वैशिष्ट्यीकृत पोस्ट
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
पुणे : फार्सिकल विनोदी नाटकाला नवे आयाम देत सहा दशकांहून अधिक काळ मराठी रंगभूमीवर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते ‘फार्ससम्राट’ आत्माराम भेंडे यांचे शनिवारी सकाळी वृद्धापकाळाने येथील रत्ना रुग्णालयामध्ये निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते.
मुलगा नंदू भेंडे यांच्या मृत्यूनंतर ते वृद्धाश्रमात राहत होते. त्यांची मुलगी अमेरिकेत वास्तव्याला आहे. त्या अमेरिकेहून परतल्यानंतर रविवारी भेंडे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
नाशिकला १९८१मध्ये झालेल्या ६१व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपदही भेंडेंनी भूषवले होते. दुर्दैवाने बेळगाव येथे अखिल भारतीय मराठी नाट्य संमलेनास शनिवारपासून प्रारंभ झाला आणि त्याच दिवशी त्यांचा मृत्यू झाल्याने कलाकारांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
भेंडे यांचा जन्म ७ मे १९२३ रोजी झाला. इंडियन नॅशनल थिएटरमधून त्यांनी कारकिर्दीला सुरुवात केली होती. ‘मन पाखरूपाखरू’, ‘प्रीती परी तुजवरती’, ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’, ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘पळा पळा कोण पुढे पळे’ या नाटकांतून त्यांनी आपले अभिनय कौशल्य दाखविले. अलीकडच्या काळात त्यांच्या चरित्र भूमिका रसिकांना भावल्या. तरुणाईला तर ते आपल्या घरातले आजोबाच वाटले. ‘लगे रहो मुन्नाभाई’मध्ये त्यांनी साकारलेला ‘आत्माराम’ सगळ्यांनाच भावला होता. त्याचबरोबर ‘यंदा कर्तव्य आहे’ या चित्रपटातील छोटेखानी भूमिका ही प्रेक्षकांच्या मनात रुंजी घालत राहिली.
१९६०-७०च्या दशकात लेखक बबन प्रभू आणि दिग्दर्शक आत्माराम भेंडे या जोडीनं मराठी रंगभूमीला फार्सिकल नाटकांची ओळख करून दिली आणि रसिकांना अगदी खळखळून हसवलं. एक सुसंस्कृत विनोदी अभिनेते म्हणून भेंडे यांनी स्वत:चा ठसा उमटवला होता. ‘दिनूच्या सासूबाई राधाबाई’, ‘झोपी गेलेला जागा झाला’, ‘पिलूचं लग्न’ ही त्यांची नाटकं तुफान गाजली होती.
मराठी रंगभूमीप्रमाणेच हिंदी, इंग्रजी रंगभूमीवरही त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. दूरदर्शनवरील मालिकाही त्यांनी दिग्दर्शित केल्या होत्या. भेंडे यांना नाट्यदर्पण, शंकरराव घाणेकर, नाट्यभूषण, चिंतामणराव कोल्हटकर, नटसम्राट नानासाहेब फाटक, प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव या मानाच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते. त्यांना २००६-०७मध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने सांस्कृतिक पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. (प्रतिनिधी)
अष्टपैलू अभिनेता हरपला
ज्येष्ठ अभिनेते आत्माराम भेंडे यांच्या निधनाने आपल्या सहजसुंदर अभिनयाने मराठी रंगभूमी गजावणारा एक अष्टपैलू रंगकर्मी हरपला आहे. भेंडे यांनी आपल्या सहजसुंदर अभिनयाने रसिकांना तब्बल सहा दशके निखळ आनंद दिला. इंडियन नॅशनल थिएटरमधून अभिनयाला सुरुवात केल्यानंतर त्यांनी ‘एक सुसंस्कृत विनोदी अभिनेता’ म्हणून ठसा उमटविला. याशिवाय सर्वच प्रकारच्या भूमिका त्यांनी ताकदीने साकारल्या. दिग्दर्शक आणि निर्माता म्हणूनही त्यांचे योगदान मोठे आहे. चित्रपट आणि दूरचित्रवाणीवरील मालिकांसोबतच मराठी, हिंदी आणि इंग्रजी नाटकांमधून अमिट छाप उमटविणाऱ्या एका अभिजात कलावंताला आपण मुकलो याची खंत आहे.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
चित्रपटसृष्टीतील ‘आत्मा’ गमविला
गेल्या सहा दशकांहून अधिक काळ मराठी रंगभूमीवर अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता म्हणून कार्यरत असणारे ज्येष्ठ अभिनेते आत्माराम भेंडे यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीतला आत्मा गमावला आहे. चित्रपट, मालिका आणि नाटक या तिन्ही माध्यमांत आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणाऱ्या आत्माराम भेंडे यांनी आपल्या सहजसुंदर अभिनयाने हिंदी, इंग्रजी रंगभूमीवरही ठसा उमटविला होता. आज ९५व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे उद्घाटन होत आहे; आणि आजच माजी नाट्य संमेलनाध्यक्ष असलेल्या भेंडे यांचे निधन झाल्याने मराठी कलाविश्वातून हळहळ व्यक्त होत आहे. - विनोद तावडे, सांस्कृतिक कार्य मंत्री
सुसंस्कृत विनोदी अभिनेत्याचे निधन
मराठी व हिंदी रंगभूमी, चित्रपट, जाहिराती आणि मालिकांच्या माध्यमातून गेली ६० वर्षे रसिकांना आनंद देणारे ज्येष्ठ कलाकार आत्माराम भेंडे यांचे निधन झाले आहे. एक सुसंस्कृत विनोदी अभिनेते म्हणून त्यांनी स्वत:चा विशेष ठसा उमटवला होता. अभिनयासोबतच त्यांनी दिग्दर्शक आणि निर्मात्याची जबाबदारी अगदी समर्थपणे पेलली होती. भारतीय जनता पार्टीतर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा