वैशिष्ट्यीकृत पोस्ट
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
जग बदलणारा नेता
ऐक्य समूह
Saturday, April 02, 2011 AT 01:50 AM (IST)
Tags: vishesh lekh
मिखाईल गोर्बाचेव्ह
दुसऱ्या महायुध्दानंतर अमेरिकेच्या शक्तीला आव्हान देणारी, सोव्हिएत रशिया हीच एकमेव कम्युनिस्ट महासत्ता होती. कम्युनिझमचा जगातला प्रसार रोखायसाठी अमेरिकेने नाटो, सिऍटो या आंतरराष्ट्रीय लष्करी संघटना निर्माण केल्या. रशिया आणि चीनभोवती लष्करी तळांचे जाळे विणले. रशियातील कम्युनिस्ट राजवट कोसळेल, असे अमेरिकेला स्वप्नातही वाटले नव्हते. पण सोव्हिएत रशियाचे शेवटचे अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी स्वीकारलेल्या मानवतावादी आणि नवसुधारणावादी धोरणामुळे हे घडले. 1990 मध्ये जुन्या सोव्हिएत देशाचा शेवट झाला. सोव्हिएत रशियातील तीसच्यावर राज्ये स्वतंत्र झाली. तिथली कम्युनिस्ट राजवट संपली. साऱ्या युरोपात लोकशाहीचे वारे वहायला लागले. या देशात लोकशाही राजवटी स्थापन झाल्या. हे सारे गोर्बाचेव्ह यांच्यामुळेच घडले.
सोव्हिएत रशियाच्या अस्तानंतर गोर्बाचेव्ह यांचे अध्यक्षपदही गेले, पण त्यांच्या या महान कार्याचा गौरव नोबेल पुरस्काराने झाला होता. सोव्हिएत रशियातली कम्युनिस्ट राजवट अस्ताला गेल्यावर, गोर्बाचेव्ह यांचीही सत्ता गेली. ते सत्तेच्या राजकारणातून बाजूला गेले. अलिकडे तर त्यांची आठवणही जगाला होत नाही. या पार्श्वभूमीवर लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये या महान मानवतावादी नेत्याचा सन्मान करण्यात आला. रशियातही अलिकडेच "सेंट ऍन्ड्रूस पुरस्काराने त्यांचा गौरव झाला.
आपण नवसुधारणेचे स्वीकारलेले धोरण पोथीनिष्ट कम्युनिस्टांना आवडणार नाही, याची खात्री गोर्बाचेव्ह यांना होती. पण रशियातल्या कम्युनिझम राजवटीने देशाचा विकास तर झाला नाहीच, उलट रशियन जनतेवर अनन्वित अत्याचार झाले. स्टॅलिनने सत्तेसाठी लक्षावधी विरोधकांच्या कत्तली केल्या. सामान्य जनतेचा कम्युनिस्ट राजवटीत प्रचंड छळ झाला. शेतकरी आणि गरीबांची सत्ता म्हणजे कम्युनिझम हा समज रशियातल्या सत्ताधिशांच्या क्रूर राजवटीने खोटा ठरला. गोर्बाचेव्ह यांनी मात्र जनतेला मोकळीक दिली. रशियात मुक्ततेची पहाट झाली. कोणत्याही राजकीय तत्वज्ञानापेक्षा स्वातंत्र्य आणि मानवता हीच मूल्ये महत्वाची असतात, हे आग्रहाने आपल्या जनतेसमोर मांडत त्यांनी मध्य युरोपातील रशियाने ताब्यात ठेवलेल्या राष्ट्रांची आधी मुक्तता केली. दोन्ही जर्मनीचे एकीकरण झाले. युरोपचा नकाशा बदलायला लागला. सत्तेसाठी हपापलेल्या कम्युनिस्ट नेत्यांनी गोर्बाचेव्ह यांना तुरुंगात डांबण्याचा केलेला प्रयत्न, रशियातल्या जनतेने उठाव करुन मोडून काढला. सामान्य माणसांच्या मानवी हक्कासाठी सत्तेचा त्याग करणाऱ्या या नेत्याचा 80 व्या वाढदिवशी झालेला हा सन्मान म्हणजे त्यांच्या जागतिक मानवतावादी कार्याची पावती होय!
संग्राहक:शेवाळकर आर.पी.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा