वैशिष्ट्यीकृत पोस्ट

फाटकेच लुगडे झंपर , आणि धोतर जाडे भरडे !

ही कविता येतांनाच एक सुंदर असा ताल व चाल घेऊन आलेली आहे मला खात्री आहे काही घटना चित्र रूपाने आपल्या डोळ्या समोर उभ्या राहतील !
  आणि  शक्यता आहे एखादी ओळ तरी आपल्या काळजात रुतून बसण्याचा निश्चित प्रयत्न करेल !!

              ::::::::::::::::::::::::::::::::

   फाटकेच लुगडे झंपर , आणि धोतर जाडे भरडे !

*कवी : प्रा. विजय पोहनेरकर*
---------------------------------------------------

*दिसण्याला ओबडधोबड*
*अन काळीसावळी होती*
*काहीही म्हणा जुनी माणसं*
*खूप साधी भोळी होती*

*फाटकेच लुगडे झंपर*
*आणि धोतर जाडे भरडे*
*या बसा खा प्या सारे*
*वागणे नव्हते कोरडे*

*वाडे ही होते पडके*
*वस्तूही फारशा नव्हत्या*
*कप भरून चहा यायचा*
*जरी दांड्या फुटक्या होत्या*

*गप्पांच्या मैफिलत*
*होते हासणे आणि रडणे*
*कुठे हिशोब नव्हते काही*
*पहिल्यांदा कामी पडणे*

*जरी दुःख एखाद्यास*
*गल्लीत दुखवटा होता*
*चेहरे खरेखुरे होते*
*मुखवटा कुणाचा नव्हता*

*कणगीत फारसे नव्हते*
*पण उसने पासने व्हायचे*
*पाहुणा असे जरी गरीब*
*पत्राळीत सारे यायचे*

*ओट्यावर , बैठकीत*
*गप्पांचा रंगे फड*
*चल असो सुपारी बरडी*
*अडकीत्याने फोड*

*आई वडील काका काकू*
*घरा घरात होती जत्रा*
*आत्या मामा मामी मावशी*
*चालू इकडून तिकडे यात्रा*

*पोट्टे सोट्टे लहान मोठे*
*चाले सारयांचा धिंगाणा*
*पोट धरून हसवायाचे*
*मावशी , आत्या , मामा*

*ते सांगायाचे किस्से*
*अन जागरण व्हायाचे*
*कुणी दत्ताचे देवीचे*
*पद एखादे गायाचे*

*जीवघेणी स्पर्धा चिंता*
*आणि क्लेश दुःख हो नव्हते*
*जरी कुणास काही झाले*
*सारेच सोबती होते*

*उत्सव पताका दिंड्या*
*रामनामाचा जयघोष*
*एकमेका सांभाळून*
*झाकून घ्यायचे दोष*

*खेळ चाले कबड्डी लंगडी*
*गलगुट पकाण्या गोट्या*
*न्याहारीला लोणच्या सोबत*
*जोंधळ्याच्या शिळ्या रोट्या*

*नव्हती हो श्रीमंती फार*
*सणासुदीला पोळ्या भात*
*कमी रॉकेल लागण्यासाठी*
*चिमणीची छोटी वात*

*कुणी आजारी पडले की*
*मिळे बिस्कीटाचा पुडा*
*नाही दिला जर सारयांना*
*पोराला म्हणायचे येडा*

*आता घराघरां मधे दादा*
*डब्बे अन कोठ्या भरल्या*
*माणसेच निघून गेली*
*आठवणी फक्त हो उरल्या*

*आम्ही गरीब का श्रीमंत*
*काहीच कळेना झाले*
*जर याला सुख म्हणावे*
*तर पाणी का हो आले ?*

*त्या गरिबी दारिद्र्याचे*
*वैभव संपून गेले*
*सारे सारे असून आता*
*खंगुन माणसे गेले*

*हो पुन्हा आम्ही सारे*
*ते वैभव आणू शकतो*
*म्हणा म्हणा मोठ्याने रे*
*मी नात्या साठी जगतो*

*ठेवा सताड उघडी दारे*
*नका कडी कोंडे लाऊ*
*अर्पावे जगाला प्रेम*
*गुरुजींची प्रार्थना गाऊ*

*प्रा. विजय पोहनेरकर*
*9420929389*
*औरंगाबाद , 15/3/2018.*

टिप्पण्या