वैशिष्ट्यीकृत पोस्ट

गौरव माय मराठीचा

*"गौरव माय मराठीचा"*

((मराठी भाषेची शब्दरचना बाराखडीतून होते.५० मुळाक्षरांनी तिला मढविले आहेच. काना,मात्रा,वेलांटी,ऊकार,अनुस्वार यांसाठी त्याच प्रकारचे शब्द कडव्यात योजले आहेत.सोबत महाराष्ट्राची महती सांगणा-या गोष्टींचा साज चढविला आहे. खालील काव्यातून तेच वैभव मांडण्याचा प्रयत्न केला आहे.))


माय मराठी 'शब्दरत्नांची' खाण ।
बाराखडीत गुंफिला गौरवी मान ।।

डौल सुंदर देखणी अदा लावणी।
शिव सह्याद्री शौर्याला हिरकणी।।

स्वर चौदा झूल छत्तीस व्यंजनी ।
सुवर्ण मुळाक्षरांची लावण्यखणी।।

काना ज्ञान तुकोबा मराठ बाणा।
भाव अभंगात भक्ताचा विठूराणा।।

कोकणी,व-हाडी,खान्देशी मराठी।
-हस्वदीर्घ वेलांटी साज वेलबुटी।।

फुगडी हुतुतू लेझिम खेळू राकट।
ऊकार सुकूमार हुरूपाला मुकूट।।

शेतकरी मेहनत दे घामाची मात्रा।
संगे मायेची पिके ऐटबाज यात्रा।।

द्वैमात्रा पैलू जैसे वैभवी पैठणी।
तैसेचि धैर्य मैत्र सदैव पैलवानी ।।

एक काना मात्रा तोरण शोभतो ।
सोबत थोरवीला आदर बोलतो।।

एक काना द्वैमात्रा झडली नौबत ।
डौल गौरवार्थ तिची और दौलत।।

संताभंग गंध अंजनी अनुस्वार ।
संस्कृती 'संजीवन' संपन्न सार।।

विसर्ग स्वतः असे सुख दुःखात ।
माय मराठी हेच वैभव अभिजात।।

जोडशब्द म्हणी किती अलंकार ।
काव्यात विणले मायबोली सार।।

सोमनाथ मधुकर पाटील(मधुपुष्प)
करमाळा जि.सोलापूर
9767589626
संग्राहक:शेवाळकर आर.पी.

टिप्पण्या