वैशिष्ट्यीकृत पोस्ट

समांतर साहित्य संमेलन

समांतर साहित्य संमेलन डिसेंबर १९८१ मध्ये मुंबईत झालेले साहित्य संमेलन होते.


राजकारण्यांना वगळून व सरकारी मदतीशिवाय एक पर्यायी साहित्य संमेलन मुंबईत झाले होते.

गो. नी. दांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली १९८१ साली अकोल्याला मराठी साहित्य संमेलन झाले होते. संमेलनात दाखल झालेल्या राजकारण्यांनी ते संमेलन नासवले.

संमेलनात कोणते ठराव पारित करावेत हे ठरविणाऱ्या विषय नियामक समितीत स्वागताध्यक्ष केंदीय मंत्री वसंतराव साठे घुसले आणि तंबूत शिरलेल्या उंटाप्रमाणे त्यांनी सगळा तंबूच काबीज केला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अंतुले यांनी 'जयप्रकाश नारायण' आणि 'जनांचा प्रवाहो चालिला' या दोन पुस्तकांना मिळालेले शासकीय पुरस्कार स्वत:च्या अधिकारात रद्द केले. वसंतराव साठे यांनी अंतुल्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. 'विषय नियामक समिती'चे समस्त सदस्य हताश होऊन हा तमाशा पहात राहिले.

वरील घटनेने क्षुब्ध झालेले माधव गडकरी प्रा. सुभाष भेंडे यांच्या घरी गेले. आणि त्यांनी सरकारच्या आर्थिक मदतीशिवाय आदर्श संमेलन कसे भरवता येईल याचा विचार सुरू केला. या दोघांच्या मताशी मधुकाका कुलकर्णी, वा.ल. कुलकर्णी, केशवराव कोठावळे, दिनकर गांगल, रा. भि. जोशी, जयवंत दळवी, रामकृष्ण नाईक, य. दि. फडके, श्री. पु. भागवत, पुष्पा भावे, रमेश मंत्री ही मंडळी सहमत झाली, आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी 'साने गुरुजी विद्यालयात नियमितपणे भरणाऱ्या बैठकींना हजेरी लावू लागली. पहिल्या बैठकीत वा. ल. कुलकर्णी अध्यक्ष, माधवराव गडकरी कार्याध्यक्ष आणि प्रा. सुभाष भेंडे कोषाध्यक्ष असे पदाधिकारी निश्चित झाले. संमेलनाच्या अध्यक्षपदी मालतीबाई बेडेकर यांचे नाव, त्यांच्या संमतीने नक्की झाले.

सरकारकडून अनुदान घ्यायचे नाही, कुणाचेही प्रायोजकत्व स्वीकारायचे नाही, असे ठरवले असल्याने संमेलनाच्या खर्चासाठी साहित्यिक व रसिक यांच्याकडून जास्तीतजास्त प्रत्येकी पाचशे रुपये घेण्यात आली. मुख्यमंत्री अंतुले यांनी पाठविलेला १५ हजार रुपयांचा चेक साभार परत केला गेला.

१९८१ डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईतील रूपारेल कॉलेजच्या प्रांगणात घातलेल्या मांडवात हे अभूतपूर्व संमेलन पार पडले. कार्यक्रम दोन दिवसांचा होता. उद्‌घाटनासाठी व्यासपीठावर तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, पु.ल. देशपांडे, गंगाधर गाडगीळ, वा.ल. कुलकर्णी ही मंडळी होती. दुर्गाबाई भागवत प्रेक्षकांत बसल्या होत्या. मालतीबाई बेडेकर यांनी अध्यक्षीय भाषणात 'आविष्कार स्वातंत्र्याची' व्याप्ती नेमक्या शब्दांत सांगितली. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, पु.ल. देशपांडे, गंगाधर गाडगीळ आणि वा.ल. कुलकर्णी यांची भाषणे झाली. ही ऐकायला रसिकांनी खूप गर्दी केली होती.

या समांतर साहित्य संमेलनात रात्री कविसंमेलन, दुसऱ्या दिवशी चर्चा, परिसंवाद, कथाकथन आदी कार्यक्रम झाले. कविसंमेलनाला नागपूरहून सुरेश भट आले होते.

समारोपाच्या भाषणात प्रा. सुभाष भेंडे यांनी संमेलनाचा हिशेब सादर केला. मंडपाचा सोळा हजार रुपये हा खर्च धरून एकूण खर्च ३६,५०० रुपये झाला. जमा झालेल्या पैशांपैकी साडेदहा हजार रुपये उरले, ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला पाठविण्याचे ठरले.

अल्पखर्चात, शासनाचे अर्थ साहाय्य न घेता व राजकारणी लोकांचा हस्तक्षेप टाळून, सुटसुटीत संमेलन घेता येते हे समांतर साहित्य संमेलन कल्पनातीत यशस्वी झाल्यामुळे सिद्ध झाले.

टिप्पण्या