वैशिष्ट्यीकृत पोस्ट

शिवरायांचे सामाजिक कार्य व सुधारणा

शिवाजी महाराज आणि सामाजिक सुधारणा
Like 2
शिवरायांचं विश्लेषक चरित्र सांगणारं `शिवाजी महाराज द ग्रेटेस्ट’ नावाचं पुस्तक प्रसिद्ध झालंय. शिवरायांची गणना जगातील महानतम व्यक्तिंमध्ये व्हावी, असे दाखले लेखक डॉ. हेमंतराजे गायकवाड यांनी या पुस्तकात दिलेत. त्यापैकीच `शिवाजी महाराज आणि सामाजिक सुधारणा’ या प्रकरणाचा हा संपादित भाग…
सतीला प्रतिबंध
काही तज्ञांच्या मते सतीची प्रथा उच्चवर्णीयांमध्ये किंवा स्वतःला उच्चभ्रू म्हणवणार्यांमध्ये जास्त पाळली जाई. म्हणजेच सतीची प्रथा भारतातील बहुजन प्रजेत फारशी प्रचलित नव्हती आणि खालच्या जातीतही खूप कमी प्रमाणात ती अस्तित्वात होती. किमान एका इतिहासकाराच्या माहितीनुसार ही प्रथा नंतरच्या मुघली सत्तेच्या उत्तरार्धात हिंदू राजत्रियांच्या दहनाव्यतिरिक्त विरळाच आढळत असे.
जिजाबाई त्यांचे पती शहाजी यांच्या मृत्यूनंतर सती जाऊ इच्छित होत्या परंतु शिवाजी महाराजांनी त्यांना रोखले व आपल्या प्रजेला एक उदाहरण घालून दिले.
अस्पृश्यतेचे निर्मूलन
जावळीच्या मोर्यांचा पराभव केल्यानंतर शिवाजी महाराजांनी भोरप्याच्या डोंगरावर एक किल्ला बांधला आणि त्याचे नाव `प्रतापगड’ ठेवले. तिथे भवानीमातेचे एक मंदिरही बांधण्यात आले. शिवाजी महाराज जेव्हा प्राणप्रतिष्ठेच्या पूजेसाठी तिथे पोहोचले तेव्हा त्यांनी तिथे खालच्या जातीतील काही माणसे दूरवर उभी असलेली पाहिली. त्याविषयी विचारपूस करता त्यांना सांगण्यात आले की ती मूर्ती घडविणारी अस्पृश्य माणसे होती. शिवाजी महाराजांनी त्यांना पूजा करण्यास सांगितले. पुजार्याने यावर आक्षेप घेतला पण शिवाजी महाराजांनी आपल्या म्हणण्याच्या समर्थनार्थ विचारले की जर हे अस्पृश्य मूर्ती घडवू शकतात तर मग तीच मूर्ती त्यांनी पूजा केल्याने अपवित्र कशी होईल?
जातीयवादाचे उच्चाटन
त्यांचा वैयक्तिक सेवक मदारी मेहतर होता, त्यांचा अंगरक्षक मुस्लिम होता; अफझलखानाच्या भेटीच्यावेळी त्यांचा अंगरक्षक असलेला जिवा महाला न्हावी होता; एवढेच नाही तर सिद्दी जोहरला चकवणारा त्यांचा तोतयादेखील शिवा काशिद नावाचा न्हावीच होता.
अफझलखानावरील हल्ल्याच्यावेळी त्याचा वकील कृष्णाजी भास्कर याने शिवाजी महाराजांच्या मस्तकावर वार करण्यासाठी तलवार उगारताच `तुम्ही ब्राह्मण असलात म्हणून काय झाले’ असे म्हणून शिवाजी महाराजांनी त्याला ठार केले. यावेळी झालेला घाव हा शिवाजी महाराजांच्या शरीरावरील एकुलता एक व्रण होता ज्याच्यामुळेच नंतर पन्हाळ्याला फझलखानाने आणि आगर्याहून सुटकेच्यानंतर जिजाबाईनी शिवाजी राजांना ओळखले.
शिवाजीमहाराज आणि धर्मांतर
शिवाजीराजे हिंदू धर्म पाळणारे होते पण त्यांची धर्मश्रध्दा आंधळी नव्हती. धर्माला मान्य नसणार्या गोष्टीही करून ते कार्य साधत. कारण कार्य महत्त्वाचे होते. धर्मांचे काटेकोर पालन नव्हे. एकदा मुसलमान झाला म्हणजे धर्म सोडला. धर्म सोडला म्हणजे मेला. मग मेलेला जिवंत कसा होणार? आणि या जन्मात पाप केल्याने पुढच्या जन्मात तर माणूससुध्दा होणार नाही. किडा किंवा मुंगी होणार. असे हिंदू धर्मशात्र सांगते. शिवाजीराजांच्या काळात त0र ते अधिक कठोरपणे सांगे. परंतु शिवरायांनी मुसलमान झालेल्या हिंदूंना पुन्हा हिंदू करून घेतले. नुसते करून घेतले असे नाही तर त्यांच्याशी सोयरसंबंध जोडले. बजाजी निंबाळकर आणि नेताजी पालकर हे मुसलमान सुंता झालेले आणि मुसलमानांत दहा-पाच वर्षे राहिलेले मराठे शिवाजीराजांनी परत हिंदू करवून घेतले. बजाजी निंबाळकरास राजांनी स्वतःची मुलगी दिली. अफगाणिस्तानात आठ वर्षे राहिलेल्या नेताजी पालकरास शुध्द करून स्वतःच्या पंक्तीस बसवून घेतले.
धर्मासंबंधीचा हा विचार पेशवाईत इतका मागे पडला की पेशवाईतला सर्वात शूर पुरुष बाजीराव स्वतःच्या मुलसमान प्रेयसीच्या – मस्तानीच्या मुलास हिंदू करण्याची इच्छा असूनही हिंदू करू शकला नाही. समशेर बहाद्दरास कृष्णसिंग करीन म्हणणार्या बाजीरावास ते तर जमले नाहीच उलट स्वतःलाच घराबाहेर पडावे लागले. शिवाजीमहाराजांनी अस्पृश्य आणि महारांना किल्लेदार केले होते.
शिवाजी महाराज अंधश्रध्देच्या व खुळ्या समजुतीविरुध्द कसे होते याची एक गमतीदार नोंद आहे. मूल `पालथे’ जन्मणे हे अशुभ आहे अशी अंधश्रध्दा होती. राजाराम महाराज जन्मताना पालथे जन्मले. सर्वजण ते पाहून गप्प बसले. पुत्रजन्माचा आनंद कुणी दाखविना. महाराजांना हे समजले. ते म्हणाले, `पुत्र पालथा जन्मला, तो मुसलमान पातशाही पालथी घालील’, मग सगळे आनंद व्यक्त करू लागले.
शिवाजी महाराज आणि पर्यावरण
बलाढय़ शत्रुशी झुंज करीत असतानासुध्दा महाराजांना पायाखालची जमीन व तिला कवेत घेणारे पर्यावरण यांचा कधीही विसर पडलेला नाही. याचा प्रत्यय आज्ञापत्रातील त्यांच्या विचारांवरून येतो.
गडाची राखण म्हणजे कलारग्याची झाडी, ते झाडी प्रयत्ने वाढवावी. त्यामध्ये एक काठीही तोडों न द्यावी. बलकबुलीस त्या झाडीमध्ये हशम बंदुके घालावेया कारणाजोगे असो द्यावे. गडाभोवती नेहमी मेटें असावी. घेरियाची वस्ती करीत जावी. गस्तीचा जाब मेटकरी यांणी देत जावा. गडाखालते इमारतीचे घर किंवा घराभोंवते दगडाचे कुसूं सर्वथा असों न द्यावे. तसेच गडावर आधी उदक पाहून किल्ला बांधावा. पाणी नाही आणि ते स्थळ आवश्यक बांधणे प्राप्त झाले तरी आधी खडक फोडून तळी, टांकी पर्जन्यकाळपर्यंत संपूर्ण गडास पाणी पुरे अशी मजबूत बांधावी. आजची हागणदारी मुक्त गाव योजना राबविण्याची वेळ आली तेव्हा लोकांना शिवकालीन स्वच्छता या गोष्टीवर अभ्यास करावासा वाटला.
महाराजांनी किल्ले बांधणी करताना तटामध्येच शौचकूप बांधल्याचे दिसते. महाराजांनी बांधलेल्या राजगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग या किल्ल्यांवर फिरताना तटामध्ये बारकाईने पहावे. आपणाला त्या काळी वापरात असणार्या शौचकूपाचे अस्तित्व सहज जाणवेल. तटातच शौचालय, तेथेच पाणी आणि मलनिःस्सारण होऊन थेट गडाच्या खाली. त्यामुळे दुर्गंधी, अस्वच्छतेचा प्रश्नच नाही.
 डॉ. हेमंतराजे गायकवाड   संग्रह शेवाळकर आर. पी.

टिप्पण्या