वैशिष्ट्यीकृत पोस्ट

संत दामाजी पंत

संत दामाजी पंत
राजा पटवर्धन 02/07/2015

मंगळवेढ्यात अनेक संत होऊन गेले. त्यांपैकी दामाजीपंत, चोखामेळा व कान्होपात्रा ही संत मंडळी अधिक प्रसिद्ध आहेत. संत दामाजी यांच्या अस्तित्वाचा काल शालिवाहन शके 1300 ते 1382 हा आहे. ते बिदर येथील महंमदशहाच्या दरबारात सैन्याचे सेनापती होते. त्यांनी अब्दुलशहाशी झालेल्या लढाईत विजय मिळवल्यामुळे त्यांना खजिनदार पद देण्यात आले. त्यात हुशारी दाखवल्यामुळे त्यांची मंगळवेढ्याच्या मामलेदारपदी नेमणूक झाली. त्यांचा जन्म शेतकरी कुटुंबातील, पण अंगच्या हुशारीमुळे त्यांना ती पदे मिळाली. शके 1376 मध्ये भयंकर दुष्काळ पडला. पुन्हा 1377 सालीही पाऊस पडला नाही. त्या पुढच्या 1378 सालीपण भीषण दुष्काळ पडला. जनता हवालदिल झाली. दामाजीपंतांनी धान्याची दोन कोठारे बांधली होती. त्यांनी धान्याने भरलेली ती कोठारे लोकांसाठी खुली केली. बादशहाने त्यांना अटक करण्यासाठी सैन्य पाठवले व बिदर येथे येण्यास फर्मावले. दंतकथा अशी आहे, की त्या प्रवासादरम्यान पांडुरंगाने दामाजीपंतांच्या विठू महार या नोकराचे रूप घेऊन बादशहाला सव्वा लाख रुपये किंमतीच्या सोन्याच्या मोहरा देऊन त्याची पावती घेतली व दामाजीपंतांच्या गीतेच्या पोथीत ठेवली. दामाजीपंतांची सुटका होऊन त्यांचा सत्कारही झाला. दामाजीपंत शके 1382 मध्ये मरण पावले. त्यांची समाधी साध्या स्वरूपात होती. नंतर शिवाजी महाराजांचा धाकटा पूत्र राजाराम याने तेथे घुमटवजा छोटे मंदिर बांधले. त्यात विठ्ठल, रुखमाई व दामाजीपंतांची मूर्ती स्थापली.

पेशवाईच्या काळात मंगळवेढा हे सांगली संस्थानचे राजे पटवर्धन यांच्या अंमलाखाली गेले. ‘संत दामाजी संस्था’ एक एकर एकोणीस गुंठे जागेवर आहे. मंदिराला मोठा सभामंडप आहे. तेथे दररोज दोनशे-अडीचशे लोकांना जेवण दिले जाते. चैत्री, आषाढी, कार्तिकी व माघ वारीला तेथे येणाऱ्या वारकऱ्यांना निवासासाठी दोन मजली इमारत बांधली आहे. वारकऱ्यांना भात व साराचे जेवण दिले जाते. एका वारीसाठी (पंधरा दिवसांसाठी) तीस-पस्तीस क्विंटल तांदूळ लागतात. दरम्यान तेथे अनेक धार्मिक कार्यक्रम सुरू असतात. तो खर्च भक्त व दानशूर लोकांच्या देणग्यांतून भागवला जातो.

-राजा/राणी पटवर्धन, प्रमोद शेंडे
_____________________________
श्री. संत दामाजीपंत
            मंगळवेढयाचे सर्व संतापेक्षा श्री दामाजीपंतांची प्रसिध्दी फार आहे. त्यांचेच नावाने ही नगरी ओळखली जाते. इ.स. १४४८ ते १४६० ही दोन वर्षे श्री दामाजीचा दुष्काळ म्हणून ओळखली जातात. याच काळात दामाजीपंतानी मंगळवेढे येथे तहसीलदार असताना बिदर बादशहाचे अवकृपेची भिती न बाळगता सरकारी कोठारातील धान्य भुके ने व्याकूळ झालेल्या व मरणोन्मुख झालेल्यांना फुकट वाटले व लाखो लोकांचे जीव दुष्काळ समयी जगविले.
बादशहाने या गुन्ह्याबद्दल श्री दामाजीपंतांना पकडून बिदर ला नेले. पण संकटकाळी भक्तांचा पाठीराखा पंढरीचा पांडूरंग विठू महाराचे रुप घेऊन बिदर दरबारात गेला व सहाशॆ खंडी धान्याचे एक लक्ष वीस हजार मोहरा भरून पावती घेऊन आला,

त्यामूळे श्री दामाजीपंताना बिदर दरबारात हजर करताच बादशहाने त्यांचा सत्कार करून त्यांना बंधनमुक्त केले व तुमचे विठू महाराने तुमचे पैसे पोचते केलेचे बादशहाने सांगितले. श्री दामाजीपंतांना आश्चर्य वाटले व कोण विठू महार व आपणास सोडवण्यासाठी कोण आले होते याबद्द्ल त्यांना विस्मय वाटला. पंढरीच्या पांडूरंगाची ही कृपा झाल्याची त्यांना खात्री पटताच त्यांनी नौकरीचा राजीनाम तात्काळ दिला व राहीलेले आयुष्य पांडूरंगाच्या सेवेत खर्च केले. प्राणाची पर्वा न करता दुष्काळपिडीत लोकांची सेवा केली म्हणून त्यांचे नाव अजरामर झाले आहे.
  

टिप्पण्या