ्यांच्या पेरण्या मृग नक्षत्रात प्रामुख्याने होतात.....म्हणजेच शेतीची कामे 7 जुनपासून सुरु होतात शेतकर्यांना सोयीचे जावे व शेतकर्यांचाच एक आनंदाचा क्षण ठरावा, म्हणुन त्याकाळी रोहीणी व मृग नक्षत्राचा जोड दिवस म्हणुन 6 जून हा दिवस निवडला गेला....त्याकाळी 6 जून 1674 रोजी रायगडचे वातावरण निरभ्र होते, पाऊस नव्हता, शेतकऱ्यांना पण सोयीचे होते. हे सुध्दा महत्वाचे कारण आहे.जर महाराजांनी ज्योतिषाचा सल्ला घेतला असता....
तर त्यांनी ऑक्टोबर ते जानेवारी हा काळ सांगितला असता. कारण दक्षिणायण-उत्तरायण भानगड. परंतु महाराजांना वेगेवेगळ्या शत्रुंच्या हालचालींवर लक्ष देणे आवश्यक होते. लोक दक्षिणायन वर्ज्य मानतात. परंतु महाराज मुद्दामच दक्षिणायनातील जुन महिना निवडतात, कारण शत्रुला चकमा देण्यासाठी.राज्य राहिले तर राज्याभिषेक होईल, म्हणुन राज्य-रयत ह्यांची काळजी अगोदर.मुहूर्त पंचांग आणि योग्य संधी याचा काही संबंध नसतो हे महाराजांनी अनेक मोहिमा आणि त्यातच राज्यभिषेक या सर्वात मोठ्या प्रसंगीही सिद्ध करून दाखविले...दूसरे प्रमुख कारण असे की औरंगजेबाचा सिंहासनरोहणाचा खास कार्यक्रम 5 जुन 1659 या दिवशी झाला होता....आता तुमच्या मोगलाईचा अस्त होऊन स्वराज्याच्या स्वातंत्र्याचा सूर्य दक्षिणेकडील क्षितीजावर उगवलेला आहे हे दाखवून देण्यासाठीच महाराजांनी 5 जुनच्या मध्यरात्रीपासुन राज्यभिषेक प्रक्रिया सुरु करुन 6 जुन 1674 रोजी किल्ले रायगडावर शिवराज्यभिषेक केला.....
                         
 
                  तो नेत्रदीपक सोहळा..
                  रायगडाने पाहिला..
                  जेव्हा मराठ्यांच्या धनी..
                  छत्रपती जाहला..
      असा हा नेत्रदीपक सोहळा त्याचे वर्णन अनेक इतिहासकारांनी केले.सभासदाच्या बखरीत या सोहळ्याचे खूप सुंदर वर्णन आहे.सभासदाच्या लेखानुसार या सोहळ्यात एक करोड बेचाळीस लक्ष होन एवढा खर्च झाला.राज्याभिषेक समारोहाबद्दल सभासद म्हणतो,येणे प्रमाणे राजे सिंहासनारूढ जाले.'या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ बादशाहा मर्‍हाटा पातशहा येवढा छत्रपती जाला.ही गोष्ट काही सामान्य जाली नाही.'
     राजे सभागृहात आल्याबरोबर साडेचार हजार राजांनी मानवंदना दिली, बत्तीस मणांचे सिंहासन वर ठेवलेले होते त्याला तीन पायऱ्या होत्या. पहिल्या पायरीवर पाऊल ठेवताच राजांचे हृदय हेलावले, राजांच्या डोळ्यात अश्रू भरून आले आणि चटकन आठवण आली " राजे लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा मरता कामा नये,असे उद्गार काढणारा माझा शिवा काशीद...राजांनी दुसऱ्या पायरीवर पाय ठेवला आणि आठवण आली " जोपर्यंत हे कान पाच तोफांची सलामी ऐकत नाही न राजे तोपर्यंत हा बाजीप्रभू देशपांडे देह ठेवणार नाही राजे."तिसऱ्या पायरीवर पाऊल ठेवल्याबरोबर आठवण आली "राजे आधी लगीन कोंडाण्याचे आणि मग माझ्या रायबाच जगून वाचून आलोना राजे तर लेकराच लग्न करीन नाहीतर....!
   असे कित्येक हृदयाला स्पर्श करणारे प्रसंग महाराजांच्या डोळ्यातून येणाऱ्या त्या प्रत्येक थेंबात दिसून येत होते...!                                                         
     शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा राजधानी रायगडावर झाला.त्याचे पडसाद सातासमुद्रापार युरोपपर्यंत निनादले. राज्याभिषेकावेळी शिवरायांनी शिवराज्याभिषेक शक सुरू केला आणि शिवराई हे चलन जारी केले.राज्यव्यवहार कोश बनविला,नवी दंडनिती,नवे कानुजाबते तयार केले.  शिवरायांनी अष्टप्रधान मंडळ तयार करून त्यांना व त्यांची कार्ये व जबाबदाऱ्या दिल्या.
1) मोरोपंत पिंगळे (पंतप्रधान / पेशवा) : सर्व राजकार्य, राजपत्रावर शिक्का, ताब्यात असलेल्या प्रदेशचे रक्षण व व्यवस्था, युद्ध.
2) रामचंद्र निळकंठ (अमात्य / मुजुमदार) : जमाखर्च, दप्तरदार व फडणीस यांवर देखरेख, खात्याशी संबंधित असलेल्या कागदांवर शिक्का, युद्ध.
3) अण्णाजी दत्तो (सचिव / सुरनीस) : राजकार्यविषयक सर्व जबाबदारी, युद्ध.
4) रामचंद्र त्रिंबक (सुमंत / डबीर) : परराज्यविषयक कार्याचा विचार, युद्ध.
5) हंबीरराव मोहिते (सेनापती / सरनौबत) : सैन्यविषयक जबाबदारी, युद्ध.
6) दत्ताजी त्रिंबक (मंत्री / वाकनीस) : अंतर्गत राजकारणाचा विचार, हेर खाते, युद्ध.
7) रघुनाथराव (पंडितराव) : धर्मा-धर्म विचार.
8) रावजी निराजी (न्यायाधीश) : तंटे, न्याय-निवाडा.                     
   महाराजांच्या राज्याभिषेकाची बातमी ऐकल्यानंतर औरंगजेब हताशपणे उद्गारला…
 "या खुदा, अब तो हद हो गई ।
तू भी उस सिवा के साथ हो गया !
सिवा "छत्रपती " हो गया "
      राजाभिषेक मोठ्या उत्साहात पार पडला परंतू तो पार पडत असताना ब्राम्हणांनी खूप विरोध केला,कारण छत्रपती शिवरायांना ते शुद्र मानत होते व शूद्रांना राजा  होणे त्यांना ते मान्य नव्हते ,कारण आजपासून आपणास राजाच्या आज्ञेत राहावे लागेल,शेवटी काशीचे गागाभट्ट बोलावून हा राज्याभिषेक केला,राजाभिषेकामधे ब्राम्हणांनी अमाप पैसा लुटला,जिजाऊना हा आघात सहन झाला नाही त्यावेळी त्याचे वय अवघे 76 वर्षाचे होते.त्या दु:खी झाल्या,त्या रायगडाच्या पायथ्याशी पाचाडला शिवरायांनी जिजाऊसाठी थंडीच्या दिवसात रायगडावर त्रास होतो म्हणून बांधलेल्या वाड्यात आल्या,वृद्धापकाळ व त्यातच ब्राम्हणांनी  शिवरायाचा केलेला छळ यामुळे जिजाऊ आजारी पडल्या ,शिवरायांनी स्वत:जवळ बसून सेवा केली , अनेक उपचार वैद्यामार्फत केले परंतू काही उपयोग झाला नाही,अखेर शिवरायांचा हा आधारवड  राज्याभिषेका नंतर अवघ्या 11 व्या दिवशी  बुधवार दिनांक 17 जून 1674 रोजी  शिवरायांना पोरका करून गेल्या ,शंभूराजे , स्वराज्य पोरकं झालं ...शिवरायांच्या  डोळ्यासमोर प्रत्येक क्षण  त्या मायेच्या पाण्याच्या थेंबात ओला होऊन व्याकूळ होऊन गेला होता..!
शिवरायांचा दुसरा राज्याभिषेक-
  शिवाजी महाराज शुद्र आहेत त्यांना राजा होण्याचा अधिकार हिंदू धर्मात नाही,हे ब्राम्हणांनी महाराजांना ज्यावेळी सांगितले तेव्हापासून महाराजांना हा राज्याभिषेक सोडून दुसरा अवैदिक पद्धतीने शाक्त शिवराज्याभिषेक करण्याचा विचार आला,असेही   शिवरायांचा 6 जून 1674 चा राज्याभिषेक म्हणजे या देशातील ब्राह्मणांनी पैसा त्यांनी तो मिळवून राजांचा व बहुजनांचा केलेला फार मोठा छळ होता. म्हणूनच शिवरायांनी 24 सप्टेंबर 1674 रोजी दुसरा राज्याभिषेक अवैदिक पद्धतीने केला. यासाठी निश्चलपुरी गोसावी यांनी पौरोहित्य केले.यासाठी अधिक प्रसिद्धी किंवा खर्च आला नाही. या राज्याभिषेकप्रसंगी एकही
अपमानास्पद घटना घडली नाही.
 महामेरू कोसळला...!
3 एप्रिल 1680,चैत्र पौर्णिमा,शा.श.1602,सहस्र सूर्याच्या तेजालाही झाकोळून टाकणारा शिवसुर्य भर दुपारी अस्तास गेला..!रयेतेचा वाली गेला,जगाचा पोशिंदा आज शंभूराजेना पोरका करून गेला..स्वराज्याला पोरका करून गेला...राजे तुम्ही शरीराने आमच्यात नाही आहात परंतू आमच्या प्रत्येक स्पंदात तुम्हीच आहात...!
      शिवरायांचा मृत्यू झाला की खून झाला याबाबत अनेक मतमतांतरे आहेत त्यावर काही ऐतिहासिक साधनावर थोडासा प्रकाश टाकला तर पुढील गोष्टी समोर येतात-

  सुरवातीला आपण अमराठी साधने पाहूयात ......
1.   इंग्रजांचे पत्र " शिवाजी महाराज यांचा मृत्यू रक्तातीसाराने झाला. "
2. पारसी कागदपत्र ( मासिरे आलमसिगरी - साकीमुस्तेखान ) " शिवाजी हे घोड्यावरून उतरले त्यांना अतिउष्णतेमुळे दोन वेळा रक्ताच्या उलट्या झाल्या. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला "
3. निकोलोमनुची ( असे होते मोगल ) - " शिवाजीराजे यांना रक्ताच्या उलट्या होऊन मरण आले "
4. दाघ रजिस्टर ( डच कागदपत्र -1680(पृष्ठ 724.29) संदर्भ परयीच्या दृष्ठी.) - " राज्यांवर विषप्रयोग केला असावा "                     
आता आपण मराठी -संस्कृत साधने पाहू :----
1. शिवदिग्विजय - " सोयराबाईंकडून राज्यांना विषप्रयोग झाला "
2. चिटणीस बखर - " सोयराबाईवरच आरोप ठेवते "
3. जेधे शकावली - " चैत्र शुद्ध शनिवार दिवसा दोन प्रहरी रायगडावर शिवरायांचे निधन झाले हंबीरराव मोहिते यांनी मोरोपंत, अण्णाजी, प्रल्हादपंत यांना कैद केले."
      वरील साधनाचा अभ्यास करून तसेच वास्तव विचार करून आपल्या लक्षात येते की,शिवाजीराज्यांनी राजारामाचा विवाह 15मार्च 1680 रोजी प्रतापराव गुजर यांचे मुलीशी लाऊन दिला आणि अवघ्या 18 दिवसात शिवाजीराजे यांचा खून झाला. शिवाजीराजे रक्ताच्या उलट्या होऊन मरण पावले हे सारे जाणतात पण त्यांना रक्ताच्या उलट्या का झाल्या ? हे मात्र सारेच जाणत नव्हते कारण मंत्र्यांनी रायगडावरून वाराही बाहेर जाणार नाही याप्रकारे बंदोबस्त केला होता. चिटणीस बखर,शिवदिग्विजय या 1818 सालच्या असल्याने समकालीन नाहीत. पण त्या विषप्रयोग झाल्याचे बोलतात. मंत्र्यांनी विषप्रयोग केला पण सोयराबाई यांच्या नावाने अफवा पसरवली. हे वरील साधनांवरून लक्षात येते.
  जेधे शकावली हि दैनंदिनी असल्याने स्पष्टीकरण नाही पण त्यात निधनानंतर लगेच मंत्र्यांना अटक केल्याचे स्पष्ट होत आहे. मंत्र्यांनी खून केला म्हणून त्यांना अटक केली असा स्पष्ट अर्थ निघतो.तसेच सोयराबाई निर्दोष होत्या हे सिद्ध करणारा एक भक्कम पुरावा आहे तो म्हणजे,संभाजीराजे 24 ऑगस्ट 1680 रोजी म्हणतात की,”सोयराबाई स्फटिकासारखी निर्मळ मनाची आहे.”(संदर्भ-छत्रपती संभाजी 221-वा.सी.बेंद्रे) सोयराबाई व संभाजी यांचे नातेसंबंध खूप प्रेमळ होते,संभाजीराजांनी धाकट्या राजाराम भावाला जीवापाड जपले.याचा सरळ अर्थ शिवरायांचा खून हा मंत्र्यांनी केला हे दिसून येते,सोयराबाईचा यात थोडाही संबध येत नाही,तसेच संभाजी राजांनी सोयराबाईना कसलाही त्रास दिला नाही,संभाजीराजेच्या राज्याभिषेकानंतर दीड वर्षांनी त्यांचा मृत्यू झाला. दिशाभूल करण्यासाठी नंतर काही इतिहासकरांनी शिवरायांचा मृत्यू हा " गुडघी रोगामुळे " झाला अशी अफवा पसरवली. (पण मित्रहो जगाच्या इतिहासात पूर्वी आणि आजही गुडघीरोग कोणालाही झाल्याचे उदाहरण नाही..) शिवरायांचा खून पचउन स्वराज्य हस्तगत करायचा मंत्र्यांचा डाव होता त्यासाठी त्यांनी राजाराम यांचा राज्यभिषेक घाई घाईत उरकला. राजाराम हे 10 वर्षाचे बालक होते. राजारामला नामधारी राजा करायचे व राज्यकारभाराची सर्व सूत्रे आपल्या हातात घ्यायची असा मंत्र्यांचा डाव होता. तसेच संभाजीराजे हे हुशार, धाडसी,पराक्रमी, होते म्हणून संभाजीराजे यांना अटक करायला मोरोपंत, अण्णाजी, प्रल्हादपंत हे पन्हाळागडाकडे निघाले पण वाटेतच या कपटी, स्वराज्यद्रोही, नरपशूना.... स्वराज्यप्रेमी, शिवभक्त, राजाराम यांचे सख्खे मामा,सोयराबाईचे भाऊ हंबीरराव मोहिते यांनी अटक केली आणि संभाजीराजे यांचा रायगडावर राज्याभिषेक केला. संभाजीराजेनी या मंत्र्यांना ठार मारले आणि शिवरायांच्या खुनाचा बदला घेतला..
               शांत झाला वादळवारा समुद्रही तो थांबला!
               डोळ्यांत आसवे घेऊन रायगडही तो निजला!
                                             
                               रायगड छत्रपती शिवराय समाधी


    मित्रांनो, जय जिजाऊ..जय शिवराय..…
   माझ्या राजाची महती सातासमुद्रापार गेलेली आहे,राजांचा भगवा अवघ्या विश्वात अभिमानाने फडकत आहे..शिवचरित्र आपण वाचत आहोत,अभ्यास करत आहोत..परंतू आपण नेमके शिवचरित्रातून काय घेतोय..?उद्याच्या पिढीला काय देतोय..?हे तपासून पाहण्याची वेळ आज आली आहे, शिवराय आपल्या घरात जन्मावे अस प्रत्येकास वाटत..मग त्यासाठी आपण आधी जिजाऊ आणि शहाजी होणे गरजेच आहे.. ..! शिवराय घरा घरात पोहोचावे अस आपल्याला वाटत…अहो, घराघरात का?… माझ्या राजांचा पराक्रम, त्याचं शौर्य, त्यांची नीती, आचार, विचार आईच्या गर्भा पर्यंत पोहचले पाहिजेत… !
   त्यासाठी आपण सर्व इतिहासप्रेमी ,अभ्यासक,गायक,वक्ते,शाहीर,लेखक, वाचक हे काम आवडीने व प्रेरणेने करू या..जय जिजाऊ जय शिवराय..!
       या लेखाविषयी......
             खर तर छत्रपती शिवराय..हा चार अक्षरी शब्द परंतू या चार अक्षरी शब्दाने माझं आयुष्य चारी बाजूनी पूर्ण बांधल गेलं आहे,आयुष्याची एकही सकाळ अशी उगवत नाही की ज्या दिवशी राजांचे नाव या हृदयातून,ओठातून बाहेर पडत नाही..!हा लेख प्रपंच मी आपणा समोर सादर करताना मला आनंद होतो आहे की आपल्या वाणीतून छत्रपती शिवराय आहेतच तसेच एकदा लेखणीतूनही यावेत म्हणून हा प्रयत्न करतोय हा लेख मी लिहिताना अनेक संदर्भ ग्रंथ वापरले आहेत,तसेच काही लेखक व इतिहासकारांचे जसेच्या तसे शब्द मी या लेखात घेतले आहेत त्या सर्वासोबत मी अभ्यासलेले शिवराय मी लेखात मांडण्याचा प्रयत्न केला आहे,त्या सर्व ज्ञात अज्ञात इतिहासकारांचा मी सदैव ऋणी राहील..! आपण हा लेख वाचल्यानंतर काही शंका असतील काही चुका असतील तर कळवा कारण हा महाराजांचा इतिहास आहे...!
 जागतिक इतिहासकारांनी माझ्या राजाबद्दल काढलेले हे उद्गार....!
प्रिन्स ऑफ वेल्स (इंग्लंड) - "छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वात मोठे योद्धे होते. त्यांच्या स्मारकाची कोनशीला बसविताना मला अत्यानंद होत आहे." मि. अनाल्ड टायबर्न (जगविख्यात इतिहासकार) - "छत्रपती शिवाजी महाराज्यांसारखे राजे जर आमच्या देशात होऊन गेले असते तर, त्यांच्या स्मृतींचा अक्षय ठेवा आमच्या डोक्यावर घेऊन नाचलो असतो."
इब्राहीम-लि-फ्रेडर (डच गव्हर्नर) - "छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेकाप्रसंगी सोन्याच्या सिंहासनावर बसताच सर्व मराठ्यांनी अत्यंत प्रेमाने "छत्रपती शिवाजी महाराज कि जय" अशी गर्जना... केली."
मार्शल बुल्गानिन (मा. पंतप्रधान - रशिया) - "साम्राज्यशाही विरुद्ध बंद उभारून स्वराज्याची पहिली मुहूर्तमेढ छत्रपती शिवाजीमहाराज्यांनी रोवली."
संपूर्ण जगावर राज्य मिळवल्या नंतर इंग्लंडच्या लौर्ड एलफिस्टन या ब्रिटीश अधिकार्याने मरण येण्याच्या आधी आपल्या डायरीत लिहले की,"आम्ही पूर्ण जग फिरलो त्यातील भारत हा मुलुख आम्ही जिंकलाच कसा याच्यावर आज ह़ी विश्वास बसत नाही आणि शेवटी त्याने लिहले की, शिवाजी सारखा राजा जर आमच्या भूमीत जन्माला आला असता तर ह़ी पृथ्वीच काय तर परग्रहावरही आमचे साम्राज्य निर्माण झाले असते."
 Cosmo Da Guarda म्हणतो-शिवाजी राजांच्या कृतीत धडाडी होतीच पण त्याचबरोबर त्यांच्या आचरणात्,चालीत एक जिवंतपणा व उत्साह होता.त्यांचा चेहरा स्वच्छ आणि गोरा होता,निसर्गाने त्यांना सर्वोत्तम गुण दिले होते मुख्य म्हणजे त्यांचे काळे डोळे ज्यातुन जणुकाही अग्निज्वाळा येत असत्,आणि याला जोड होती तीव्र्,तीक्ष्ण बुध्दिमत्तेची.
Orme म्हणतो-शिवाजी महाराजांकडे एका यशस्वी सेनापतीचे सर्व गुण होते.सैन्याचा प्रमुख म्हणुन त्यांनी जितके जमिनीवर जितके अंतर पार केले तितके दुसर्‍या कुठल्याही सेनापतीने केले नसेल.आणीबाणीचा प्रसंग कितीही आकस्मिक अथवा मोठा असला तरीही शिवाजी राजांनी त्याचा विवेकाने व धैर्याने त्वरीत यशस्वीपणे सामना केला.
General Sullivan म्हणतो-ज्या संत्रस्त काळात शिवाजी महाराज रहात होते त्या काळात सफल होण्यासाठी आवश्यक असलेला प्रत्येक गुण त्यांच्यामधे होता.ते सतर्क होते आणि त्यांची कृती प्रखर व धाडसी असे.त्यांच्यातील सहनशीलता,उर्जा आणि निर्णयक्षमतेमुळे कुठल्याही काळात त्यांच्याकडुन गौरवास्पद कार्य झाले असते.तो एक हिंदु राजा होता ज्याने आपल्या देशी घोड्यांच्या सहाय्याने प्रचंड मुघल घोडदळाला पाणी पाजले.त्यांचे मावळे गनिमी काव्यामुळे त्याकाळातले जगातील सर्वात चांगले पायदळ होते
J. Scott म्हणतो-शिवाजी राजे एक योध्दा म्हणुन असामान्य होते,राज्यकर्ता म्हणुन निपुण होते तर सद्गुणी लोकांचे मित्र होते.त्यांनी हुशारीने आपली धोरणे आखली तर दृढतेने ती अमलात आणली.कोणीही कधीही त्यांच्या ध्येयाबद्दल अवगत नसे तर प्रत्येक जण त्या ध्येयाच्या पुर्तीबद्दल अवगत असे.
Abbe Carre म्हणतो-शिवाजी राजे पुर्वेने पाहिलेल्या सर्वोत्तम योद्ध्यांपैकी एक आहेत.त्यांच्या धाडसीपणामुळे ,त्यांच्या युध्दातील चपळाईमुळे व इतर गुणांमुळे त्यांची तुलना स्विडनच्या महान राजा ऍडॉल्फसशी होउ शकते.त्यांच्या जलद गतीने आणि दयाशीलतेने ज्युलियस सीझरप्रमाणे त्यांनी त्यांच्या शत्रूंचीही मने जिंकली ,जे शत्रु त्यांच्या शस्त्रांमुळे दहशतीत होते.
Sir E. Sullivan म्हणतात-शिवाजी राजे हिंदु इतिहासातील सर्वोत्कृष्ठ राजकुमार आहेत.त्यांनी आपल्या ज्ञातीचा पुरातन गौरव वापस आणला जो अनेक शतकांच्या पराधिनतेमुळे नष्ट झाला होता.आणि मुघल साम्राज्याच्या परमोच्च बिंदुला त्यांनी आपले साम्राज्य बनवले,वाढवले जे की हिंदुस्तानातील मुळ लोकांनी काढलेले आत्तापर्यंतचे सर्वश्रेष्ठ साम्राज्य आहे.
Owen म्हणतो-वीरता,देशाभिमान्,धर्माभिमानाची प्रभावळ त्यांच्या(जनतेच्या) कार्यवाहीत होती ज्यातुन ते प्रेरीत झाले.
कविराज भूषण म्हणतो-जंभासुरला जसा इंद्र , समुद्राला जसा वाडवाग्नी,गर्विष्ठ रावणाला ज्याप्रमाणे प्रभुराम, मेघाला ज्याप्रमाणे वादळ,मदनाला जसे शिव शंकर, सहस्रार्जुनाला ज्याप्रमाणे परशुराम,वृक्षाना ज्याप्रमाणे वणवा, हरिणांना जसा चित्ता,अंधाराला जसा प्रकाश, कंसाला ज्याप्रमाणे श्रीकृष्ण,त्याचप्रमाणे नरसिंह असणारे शिवराय म्लेंच्छांचा नाश करतात.

शिवसागरात उभारल्या जाणाऱ्या शिवस्मारकाची प्रतिकृती ....
                     

                 जय जिजाऊ..!जय शिवराय..!जय शंभूराजे ..!


संदर्भ-         
शिवाजी महाराज-विकिपीडिया
शिवचरित्र-पुरुषोत्तम खेडेकर
विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराज(शिवचरित्र)-श्रीमंत कोकाटे
 शिवभारत -कविंद्र परमानंद राधामाधवविलासचंपू-जयराम पिंडे
जेधे शकावली-संपा.अविनाश सोवनी
श्री शिवप्रभूंचे चरिञ-कृष्णाजी अनंत सभासद
असे होते मोगल-निकोलाओ मनुची
छञपती शिवाजी महाराज-कृष्णाजी अर्जुन केळुस्कर
चिटणीस बखर-म.रा.चिटणिस
शिवचरिञ एक अभ्यास-सेतूमाधव पगडी
मध्ययुगीन भारताचा इतिहास-इतिहासाचार्य प्रा.मा.म.देशमुख
शिवाजी आणि शिवराल-जदुनाथ सरकार
श्री छञपती आणि त्यांची प्रभावळ- सेतूमाधव पगडी
मुरारबाजी आणि बाजीप्रभू देशपांडे-प्रभाकर भावे
छञपती शिवाजी महाराज-वा.सी.बेंद्रे
छञपती संभाजी महाराज- वा.सी.बेंद्रे
शुद्र पुर्वी कोण होते ?-डॉ.बाबासाहेब आंबेडकर                     
 शिवाजी शुद्र कसा?-प्रा.अशोक राणा
शिवरायांचे निष्टावंत मुस्लीम सैनिक-प्रेम हनवते
छञपती संभाजी स्मारक ग्रंथ- डॉ जयसिंगराव पवार
विद्रोही तुकाराम-डॉ.आ.ह.साळुंखे
वैदीक धर्मसुञे आणि बहूजनांची गुलामगिरी-डॉ.आ.ह.सांळुखे
समग्र महात्मा फुले वाडमय -महाराष्ट्र शासन प्रकाशित.
talekarsantosh.blogspot.com वरून संग्रह.
संग्राहक: - शेवाळकर राघोजी

टिप्पण्या