वैशिष्ट्यीकृत पोस्ट
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
कुलकर्णी, जयवंत
मराठी चित्रपटांमध्ये उडत्या चालींची गाणी ऐकली की सर्वप्रथम डोळ्यासमोर नाव उभे रहाते जयवंत कुलकर्णीं यांचे. त्यांनी गायलेली प्रत्येक गाणी आजही रसिकांच्या ओठांवर रुंजी घालताहेत. यामध्ये भावगीतं, भक्तीगीतं व असंख्य चित्रपटगीतांचा देखील समावेश आहे. दादा कोंडकेंवर चित्रीत झालेल्या अनेक मराठी गाण्यांसाठी जयवंत कुलकर्णी यांनी पार्श्वगायन केलं असून हा आवाज जणु दादां कोंडकेंचा हे समीकरणचं होऊन बसले. अनेक मराठी गाण्यांना गावरान ढंगात गाऊन एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचा बहुमान जयवंत कुलकर्णींचा आहे.
अश्या या गुणी गायकाचा जन्म १० जुलै १९३१ सालचा. जयवंत कुलकर्णींचे जीवन कधीच सुखावह नव्हते. अत्यंत हालाखीच्या परीस्थीत त्यांचे बालपण गेले. वेळप्रसंगी गाड्या धुवून तर कधी लहान-मोठी कामे करुन जयवंतजींनी उदरनिर्वाह केला. जयवंत कुलकर्णी यांनी गायनाचे धडे प्रसिध्द शास्त्रीय गायक लक्ष्मणराव देवासकर यांच्याकडुन गिरवले, त्यासोबतच उत्तम हार्मोनियम वाजवण्याची सुध्दा त्यांचे गुरु लक्ष्मणराव देवासकर यांच्यामुळेच मिळाली. देवासकरांनी जयवंत कुलकर्णींना एकच सांगितले होते की “कोणत्याही क्षेत्रात कारकीर्द घडवली तरी तुझ्या खुल्या गळ्यातील सूर सोडून देऊ नकोस”. नेमकी हीच शिकवण अगदी शेवटपर्यंत जयवंत कुलकर्णी यांनी मनात पक्की केली होती. म्हणूनच रसिकांना त्यांच्या स्वरातील अवीट गाण्यांचा आस्वाद घेता आला.
त्यांच्या आवाजातील गाण्यांवर १९७०च्या दशकातील तरुणाई इतकी फीदा होती की, महाविद्यालयात कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम असोत जयवंत कुलकर्णी यांच्या “हिल पोरी हिला” किंवा “ही चाल तुरू तुरू” या दोन गाण्यांना हमखास “वन्स मोअर” मिळत असे. विशेष म्हणजे “सावध हरिणी सावध” या गाण्याला देखील अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला आणि संगीतविश्वात लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. कारण या गाण्याला उडत्या चालीच्या संगीतासोबतच जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजातील जोरकसपणा अनुभवायला मिळाला आणि मराठी चित्रपट व भावगीतांसाठी हा प्रयोग तसा नविनच होता. खरं पाहिलं तर जयवंत कुलकर्णी यांनी त्यांचा सांगितीक कारकीर्दीत जी कोणती चित्रपट गीत गायली त्या बहुतांश गाण्यां मध्ये “गावरानबाज” पहायला मिळत असे. पण विशिष्ठ कोणत्याही एकाच ढंगातील गायन प्रकारात व अडकता जयवंतजींनी “अष्टविनायका तुझा महिमा कसा”, “अंतरंगी तो प्रभाती छेडितो स्वरबासरी, नाम त्याचे श्रीहरि नाम त्याचे श्रीहरि”, “ विठुमाऊली तु माऊली जगाची, माऊली तू मूर्ती विठठ्लाची ” आणि “राम कुष्ण नारायण हरि, केशवा मुरारी पांडुरंगा” यासारखी अध्यात्मिक गीत आणि अभंग तल्लीन होऊन गायले! तसंच “अजिंक्य भारत अजिंक्य जनता” , “मंगल देशा पवित्र देशा” या दोन्ही गीतील त्यांच्या स्वरातून देशाभिमान प्रगट झाला नसता तर नवलच !
“शाब्बास बिरबल शाब्बास बिरबल ” हे मराठी संगीत संगभूमीवर गाजलेले नाटक आणि त्यातील “विश्वानाथ सूत्रधार तूच श्याम सुंदरा ” ही नांदी आजही ऐकल्यावर ताजी वाटावी अशीच आहे, या नांदीला जयवंत कुलकर्णींसह पंडित-राम मराठे आणि रामदास कामत या गायकाने स्वरबध्द केले होते. या नांदीमुळे जयवंत कुलकर्णी यांच्या गायकीच्या शिरपेचात नाट्यपद गाण्याचा तुरा देखील रोवला गेला. मराठी चित्रपटांतील द्वंद्व गीतांमध्ये काही गायक-गायिकांच्या जोड्या गाजल्या, त्यापैकी जयवंत कुलकर्णीं सोबत उषा मंगेशकर ही गायनातील जोडी स्वरांच्या तालावर अक्षरश: ठेका धरायला लावत. या दोन्ही गायकांनी एकत्रित गायलेली सोंगाड्या चित्रपटातील “काय गं सखु”, आणि “माळ्याच्या मळ्यामधी कोण गं उभी” तर “सख्या साजणा” मधील “चल चल जाऊ शिणुमाला”, किंवा गारंबीचा बापू चित्रपटातील “चांदणं टिपूर हलतो वारा” तसंच “लागे ना, लागे ना रे थांग तुझ्या ह्रदयाचा ” आजही आपल्या ओठांवर रुंजी घालताहेत. यासह नवरा माझा ब्रम्हचारी मधील “आई तुझं लेकरु येडं गच कोकरु”, पडछाया चित्रपटातील “नाच लाडके नाच, जगापासुनी दूर राहुया नको जनांचा त्रास”, तर “अनोळखी”तलं “ जीवन गगन मी पाखरू ” आणि “अंधाराची खंत तू कशाला करिसी रे”, “नाते जुळले मनाचे मनाशी” या भावगीतातून मानवी मनाचा वेध त्यांच्या स्वरातनं अगदी प्रभावीपणे उमटला. “आमचा राजू का रुसला” , “माझ्या मामाची रंगीत गाडी हो,तिला खिल्लारी बैलांची जोडी हो” , “ गाव असा नि माणसं अशी, नातीगोती जडतंत कशी” अशी मिश्कील स्वरुपाची व बालगीते रसिकांनी उचलून धरली. “आयलय तूफ़ान बंदराला” या चित्रपटासाठी, लता मंगेशकर यांच्यासोबत, “आयलय बंदरा चांदाचं जहाज, हवलुबाईची पुनीव आज ” , हे क्वचित प्रसंगी ऐकायला मिळणारे अगदी वेगळ्या प्रकारचे कोळीगीत गायले होते. सुरेश वाडकर, सुधीर फडके, रविंद्र साठे, पुष्पा पाघधरे, अनुराधा पौडवाल, आशा भोसले, शारदा, अपर्णा मयेकरांसोबत गाण्याची संधी जयवंत कुलकर्णींना मिळाली. या सर्वांसोबत वैविध्यपणे गायल्यामुळे नाविन्याची अनुभूती मिळाली. त्यांच्या गायनात बहुतांशवेळा जगदीश खेबुडकर यांच्या गीतांचा समावेश होता, त्यानंतर अनुक्रमे ग.दि.माडगूळकर, शांता शेळके, वंदना विटणकर, दादा कोंडके, पी.सावळाराम यांच्या गीतांना जयवंत कुलकर्णी यांनी स्वरसाज चढवला. बर्या च चित्रपटातील गाण्यांमधून राम कदम, भास्कर चंदावरकर, सुधीर फडकेंनी जयवंतजींची गायकी ओळखून त्यांच्या आवाजाला साजेल असं संगीत दिल्यामुळेच काही गाण्यांना “ रेकॉर्डब्रेक” लोकप्रियता लाभली.
१९८२ साली प्रदर्शित झालेल्या “चटक चांदणी” या चित्रपटानंतर त्यांची “स्वरेल कारकीर्दीचा प्रवास” कमी होत गेला. पण त्यांच्या “जयवंत कुलकर्णी पार्टी”, “स्वरवंदना” आणि “स्वरांच्या मळ्यात” च्या प्रयोगाद्वारे रसिकांना प्रत्यक्ष सांगीतिक अनुभव देण्याचे काम जयवंत कुलकर्णी यांनी केले. या प्रयोगाच्या माध्यमातून ते रसिकांना अनेक किस्से ऐकवत यामध्ये विनोद, गमती-जमती आणि आठवणीतील प्रसंगाचा समावेश असायचा. क्रिकेटर विजय मर्चंट यांच्यासोबत अपंगांसाठी अगदी मनापासून काम केले. या कृतीवरुन जयवंत कुलकर्णी यांची समाजा प्रतीची आस्था दिसून आली. त्यांच्या कला प्रवासासाठी त्यांचा पत्नीची देखील खुप मोठी साथ मिळाली त्या स्वत: नोकरी करुन जयवंत कुलकर्णींच्या कार्यक्रमांचं उत्तम व्यवस्थापन करत असे.
आपल्या सांगीतिक कारकीर्दीत शेकडो गाणी गाणार्याी या कलातपस्वीची नोंद सरकार दरबारी घेण्यात आली होती. “ज्योतिबाचा नवस” आणि “एकटा जीव सदाशिव” या चित्रपटातील गाण्यासाठी जयवंत कुलकर्णी यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारामध्ये गौरवण्यात आले होते.
जयवंत कुलकर्णी यांचा गायनाचा वारसा त्यांची मुलगी संगीता शेंबेकर आणि किशोरी गोडबोले यांनी अभिनय कलेत चुणूक दाखवून दिली आहे. तसंच त्यांचा नातू निहार शेंबेकर याने २००१ साली प्रदर्शित झालेल्या गदर या हिंदी चित्रपटात व “चिमणी पाखरं” या मराठी चित्रपटातून बालकलाकाराची भूमिका साकारली होती.
आपल्या जादुई स्वरांमधून रसिकांच्या मनाचा ठाव घेऊन मंत्रमुग्ध करत तर कधी थिरकायला लावणार्यां जयवंत कुलकर्णी यांचे ३१ ऑगस्ट २००५ या दिवशी निधन झाले.
(लेखन व संशोधन – सागर मालाडकर)
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा