वैशिष्ट्यीकृत पोस्ट

पं.निखिल घोष


पं. निखिल घोष
जीवनभर संगीताचा ध्यास आणि त्यासाठी सर्वस्व अर्पण करणारे साधुपुरुष वृत्तीचे निखिलबाबू

२८. १२. १९१८ - ०३. ०३. १९९५

२८. १२. १९१८ – ०३. ०३. १९९५


न संपणारी नाती – १०
डॉ. विठ्ठल प्रभू

पं.  पन्नालाल घोष यांच्या बांसरीवादनाला तबल्याची साथ देतांना त्यांचे बंधू पं. निखिलबाबू यांना मी पाहिले होते. काळीकुट्ट लांब दाढी, टपोरे डोळे व त्यावरील सोनेरी काड्यांचा चष्मा, सात्विक चेहरा, यामुळे या साधुपुरुष दिसणा-या व्यक्तीची छाप कुणावरही पडावी.

कधी कधी अपूर्व योगायोग जुळून येतात. लोणावळ्याला ज्या ग्रॅण्ड  हॉटेलमध्ये आम्ही राहत होतो, तेथे आपल्या मुलांना घेऊन पं. निखिल घोष उन्हाळ्याची सुट्टी घालवण्यासाठी येऊन राहिले होते. आमची ओळख झाली आणि लवकरच ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. मुंबईला आल्यानंतरही आमच्या वारंवार भेटी होत राहिल्या. त्यावेळी संगीत महाभारतीच्या कामात ते व्यग्र असत. ध्रुव, नयन व तुलिका अशी त्यांना तीन मुले. आज पं. नयन तबला व सतार वाजवतात. ध्रुव हे प्रख्यात सारंगी वादक बनलेत. तुलिका यांचे लग्न होऊन त्या आता आई बनल्या आहेत. त्याही गातात. संगीताचा वारसा या तिन्ही मुलांनी चालू ठेवला आहे.

पं. निखिलबाबूंनी संगीताची नवी स्वरलिपी लिहिली आहे. ‘राग – तालाची मूलतत्त्वे आणि अभिनव स्वरलेखन पद्धती’ हे पुस्तक त्यांनी लिहिले आहे. पाश्चिमात्य स्टाफ स्वरलेखन पद्धती व वि. ना. भातखंडे स्वरलेखन पद्धती यांचा सुंदर मेळ पं. निखिलबाबूंनी या पुस्तकांत घातलेला आहे. यात निखिलबाबूंची कल्पकता दिसून येते. जीवनभर संगीताचा ध्यास घेतलेले, त्यासाठी सर्वस्व अर्पण केलेले, असे हे निखिलबाबू. त्यांची संशोधक वृत्ती, संगीतावरील निष्ठा व विद्वत्ता पाहून एका मासिकासाठी त्यांची मी मुलाखत घेतली. त्यांनी जे सांगितले ते असे :-

संगीताचा अतोनात षोक असलेल्या घराण्यात माझा जन्म झाला. माझे आजोबा हे धृपद गायक व पखवाजिये होते. माझे वडील अक्षयकुमार घोष उत्तम सतारवादक होते. ऑफिसातून घरी येण्यापूर्वी प्रथम देवालयात जाऊन भक्ति पूर्वक सतार वाजवीत. घरी आल्यावरही रात्री अकरा वाजेपर्यंत त्यांचा रियाझ चालायचा. त्यांनी अखेरपर्यंत संगीतसाधना केली, ती फक्त देवाला अर्पण करण्यासाठी. वाळवीने खाऊन चाळण बनलेली त्यांची संगीतविषयक ज्ञानाची वही मला त्यांच्याकडून मिळालेली अमूल्य भेट. सध्याच्या बांगला देशातील बारीसाल हे गाव देखील संगीतसाधनेला अगदी अनुकूल.

आमचे घर नदीच्या किना-यावर होते. सभोवार शेते पसरलेली. दूरवर क्षितीज दिसायचे. प्रातःकाळी क्षितिजाआडून डोकावणा-या सूर्याकडे पाहत किंवा चांदण्या रात्री होडीच्या शिडाआड चमकणारे रुपेरी चांदणे डोळ्यांत सामावून आम्ही आलापी गात आमचे बालपण घालवले. सकाळी जाग यायची ती कोकिळेच्या पंचमाने, आणि रात्री ती झोप लागायची नावाड्याच्या तालबध्द गीतांच्या अंगाईने. अजूनही कधी कधी वाटते, सूर्यचंद्राची चाड नसलेले, मोटारींच्या कर्कश कर्ण्याने कान किटणारे हे शहर सोडावे, धूर ओकणारे धुराडे व तीन खोल्यांचे खुराडे सोडून बारीसालला जावे, आणि पहाटे वहाणा-या गार वा-याच्या शिळेत, नदीच्या खळखळ तालावर आपला षड्ज लावावा.

त्याकाळी संगीताचा षोक ही हीन अभिरुची समजली जाई. समाजात आमच्या कुटुंबाची वारंवार अवहेलना होत असे. मी लहान असल्यामुळे मला याविषयी विशेष समजत नव्हते, पण शाळेत गुरुजी व मित्र माझा सहवास टाळीत, तेव्हा मनात कुठेतरी बोचत असे. तरी सुध्दा आमच्या घरात संगीताच्या गंगेला ओहोटी अशी लागली नाही. माझी आई ब्राम्हो समाजाच्या पुरोगामी मताची. तिला समाजाची बंधने अडवू शकली नाहीत. माझे थोरले बंधू पन्नालाल घोष त्यावेळी बांसरी वाजवायचे. लोकांची निंदा टाळण्यासाठी ते शेतात जाऊन  रियाझ करायचे. याच अवधीत समाजाचा संगीताविषयी असलेला रोष एकाएकी पालटला. याचे श्रेय गुरुदेव रवीन्द्रनाथ टागोर, कवी काझी नझरुल, अतुलप्रसाद सेन यांसारख्या थोर पुरुषांना द्यायला हवे. गायनकलेच्या सौंदर्याचा आस्वाद घेणे यांत पाप नाही, हे त्यांनी समाजाला पटविले.

एकेकाळी तिरस्कार करणारे लोकच आम्हाला दाद देऊ लागले. उजळ माथ्याने आम्ही गाऊ, वाजवू लागलो. गुणी कलावंतांच्या मैफली रंगू लागल्या. सुरेन दास, बिपीन चतर्जी यांसारखे थोर कलाकार ऐकायला मिळाले. कालांतराने ज्ञानप्रकाश घोष, किराणा घराण्याचे उस्ताद फिरोज निजामी यांसारखे श्रेष्ठ गुरुवर्य लाभले.

गायन व तबला या दोन्हीची मला लहानपणापासून आवड. त्यातल्या त्यात गायनाकडे कल जास्त. दिवसांतून नऊदहा तास गायनाची व तीन चार तास तबल्याची तालीम असायची. शेवटी व्यवसायाच्या दृष्टीने कुठली तरी एक कला आत्मसात करायची वेळ येऊन  ठेपली. मी मोठ्या संभ्रमात पडलो. गायन आणि तबलावादन यांतून कुठली कला निवडायची हे माझे मलाच कळेना.

मी गुरुवर्य ज्ञानप्रकाश घोष यांच्याकडे धाव घेतली. ते म्हणाले, “पैसा, प्रसिध्दी व मान्यता यावर पाणी सोडण्यात तू तयार असशील तर आजपासून तानपुरा कोप-यात ठेव आणि तबला हातात घे. या कलेला वाहून घेतलेली माणसे फारशी नाहीत. समाजाचे व संगीताचे आपण काही देणे लागत आहोत अशी तुझी भावना असेल तर तू आजपासून तबलावादनकार हो. “

वयाच्या चोविसाव्या वर्षी मी तबलावादक व्हायचे ठरवले. गवसणी घालून तानपुरा कोप-यात ठेवला, त्या दिवशी मी अक्षरशः पोटभर रडलो. दीड तप रोज नऊ दहा तास संगत करणा-या या माझ्या वाद्याला दूर सारतांना अंतःकरण खूप विव्हळले.

मी त्यावेळी मुंबईत माझे बंधू पं. पन्नालाल घोष यांच्या छायेत वाढत होतो. तबला शिकवण्यासाठी त्यांनी उस्ताद अमीर हुसेनखॉसारखे उत्कृष्ट गुरु मिळवून दिले. रियाझ करण्यासाठी एक वेगळी खोली घेऊन दिली. चाळीत विजेचे दिवे नसल्यामुळे रात्री मेणबत्ती लावून माझा रियाझ चालायचा. समोर स्वामी विवेकानंदांचा फोटो ठेवून रियाझचा एखादा बोल दहा हजार वेळा वाजवायचा संकल्प सोडायचा. तोंडाने ईश्वराचा जप व हातांनी ‘ धिर  धिर किततक ‘ वाजवतांना अंगातून घामाच्या धारा वाहू लागायच्या, हात दुखू लागायचे, हाताची चामडी झिजू लागायची, शेवटी रक्तबंबाळ झालेली बोटे दिसली तरी तसाच संकल्प पूर्ण करायचा. जमीन फाटेल, आकाशातून वज्राघात होईल, तरी जोपर्यंत कुडीत प्राण राहील तोपर्यंत तबल्यावरचा हात ढळणार नाही ही प्रतिज्ञा. डॉक्टरच्या  बॅंडेजमधून मोकळ्या राहिलेल्या बोटांनी दुस-या दिवशी रियाझ पुन्हा सुरु. यात यातना नव्हत्या, वेदना नव्हत्या. तो एक कलासाधनेचा आगळा व अप्रतीम आनंद होता. रियाझानंतर दाही दिशा प्रकाशमान वाटायच्या. तो आनंद शब्दात व्यक्त करणे कठीण.

देवावर माझा विश्वास आहे. पण देव आणि धर्म याविषयीची माझी दृष्टी बदलली. आध्यात्मिक साधनापूर्तीसाठी संगीताचीही मदत होते अशी दीक्षा माझ्या आध्यात्मिक गुरुंनीच दिली. दैविक साक्षात्कार अध्यात्माच्या मार्गानेच होतात असे मला वाटत नाही. कलासाधनेत देखील तीच अनुभूती मिळते अशी माझी श्रद्धा आहे. १९४८ची गोष्ट. मुंबईत जोराचे वादळ झाले. मी माझ्या खोलीत सकाळपासून रियाझ करीत बसलो होतो. दुपार झाली. पोटात अन्नाचा कण नव्हता. भुकेने व्याकुळ झालो होतो. बाहेर जाणे तर शक्यच नव्हते. मीही ईश्वराची परीक्षा घेण्यासाठी रियाझ चालू ठेवून बसून राहिलो. इतक्यात शेजारची बाई जेवणाची थाळी घेऊन खोलीत आली आणि म्हणाली, ” तुम्ही सकाळपासून उपाशी आहात. हे जेवून घ्या. ” त्या माऊलीला दुवा देत व ईश्वराचे आभार मानून मी क्षुधा शांत केली.

चांगले संगीत ऐकणे हा माझा छंद आहे. गुणी कलाकारांना तबल्याची साथ करणे हा आनंद आहे नवीन नवीन तुकडे, कायदे व चीजा शिकून आत्मसात करणे ही माझी हौस आहे. मला अवगत असलेली विद्या दुस-यांना शिकवणे हा माझा धर्म आहे. जाणकारांसमोर  तबला सोलो वाजवतांना किंवा नवीन नावेन कृती निर्माण करताना मला लाखमोलाचे सुख लाभत आले. तबल्याच्या ठेक्यातील ‘खाली’ चिन्हाच्या शून्यात विश्वातील शून्यता दिसू लागली. संगीताने जात, धर्म व देश यांची बंधने सैल केली. द्रुतलयीतील ‘तुकडा’ भाकरीच्या तुकड्यापेक्षा गोड वाटला. कोर्टातील कायद्यापेक्षा तबल्यातील कायदा जवळ केला. तालाच्या मात्रा मोजतांना वैद्याची मात्रा घ्यायला विसरलो. तबल्याची साथ करताना साथींच्या रोगाचे भय वाटले नाही. लखनौ, दिल्ली, पंजाब, अजराडा, फरुकाबाद, रामपूर या घराण्यांच्या घरंदाज चीजा वाजवतांना बसल्या जागी तीर्थयात्रा घडल्याचा आनंद लाभत आला.
पं. निखिल घोष - उस्ताद अली अकबर खॉ

पं. निखिल घोष – उस्ताद अली अकबर खॉ
पं. निखिल घोष - विलायत खॉ - बिस्मिल्ला खॉ

पं. निखिल घोष – विलायत खॉ – बिस्मिल्ला खॉ
पं. निखिल घोष - पं. रविशंकर

पं. निखिल घोष – पं. रविशंकर

वर्षामागोमाग वर्षे गेली तसे माझे स्वतंत्र तबला वादनाचे कार्यक्रम भारतभर होऊ लागले. माझे बंधू पं. पन्नालाल घोष यांच्या कार्यक्रमांना मी नेहमीच तबल्याची साथ करीत आलो. याशिवाय पं. ओंकारनाथ ठाकूर, अमीरखॉ, पं. रविशंकर, उस्ताद फैय्याजखॉ, उस्ताद अल्लाऊद्दीनखॉ, विलायतखॉ, बडे गुलाम अलीखॉ, बिस्मिल्लाखॉ यांसारख्या संगीताच्या महारथींनाही तबल्याची साथ करण्याचे भाग्य मला लाभले. युरोपच्या सांस्कृतिक दौ-यात येहुदी मेनुहिन, पॉल रॉब्सन, बेंजामिन ब्रिटन  यांसारख्या संगीतज्द्न्यांशी विचारविनिमय करण्याचा सुयोग आला. मी स्वरांकित केलेल्या चीजा लता मंगेशकर, आशा भोसले, हेमंतकुमार, मन्ना डे, महम्मद रफी, गीता दत्त यासारख्या सुरेल आवाजाच्या गायकांनी गायल्या.  तरीसुध्दा मनात मी कुढत होतो. कुठेतरी उणीव असल्याचा भास होत होता. जीवनात काहीतरी कमतरता वाटत होती. विचारांती या उणीवा भरून काढण्याचे ठरवले. नव्हे, यासाठी उरलेले आयुष्य झिजवायचे ठरवले. यातूनच संगीत महाभारती ( पूर्वीचे ‘अरुण संगीतालय’) या संस्थेचा जन्म झाला.

संगीताचा प्रसार व्हावा, शास्त्रोक्त संगीत सर्वांना शिकता यावे, निरक्षरांच्या हाती असलेली ही कला सुशिक्षितांनी उचलावी व ती शब्दांकित व्हावी, या विषयावरील अनेक पाठ्यपुस्तके उपलब्ध व्हावीत, संगीताचे तरबेज शिक्षक निर्माण व्हावेत, संगीतकलेचे संशोधन व्हावे, यासाठी ‘संगीत महाभारती’ या विश्वविद्यालयाची चाळीस लाखांच्या अंदाजाची इमारत उभी करण्याचा संकल्प सोडला. संगीतशास्त्राचा बारा भागांचा एक ‘विश्वकोश’ तयार करणे हा दुसरा संकल्प.
पं. निखिल घोष - अहमद जान तिरख्वॉ

पं. निखिल घोष – अहमद जान तिरख्वॉ
पं. निखिल घोष - पन्नालाल घोष

पं. निखिल घोष – पन्नालाल घोष
पं. निखिल घोष - निखिल बानर्जी

पं. निखिल घोष – निखिल बानर्जी

उस्ताद  फैय्याजखॉ यांची एक आठवण सांगतो. आकाशवाणीच्या नवीन केंद्राच्या उद्घाटनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी मी व माझे बंधू बडोद्याला गेलो होतो. उस्तादांनी आम्हाला चहापानासाठी निमंत्रण दिले. बोलता  बोलता त्यांनी, ” बेटा, तुम आज जलसे मे  मेरेसाथ तबला बजाना ” अशी फर्माईश केली.  मी मनातून घाबरलो. इतक्यात दोन दिवस खायला पुरातील इतकी पक्वान्ने असलेली नास्त्याची मोठाली ताटे समोर आली. मी विचारात पडलेला पाहून उस्ताद म्हणाले, “खाओ बेटा, खाओ. इतना खाओगे नाही तो बजाओगे कैसे ? ” त्यांची माया, स्नेह, अदब, दिलदारपणा पाहून मी गहिवरलो.

अशीच एक आठवण माझे गुरु उस्ताद अहमदजान थिरखवॉ यांची सांगतो. कावसजी जहांगीर हॉलमध्ये एका संगीत संमेलनात माझाही कार्यक्रम ठेवण्यात आला होता. मी तबला सोलो वाजवायला सुरुवात केली. मध्येच एक अवघड तुकडा वाजवून गेलो. इतक्यात प्रेक्षकांकडून एक आवाज आला, ” वा, बहोत अच्छा ! फिरसे बजाव बेटा. ” तो आवाज उस्ताद अहमदजान थिरखवॉ यांचा होता. कार्यक्रमानंतर ते मला भेटले. मी कुणाकडून तबला शिकलो याची विचारपूस केली. माझे गुरु उस्ताद अमीर हुसेनखॉ यांचे नाव मी सांगितले. चटकन ते म्हणाले, ” लेकिन वह तुकडा किसी और से तुम सिखे हो. ” मी कबूल केले, ” हां, उस्ताद, ज्ञानप्रकाश घोष ने वह तुकडा बताया. ” मी त्यांची जाणकारी पाहून थक्क झालो. लगेच त्यांना माझे गुरु  होण्याची मी विनंती केली व त्यांनी ती मानलीही.

‘जीवन व कला यांचा संबंध’ याविषयी मला लोक अनेक वेळा विचारतात. संगीताची साधना करतो ते खरे जीवन, की उदरनिर्वाह चालण्यासाठी आटापिटा करावा लागतो त्याला जीवन  म्हणायचे हेच मला समजत नाही. संगीत साधना करतो त्यावेळी ख-या अर्थाने मी जगतो. कला हेच माझे जीवन. म्हणूनच माझी अखेरची इच्छा आहे, लय पावणारे हे जीवन तबल्याची लय सांभाळतांना संपावे ; शेवटचा श्वास सुरांत विरावा.
***
– डॉ. विठ्ठल प्रभू
२ सी, शिवसागर, पांडुरंग नाईक मार्ग, राजा बढे चौक, शिवाजीपार्क, मुंबई ४०० ०१६.
दूरध्वनी : (०२२) २४४५ २०६५,  ९८ २० ६७ ५८ १५
इमेल : vithal_prabhu@hotmail.com
छायाचित्रे : पंडित निखिल घोष यांचे सुपुत्र पंडित नयन घोष यांच्या संग्रहातून साभार
‘स्नेहबंध’ या मॅजेस्टिक प्रकाशनने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकातील हा लेख लेखकाच्या अनुमतीने मैत्री अनुदिनीमध्ये पुनःप्रसिद्ध
संग्राहक:शेवाळकर आर.पी.

टिप्पण्या